गेल्या आठवड्यात नोमुरा कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्यावर एका क्लायंटचा खून करण्याचा आणि त्यांना लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर नोमुरा कंपनीचे सीईओ केंटारो ओकुडा यांनी माफी मागत सांगितले की, ते स्वतःच्या पगारात कपात करणार आहेत. अशी घोषणा करण्याची त्यांची ही पहिली वेळ नाही. ऑक्टोबरच्या सुरुवातीला जपानच्या फायनान्शियल सर्व्हिसेस एजन्सीने कंपनीवर बॉण्ड मार्केटमध्ये फेरफार केल्याचा आरोप केल्यानंतर सीईओ आणि उच्च अधिकाऱ्यांनी वेतनात २० टक्के कपात करण्याची घोषणा केली होती. गेल्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत ओकुडा म्हणाले की, ते आणि उच्च अधिकारी पुढील तीन महिन्यांत त्यांच्या पगारात ३० टक्के पगार कपात करतील. ते म्हणाले, “आम्ही पीडितांची, तसेच या प्रकरणात ज्यांची गैरसोय झाली, त्यांची मनापासून माफी मागू इच्छितो. आम्ही खरोखर दिलगीर आहोत.” नेमके प्रकरण काय? सीईओने स्वतःच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय का घेतला? ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घ्या.
नोमुरा कंपनी
नोमुरा ही एक आंतरराष्ट्रीय आर्थिक समूह आणि जपानमधील सर्वांत मोठी गुंतवणूक बँक आहे. या कंपनीचे टोकियो, लंडन व न्यूयॉर्क येथील मुख्य कार्यालयासह जगभरात २६,००० कर्मचारी कार्यरत आहेत. तोकुशिची नोमुरा यांनी १९०० च्या सुरुवातीस पैसा बदलणारा व्यवसाय म्हणून या कंपनीची स्थापना केली होती. कंपनीने जपानी रिटेल बँकिंग मार्केटमध्ये आपली प्रतिष्ठा निर्माण केली. परंतु, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकिंगमध्येही ही कंपनी एक मजबूत खेळाडू आहे. २००८ च्या आर्थिक संकटात लेहमन ब्रदर्सच्या आशिया-पॅसिफिक व्यवसायाचे अधिग्रहण केल्यानंतर नोमुरा पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आली.
हेही वाचा : दुबईचा व्हिसा मिळवताना भारतीय पर्यटकांना अडचणी का येत आहेत? काय आहेत नवे नियम?
कंपनी वादाच्या भोवऱ्यात येण्याचे कारण काय?
कंपनीच्या माजी संपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यावर ऑगस्टमध्ये जाळपोळ आणि दरोड्याचा आरोप करण्यात आला होता. २९ वर्षीय व्यक्तीने जुलैमध्ये कंपनीच्या पूर्वपरवानगीशिवाय वृद्ध ग्राहक आणि त्यांच्या जोडीदाराच्या घरी भेट दिली होती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्याने कथितपणे दोघांना अमली पदार्थ पाजले, त्यांच्या घरातून सुमारे १,७०,००० डॉलर्स रोख चोरले आणि त्यांचे घर पेटवून दिले. त्यावेळी हे जोडपे पळून गेले. माजी कर्मचारी एप्रिल २०१८ मध्ये नवीन पदवीधर म्हणून ‘नोमुरा सिक्युरिटीज’मध्ये सामील झाला होता. एप्रिल २०२२ पासून त्याला हिरोशिमा शाखा कार्यालयात स्थानांतरित करण्यात आले होते. त्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक ग्राहकांना मालमत्ता व्यवस्थापनाचा सल्ला दिला. त्याला ४ ऑगस्ट रोजी नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. नोमुराने सांगितले की त्यांनी, संबंधित व्यवस्थापकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली आहे आणि माजी कर्मचाऱ्याशी संबंधित इतर संभाव्य घटनांची चौकशी सुरू केली आहे. त्याला ३० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली.
या घटनेनंतर कोणते सुरक्षा उपाय योजले गेले?
ओकुडा आणि इतर अधिकाऱ्यांच्या वेतन कपातीव्यतिरिक्त, कंपनीने अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना अमलात आणण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामध्ये संपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची भेट शेड्युल करण्यापूर्वी व्यवस्थापकांनी ग्राहकांशी थेट बोलणे समाविष्ट आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार, नोमुरा अधिक प्रभावी उपाययोजना सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण करील. कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी अनुपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आणि चुकीच्या कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी ‘ब्लॉक लीव्ह’ सादर करणे आवश्यक असेल. त्याव्यतिरिक्त कंपनी कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचे काटेकोरपणे मूल्यांकन करील आणि व्यावसायिक नैतिकतेसाठी प्रशिक्षण सत्र घेण्यात येईल.
‘स्पूफिंग’ घोटाळा काय आहे?
३० सप्टेंबर रोजी नोमुराने वरिष्ठ अधिकारी ताकुशी सावदाला नोकरीवरून काढून टाकले. जपानच्या फायनान्शियल सर्व्हिसेस एजन्सी ‘सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज सर्व्हिलन्स कमिशन’च्या तपासात त्याने बाजारातील हेराफेरीतून मोठा फायदा मिळवल्याच्या आरोपानंतर हा निर्णय घेण्यात आला. ‘सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज सर्व्हिलन्स कमिशन’ने म्हटले आहे की, व्यापाऱ्याने १० वर्षांच्या सरकारी बॉण्डमध्ये घोळ केला. यूएस फायनान्शियल इंडस्ट्री रेग्युलेटरी अथॉरिटीकडे दाखल केलेल्या माहितीनुसार, तो अशा प्रकारे स्पूफिंगचा वापर करून बेकायदा स्टॉकच्या किमतीत फेरफार करू शकला. या प्रकरणी ‘सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज सर्व्हिलन्स कमिशन’ने नोमुरा कंपनीला १,४३,००० डॉलर्सचा दंड ठोठावला.
हेही वाचा : भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार रद्द, कारण काय? याचा काय परिणाम होणार?
या दोन संकटांमुळे कंपनीची प्रतिष्ठा जपानमध्ये खराब झाली आहे. त्याचा परिणाम नोमुराच्या शेअर्सवर झाला आहे. कंपनीची निंदा केली जात आहे. असे असले तरीही बँकेने बहुतांशी चांगले काम केले आहे आणि या वर्षी बँकेची कमाई वाढली आहे. ‘एफटी’च्या अहवालानुसार, गेल्या तीन महिन्यांत नफा दुपटीने वाढला आहे.