उत्तर कोरियाने गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी आपल्या सर्वात प्रगत आणि शक्तिशाली शस्त्रास्त्रांपैकी एका क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. त्याचा उद्देश आण्विक प्रतिबंध मजबूत करणे आहे. हे घन इंधनावर चालणारे आंतरखंडीय क्षेपणास्त्र (आयसीबीएम) आहे. अमेरिकेच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी अमेरिकेचे लक्ष वेधून घेणे, तसेच युक्रेनमधील युद्धाला पाठिंबा देण्यासाठी उत्तर कोरियाने रशियाकडे सैन्य तैनात केल्याच्या टीकेला प्रतिसाद देणे हे या चाचणीचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रक्षेपणासाठी रशियाने उत्तर कोरियाबरोबर तांत्रिक कौशल्य सामायिक केले असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. हे क्षेपणास्त्र किती घातक आहे? उत्तर कोरियाने आताच ही क्षेपणास्त्र चाचणी का केली? ही जगासाठी चिंतेची बाब आहे का? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांनी बुधवारी सांगितले की, उत्तर कोरिया युक्रेनविरोधात सैन्य पाठवण्याच्या बदल्यात रशियाकडून नवीन आयसीबीएम तंत्रज्ञान घेऊ शकेल. परंतु, उत्तर कोरियामधील इतर लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्योंगयांगचा क्षेपणास्त्र कार्यक्रम इतका प्रगतिपथावर आहे की, त्याला कोणत्याही मदतीची आवश्यकता नाही. उत्तर कोरियाने ‘Hwasong-19’ नावाच्या ‘आयसीबीएम’ क्षेपणास्त्राला जगातील सर्वात मजबूत क्षेपणास्त्र म्हणून संबोधले आहे. ही एक परिपूर्ण शस्त्र प्रणाली असल्याचेही त्यांचे सांगणे आहे. देशातील माध्यम वाहिन्यांनुसार, उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी चाचणीचे निरीक्षण केले आणि राज्य उत्तर कोरियाची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या कृतीचा प्रतिकार करण्यासाठी उत्तर कोरियाची तयारी दर्शवण्यासाठी याचे वर्णन ‘योग्य लष्करी कारवाई’ असे केले. उत्तर कोरिया आपले अण्वस्त्र बळकट करण्याचे धोरण सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

घन इंधन क्षेपणास्त्र तयार करताना क्षेपणास्त्राच्या संरचनेत रासायनिक मिश्रण एम्बिड केले जाते. (छायाचित्र-एपी)

हेही वाचा : अफगाणिस्तानातील महिलांना एकमेकींचा आवाज ऐकण्यावर बंदी, कुराण पठणासही मनाई; तालिबानच्या नव्या फतव्यात काय?

घन-इंधन क्षेपणास्त्र म्हणजे काय?

घन इंधन क्षेपणास्त्र तयार करताना क्षेपणास्त्राच्या संरचनेत रासायनिक मिश्रण एम्बिड केले जाते. हे प्रीलोडेड फायरवर्कप्रमाणेच कार्य करते, जे कोणत्याही क्षणी प्रक्षेपित करण्यासाठी तयार असते. द्रव-इंधन असलेल्या क्षेपणास्त्रांचा विचार केल्यास, याचे प्रक्षेपण करण्यापूर्वी लगेचच इंधन आणि ऑक्सिडायझर दोन्ही जोडणे आवश्यक असते, ही वेळखाऊ आणि अधिक किचकट प्रक्रिया आहे. कोरिया असोसिएशन ऑफ डिफेन्स इंडस्ट्री स्टडीजच्या हान क्वोन-हीच्या मते, उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यासाठी, घन-इंधन क्षेपणास्त्रे महत्त्वाची आहेत, कारण ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी लागतो. ही क्षेपणास्त्रे त्वरित तैनात केली जाऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

घन इंधनाचे फायदे

घन-इंधन क्षेपणास्त्रांना प्रक्षेपण करण्यापूर्वी इंधनाची आवश्यकता नसते; ज्यामुळे ते ऑपरेट करणे सोपे आणि सुरक्षित होते. त्यांना कमी लॉजिस्टिकची आवश्यकता असते, त्यामुळे त्यांना द्रव-इंधन क्षेपणास्त्रांपेक्षा शोधणे अधिक आव्हानात्मक होते. “या क्षमता संकटाच्या वेळी अधिक प्रतिसाद देतात,” असे अमेरिका स्थित कार्नेगी एंडॉवमेंट फॉर इंटरनॅशनल पीसच्या वरिष्ठ फेलो अंकित पांडा यांनी स्पष्ट केले.

सध्या हे तंत्रज्ञान कोणाकडे आहे?

चीन घन इंधन तंत्रज्ञान शतकानुशतके वापरत आहे. परंतु, २० व्या शतकात अमेरिकेने या तंत्रज्ञानात अधिक मोठी प्रगती केली. उत्तर कोरिया कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या श्रेणीसाठी तसेच त्याच्या नवीन ह्वासोंग-१८ इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासाठी घन इंधन वापरतो. सोव्हिएत युनियनने १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस आपले पहिले घन-इंधन आयसीबीएम आरटी-२ सादर केले आणि त्यानंतर फ्रान्सने मध्यम-श्रेणीचे एस ३ क्षेपणास्त्र आणले. चीनने १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात घन-इंधन ‘आयसीबीएम’ची चाचणी करण्यास सुरुवात केली आणि दक्षिण कोरियानेदेखील “प्रगत सॉलिड-प्रोपेलेंट तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा केला आहे.

युक्रेनशी लढा देण्यासाठी रशियाला हजारो सैनिक पाठवत असल्याच्या अमेरिकेच्या आणि दक्षिण कोरियाच्या आरोपांना उत्तर म्हणून उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केली. (छायाचित्र-रॉयटर्स)

उत्तर कोरियाने आताच या क्षेपणास्त्राची चाचणी का केली?

युक्रेनशी लढा देण्यासाठी रशियाला हजारो सैनिक पाठवत असल्याच्या अमेरिकेच्या आणि दक्षिण कोरियाच्या आरोपांना उत्तर म्हणून उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केली, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. दक्षिण कोरियाने इशाराही दिला होता की, पुढील आठवड्यात अमेरिकेच्या निवडणुकीपूर्वी उत्तर कोरिया क्षेपणास्त्र चाचणी किंवा अणुचाचणी करणार आहे. कोरिया इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल युनिफिकेशनचे वरिष्ठ विश्लेषक हाँग मिन यांनी ‘एएफपी’ला सांगितले की, अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून उत्तर कोरियाने ही चाचणी केली आहे. दक्षिण कोरियाचे सांगणे आहे की, रशियाला सैन्य पाठवण्याव्यतिरिक्त उत्तर कोरियाने तोफखाना, अँटी-टँक रॉकेट आणि क्षेपणास्त्रांनी भरलेले १३ हजार शिपिंग कंटेनरदेखील पाठवले आहेत.

हेही वाचा : सोन्यापेक्षा चांदीची मागणी का वाढली? सोन्याच्या विक्रीत घट होण्याची कारणं काय?

प्रक्षेपणामागचा उद्देश काय आहे?

उत्तर कोरियाचा दावा आहे की, गुरुवारी करण्यात आलेले प्रक्षेपण ही ‘आयसीबीएम’ची अत्यंत महत्त्वाची चाचणी होती. अशा क्षेपणास्त्रांची श्रेणी किमान ५,५०० किलोमीटर (३,४०० मैल) असते आणि ती प्रामुख्याने आण्विक शस्त्रे वितरीत करण्यासाठी डिझाइन केली जाते, त्यामुळे एका अर्थी ही किम जोंग उनची अमेरिकेला धमकी असू शकते. हे प्रक्षेपण रशिया आणि उत्तर कोरियाकडे अमेरिकेविरूद्ध सामरिक अण्वस्त्रे चालविण्याची क्षमता असल्याचे दर्शविते,” असे हाँग म्हणाले. किम अमेरिकेला संकेत देत असेल की, उत्तर कोरिया-रशिया युती, तत्वतः एक आण्विक युती आहे,” असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: North korea fires long range ballistic missile icbm rac