उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमधील वैमनस्य जगजाहीर आहे. या दोन देशांमध्ये २५ जून १९५० साली सुरू झालेले युद्ध आजतागायत अधिकृतपणे थांबवण्यात आलेले नाही. या युद्धाचे पूर्व आशियाच्या भूप्रदेशावर विविध भौगोलिक आणि राजकीय परिणाम पाहायला मिळाले आहेत. या युद्धामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. सामान्य नागरिक आणि लष्करातील सैनिकांसह एकूण २.५ दशलक्ष लोकांचा यामध्ये मृत्यू झाला होता; इतके भयाण हे युद्ध होते. हे युद्ध अधिकृतरीत्या कधीच थांबविले गेलेले नाही. मात्र, कालांतराने दोन्ही बाजूंनी शस्त्रांचा वापर करून हल्ले करणे बऱ्यापैकी थांबले आहे. तरीही या युद्धाला ‘विस्मरणात गेलेले युद्ध’, असे म्हणतात. हे युद्ध २७ जुलै १९५३ साली थांबले. मात्र, दोन्ही देशांमध्ये शांतता करार झाला नाही; फक्त युद्धविराम करण्यास सहमती दर्शविण्यात आली. याचा अर्थ, तांत्रिकदृष्ट्या पाहायला गेले, तर दोन्हीही देश अजूनही युद्धाच्या सावटाखालीच आहेत. त्यांच्यात कधी भीषण युद्ध भडकेल, काही सांगता येत नाही. मात्र, या दोन्ही देशांमधील अशा तणावग्रस्ततेमुळे पूर्व आशियातील भौगोलिक राजकीय परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे.

हेही वाचा : ब्रिटिशकालीन कायदे हद्दपार! भारतीय न्याय संहिता आजपासून लागू; काय आहेत नवे बदल?

कोरियन देशांची फाळणी कशी आणि का झाली?

कम्युनिस्ट विचारसरणीचा सोविएत युनियन आणि उदारमतवादी भांडवलशाही विचारसरणीचा अमेरिका या दोन देशांमधील शीतयुद्धाचा परिणाम म्हणून कोरियन युद्धाकडे पाहिले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर (१९३९ ते १९४५) जागतिक पटलावर या दोन महासत्ता उदयास आल्या. या दोन्हीही महासत्तांना कोरियन द्वीपकल्पावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. कोरिया हा देश नुकताच वसाहतवादी राजवटीपासून मुक्त झाला होता. त्यामुळे सोविएत रशिया आणि अमेरिका या दोघांचाही या द्वीपकल्पावर डोळा होता. त्याआधीही अनेक राजघराण्यांनी कोरियावर राज्य केले होते. जसे की, सातव्या शतकामध्ये सिला राजघराण्याची कोरियावर सत्ता होती. त्यानंतर १९१० ते १९४५ या काळात कोरियावर जपानी वसाहतवादाची राजवट होती. मात्र, ऑगस्ट १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धात जपानने आत्मसमर्पण करीत शस्त्रे खाली ठेवली. त्यानंतर कोरियावरील जपानचे वर्चस्वही संपुष्टात आले. मात्र, कोरियाची ही मुक्ती लवकरच एका फाळणीला कारणीभूत ठरली.

दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा जपानने मित्रदेशांसमोर शस्त्रे टाकण्याची घोषणा केली, तेव्हा त्यानंतर तत्काळ सोविएत संघाच्या सैन्याने कोरियाच्या उत्तर भागावर; तर दक्षिण भागावर अमेरिकेने ताबा मिळवला. मग उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये साम्यवाद व लोकशाही यावरून संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष एवढा तीव्र झाला की, दोन्ही देशांमधील शीतयुद्धाचा परिणाम म्हणून या कोरियन देशांची कायमचीच विभागणी झाली. ३८ अक्षांशावर दोन्ही देशांची सीमारेषा निश्चित झाली. सध्या दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागांमधील चकमकी टाळण्यासाठी ३८ व्या अक्षांशाच्या बाजूने डिमिलिटराइज्ड झोन (DMZ) नावाची मोकळी जागाही आहे. कोरियाच्या उत्तर भागामध्ये (म्हणजेच सध्याच्या उत्तर कोरियामध्ये) सोविएत युनियनने कम्युनिस्ट राजवट लागू करण्यासाठी किम इल-संग यांना मदत केली. ते एकेकाळी गोरिला फायटर होते आणि त्यांना सोविएतनेच प्रशिक्षण दिले होते. दुसऱ्या बाजूला दक्षिण कोरियामध्ये एका भांडवलशाही देशाच्या निर्मितीसाठी अमेरिकेने पाठिंबा दिला. अनेक वर्षे अमेरिकेमध्ये निर्वासित जीवन जगलेले कम्युनिस्ट विरोधी नेते सिंगमन री यांच्याकडे दक्षिण कोरियाचे नेतृत्व सोपविण्यात आले. १९४८ पर्यंत दोन्ही देशांमध्ये अधिकृत सरकारे स्थापन झाली. कोरियाच्या उत्तर भागामध्ये ‘डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया’ नावाचा देश स्थापन झाला; तर दक्षिण भागामध्ये ‘रिपब्लिक ऑफ कोरिया’ नावाचा देश स्थापन झाला. मात्र, संपूर्ण द्वीपकल्प आपलाच असल्याचा दावा दोन्ही देशांकडून केला जात होता आणि तो आजतागायत केला जातो. म्हणूनच दोन्ही देशांमधील वैमनस्य आजही कायम आहे.

कोरियन देशांमध्ये युद्ध का पेटले?

२५ जून १९५० साली उत्तर कोरियानेच या युद्धाला सुरुवात केली. उत्तर कोरियाला सोविएत युनियन आणि चीनचा पाठिंबा होता. उत्तर कोरियाने अकस्मातच दक्षिण कोरियावर आक्रमण केले. त्यांनी ३८ अक्षांशाची सीमारेषा ओलांडण्यास सुरुवात करून हे युद्ध लादले. हे आक्रमण पहाटेपासून सुरू करण्यात आले. बेसावध असलेल्या दक्षिण कोरियाच्या सैन्याला आणि त्यांच्या अमेरिकन सहकाऱ्यांसाठी हे अनपेक्षित होते. उत्तर कोरियाच्या सैन्याने वेगाने पुढे जाऊन दक्षिण कोरियावर चढाई केली. त्यांनी दक्षिण कोरियातील अनेक महत्त्वाच्या शहरे आणि ठिकाणांवर ताबा मिळवला. त्यामध्ये अगदी सियोल या राजधानीचाही समावेश होता. या सगळ्या घडामोडींनंतर संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने या हल्ल्याचा निषेध करणारा ठराव संमत केला आणि दक्षिण कोरियातून उत्तर कोरियाचे सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले. २७ जून रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दुसरा ठराव संमत केला. त्या ठरावानुसार उत्तर कोरियाच्या कृतींमुळे शांततेचा भंग झाल्याचे घोषित करण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांना दक्षिण कोरियाला मदत करण्याची आणि कोरियन द्वीपकल्पामध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याची शिफारस करण्यात आली होती. प्रत्युत्तरादाखल प्रामुख्याने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्रांच्या लष्कराने या युद्धामध्ये हस्तक्षेप केला. त्यामुळे रक्तरंजित आणि प्रदीर्घ संघर्षाला सुरुवात झाली. हा संघर्ष तीन वर्षे सुरू राहिला. त्यामध्ये लाखो लोकांचे बळी गेले.

हेही वाचा : विश्लेषण: इस्रायल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे नेतान्याहूंची कोंडी? कट्टर ज्यूंनाही लष्करी सेवा अनिवार्य करण्याचा निर्णय का गाजतोय?

कोरियन युद्धाचा कटू वारसा

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये फाळणी झालीच होती; मात्र या युद्धामुळे दोन्ही देशांमधील कटूता टिपेला पोहोचली. सध्या युद्धविराम असला तरीही या दोन्ही देशांमधील धगधगत्या वैमनस्यामुळे कधी युद्ध पेटेल ते सांगता येत नाही. त्यामुळे या प्रदेशातील सुरक्षेवर त्याचा मोठा परिणाम झाल्यामुळे कोरियन द्वीपकल्पाची युद्धभूमी झाली आहे. उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये सततचा तणाव ही सामान्य बाब झाली आहे. त्यामुळे उत्तर कोरिया आणि पाश्चात्त्य देशांमध्येही तणाव निर्माण झाला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला उत्तर कोरिया आणि रशिया; तसेच दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिकच दृढ झाले आहेत. अमेरिकेने आपले सैन्य दक्षिण कोरियामध्ये तैनात केले आहे. दक्षिण कोरियाला कोणत्याही बाह्य आक्रमणापासून संरक्षण मिळावे यासाठी हा देश कटिबद्ध असल्याचे दिसून येते. तसेच अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या आर्थिक विकासासाठीही नेहमीच मदत केली आहे. दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राजवटींना मदत करण्याच्या उद्देशाने चीनही अमेरिकेच्या सैन्याला आव्हान देण्यासाठी या युद्धामध्ये सामील झाला आहे. चीन आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध अधिक चांगले आहेत. अर्थव्यवस्था आणि मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने चीन हा उत्तर कोरियाचा जिगरी दोस्त आहे. दुसऱ्या बाजूला रशियादेखील उत्तर कोरियाला आपला मित्र मानतो. रशिया जगाच्या पटलावर एकट्या पडलेल्या उत्तर कोरियाबरोबर शस्त्रास्त्रे, तसेच इतर अनेक बाबींचा व्यापार करतो.