उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांतील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अजूनही उत्तर कोरिया दक्षिण कोरियाच्या दिशेने कचऱ्याने भरलेले फुगे पाठवीत आहे. उत्तर कोरियाच्या या कुरापतींमुळे दोन्ही देशांमधील परिस्थिती आणखीनच चिघळत चालली आहे. आता असे आढळून आले आहे की, या कचऱ्याच्या फुग्यांमुळे दक्षिण कोरियाला सोलमधील विमानतळांवरील धावपट्ट्या बंद कराव्या लागल्या आहेत. मे महिन्यापासून उत्तर कोरिया वारंवार कचऱ्याने भरलेले फुगे सीमेवर पाठवीत आहे. त्यामुळे राजधानी सोलमधील दोन प्रमुख विमानतळांवरील काही धावपट्ट्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे. १ जूनपासून आतापर्यंत अनेक दिवसांपासून जेव्हा सर्व धावपट्ट्या एक तर टेक ऑफ, लॅण्डिंग किंवा दोन्हींसाठी बंद आहेत, अशी माहिती डेमोक्रॅटिक पक्षाचे संसद सदस्य यांग बु-नाम यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. नेमके हे प्रकरण काय? फुग्यांनी दक्षिण कोरियातील विमान वाहतूक कशी विस्कळित केली? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर कोरिया कचऱ्याचे फुगे का पाठवीत आहे?

उत्तरा कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांमध्ये सध्या एक प्रकारचे शीतयुद्ध सुरू आहे. सुरुवातील दक्षिण कोरियाने फुग्यांद्वारे के-पॉप आणि प्रचार पत्रके उत्तर कोरियाच्या दिशेने पाठवली होती. तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली. आता उत्तर कोरिया दक्षिण कोरियाला फुगे पाठवून हिणवत आहे. या फुग्यांमध्ये कचरा, विष्ठा, माती, ज्वलनशील वस्तू आढळून येत असल्याचे नागरिकांचे सांगणे आहे. सीमेपलीकडे पाठविण्यात येणार्‍या या फुग्यांमुळे दोन्ही देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे. उत्तर कोरियाने मे महिन्याच्या अखेरपर्यंत असे ५,५०० हून अधिक फुगे पाठवले आहेत. फुगे वाऱ्याने वाहून येत असताना, ते दक्षिण कोरियातील सोल आणि इतर शहरांमध्ये, काही राष्ट्राध्यक्ष कार्यालयाजवळ आणि विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत आहेत. हे फुगे अधिकाऱ्यांनी काढले जात असले तरी काही फुगे फुटतात; ज्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण होतो.

उत्तरा कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांमध्ये सध्या एक प्रकारचे शीतयुद्ध सुरू आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?

कचऱ्याच्या फुग्यांचा धावपट्टीवर कसा परिणाम होतोय?

यांग बु-नाम यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत विमान वाहतूक आकडेवारीनुसार, २६ जून रोजी इंचेऑन विमानतळाची धावपट्टी एकूण १६६ मिनिटांसाठी (दोन तास, सात मिनिटे) बंद करावी लागली होती. धावपट्टी बंद करण्याचा हा सर्वांत जास्त कालावधी होता. सोमवारी (२३ सप्टेंबर) जगातील पाचवे व्यग्र आणि महत्त्वाचे कार्गो हब असलेल्या आंतरराष्ट्रीय इंचेऑन विमानतळावर टेकऑफ आणि लॅण्डिंग ९० मिनिटांसाठी (एक तास ३० मिनिटे) या दोन्ही क्रिया स्थगित करण्यात आल्या. राजधानी सोलच्या पश्चिमेकडील किनारी असलेल्या आणि मुख्यतः देशांतर्गत उड्डाणे देणाऱ्या गिम्पो येथेही फुग्यांमुळे विमान वाहतूक विस्कळित झाली आहे.

एका एअरलाइन अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर कोरियाच्या फुग्यांच्या मोहिमेमुळे उड्डाण करणे कठीण होत आहे. काही प्रकरणांमध्ये धावपट्टी बंद झाल्यास आणि विमानांना काही काळ हवेतच राहावे लागल्यास किंवा लॅण्डिंगसाठी दुसर्‍या विमानतळांकडे विमान न्यावे लागल्यास इंधन जास्त प्रमाणात लागते. विमानचालन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्येक वेळी कचर्‍याने भरलेला फुगा सापडल्यावर धावपट्टी बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. फुगे विमानतळापासून किती लांब आहेत, यावरून हा निर्णय होत नाही; तर परिस्थिती लक्षात घेऊन वेळोवेळी आवश्यक ते निर्णय घेतले जातात.

दक्षिण कोरियाने असा इशारा दिला आहे की, ते कचऱ्याचे फुगे पाठविल्याबद्दल उत्तरेविरुद्ध गंभीर पावले उचलतील. (छायाचित्र-एपी)

दक्षिण कोरियाची प्रतिक्रिया काय?

दक्षिण कोरियाच्या सैन्याने सांगितले की, आम्ही फुग्यांना खूप गांभीर्याने घेतो. आमच्याकडून काय कारवाई केली जाईल याची सविस्तर माहिती देऊ शकत नसलो तरी आवश्यकतेप्रमाणे कारवाई करण्याच्या दृष्टीने आम्ही सतर्क राहतो. दक्षिण कोरियाने असा इशारा दिला आहे की, ते कचऱ्याचे फुगे पाठविल्याबद्दल उत्तरेविरुद्ध गंभीर पावले उचलतील. त्यामध्ये उत्तरेकडे निर्देशित केलेल्या सीमेवर उभारण्यात आलेल्या मोठ्या ध्वनिवर्धकांवरून प्रसारित होणार्‍या प्रचार व प्रसार अशा बाबींचा समावेश असू शकतो.

हेही वाचा : एकेकाळी ब्रॅण्ड्सचं माहेरघर असणार्‍या चीनमध्ये बनावटी वस्तूंचं जाळं; कारण काय?

नक्की काय सुरू आहे?

उत्तर कोरियाने यापूर्वी फुगे पाठविणे तात्पुरते थांबवले होते. मात्र, दक्षिणेकडून पुन्हा पत्रके आल्यास पुन्हा फुगे पाठविणे सुरू करण्याचा इशाराही देण्यात आला होता. दरम्यान, दक्षिण कोरियाच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि तेव्हापासून उत्तरेकडील नेते किम जोंग उन यांच्यावर टीका करणारी पत्रके पाठविण्यात येत आहेत; ज्यात के-पॉप व्हिडीओ आणि नाटके, तसेच यूएस डॉलर नोट्स असलेल्या यूएसबी स्टिक्स आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: North korea trash balloons disrupted air travel in south korea rac