ब्रिटनमध्ये दि. ६ मे रोजी ऐतिहासिक घटना घडली. किंग चार्ल्स तृतीय यांचा पत्नी क्वीन कॅमिला यांच्यासह राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. आता जगभरातील अतिशय मोजक्या देशांमध्ये राजेशाही उरली असून ब्रिटनसारख्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आणि विकसित देशात आजही राजेशाही अस्तित्वात असल्यामुळे जगाला त्याचे साहजिकच कौतुक वाटते. मात्र ब्रिटनमधील सर्वांनाच ही राजेशाही मान्य आहे, असे बिलकूल नाही. ६ मे रोजी राज्याभिषेक सोहळा सुरू असताना काही ब्रिटिश नागरिकांनी राजेशाहीविरोधात आंदोलन केले. वेस्टमिन्स्टर शहरातील ॲबे या चर्चमध्ये राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, त्या वेळी चर्चच्या बाहेर आंदोलकांनी ‘Not My King’ असे लिहिलेले फलक झळकावले. रिपब्लिक संघटनेच्या वतीने राजेशाहीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. शहर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलन नियंत्रणात आणले.
‘द गार्डियन’ दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, रिपब्लिक संघटनेचे प्रमुख ग्रॅहम स्मिथ आणि त्यांचे पाच सहकारी आंदोलक यांना निषेधाच्या फलकांसहित अटक करण्यात आली आहे. ट्राफल्गार स्क्वेअर येथे आंदोलन करताना पोलिसांनी ही कारवाई केली. ब्रिटिश सरकारने नुकताच निषेध आंदोलनविरोधी कायदा लागू केला आहे. देशातील मोठ्या कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आणणारे किंवा त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येते. आंदोलकांना अटक झाल्यानंतर रिपब्लिक संघटनेच्या ट्विटर हँडलवरून या अटकेचा निषेध करण्यात आला. “आम्हाला शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र तरीही आमच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी या अटकेचे कारणही सांगितलेले नाही,” असे ट्वीटमध्ये म्हटले आहे. ग्रॅहम स्मिथ कोण आहेत? रिपब्लिक संघटना राजेशाहीच्या विरोधात का आहे? रिपब्लिकच्या मागण्या काय? याबद्दल ‘फर्स्टपोस्ट’ या संकेतस्थळाने आढावा घेतला आहे.
ग्रॅहम स्मिथ आणि रिपब्लिक
ग्रॅहम स्मिथ हा रिपब्लिकच्या राजेशाहीविरोधी गटाचा प्रमुख आणि राजेशाहीच्या विरोधात प्रचार करणाऱ्या गटाचा नेता आहे. २००५ च्या दरम्यान ग्रॅहमने रिपब्लिक संघटनेसोबत काम करायला सुरुवात केली. राजकीय पक्षाचा प्रचार करणे आणि कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केल्याचा अनुभव ग्रॅहमकडे आहे. ग्रॅहमने काही वर्षे ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीनिमित्त घालवली. त्याच्याकडे यूके आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. रिपब्लिक संघटनेची स्थापना १९८३ साली झाली होती. राजेशाहीविरुद्ध असलेल्या अनेक छोट्या छोट्या संघटनांना एकत्र करून या बिगर सरकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. यूकेमधील घटनात्मक राजेशाही संपवून त्या जागी केवळ निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेला राज्याचा प्रमुख असावा, अशी मागणी रिपब्लिककडून गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे.
हे वाचा >> ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्यात रत्नजडित मुकुटासह, राजदंड, गदा, कलश, कडी आणि चमचा का वापरतात?
मागच्या काही वर्षांपासून रिपब्लिकच्या सदस्यसंख्येत मोठी वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, जेव्हा प्रिन्स विल्यम्स आणि कॅथरिन ऊर्फ केट यांचा २०१० साली झालेला साखरपुडा आणि २०२१ साली राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हीरक महोत्सवाच्या दरम्यान रिपब्लिकची सदस्य संख्या ९,००० हून थेट ३०,००० वर पोहोचली. २०१५ साली हा आकडा ३५ हजार ऑनलाईन सदस्य संख्येपर्यंत पोहोचला. रिपब्लिकच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटिश राजेशाही ब्रिटनच्या लोकशाही तत्त्व आणि न्यायव्यवस्थेच्या विरोधात आहे.
या संस्थेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, राजेशाही आणखी पुढे सुरू ठेवण्यासाठी कोणतेही सबळ कारण उरलेले नाही. राजेशाही एक भ्रष्ट संस्था आहे. राजेशाहीच्या नादात देशाचा, तुमचा-आमचा पैसा फुकट जात आहे. राजघराण्यातील लोकांचे फिरणे, राजवाड्यातील शाही व्यवस्था आणि राजेशाही जीवनशैलीवर रोजच्या रोज वर्षभर अमाप पैसा खर्च होत आहे. या राजेशाहीपायी देशाला वर्षभरात ३४५ दशलक्ष युरो (भारतीय रुपयांत ३,५६३ कोटी) नाहक खर्च करावे लागतात. हेच पैसे देशाच्या सार्वजनिक सेवा वाढविण्यासाठी खर्च करता येऊ शकतात.
रिपब्लिक संस्थेचे असेही म्हणणे आहे की, राजेशाही अतिशय गुप्त पद्धतीची असून त्यांना शंभर प्रकारच्या सवलती देण्यात आल्या आहेत. पर्यावरणसंरक्षण नियम आणि वर्णभेदीविरोधी कायदे त्यांना लागू होत नाहीत. राजेशाहीमुळे ब्रिटन हे एक प्रभावशाली आणि एक स्वतंत्र राज्य होण्यात अडथळा निर्माण होत आहे.
किंग चार्ल्स राज्याभिषेक आणि आंदोलन
किंग चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेक सोहळ्याआधी रिपब्लिक संस्थेने किंग चार्ल्स आणि राजघराण्याविरोधात आंदोलन करण्याची हाक दिली. किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या घोषणेनंतरच ‘नॉट माय किंग’ हे फलक आणि त्याबद्दलच्या घोषणा पसरविण्यात येत होत्या. राज्याभिषेकाच्या दिवशी संस्थेचे १,७०० सदस्य लंडनमधील किंग चार्ल्स प्रथम यांच्या पुतळ्याजवळ जमले होते. किंग चार्ल्स प्रथम यांचा चारशे वर्षांपूर्वी प्रजासत्ताकवाद्यांकडून (Republicans) खून झाला होता. या वेळी जमलेल्या रिपब्लिकच्या सभासदांनी चार्ल्स आणि राजेशाहीविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
आंदोलकांना जेव्हा त्यांची भूमिका विचारण्यात आली, तेव्हा त्यांनी वेबसाइटवर याचे विवेचन केले असल्याचे सांगितले. वेबसाइटवर लिहिण्यात आले होते की, आम्ही आंदोलन करत आहोत, कारण राज्याभिषेकाचे औचित्य साधून आम्ही राजेशाहीच्या विरोधातली चर्चा पुन्हा सुरू करत आहोत. आपण राजघराण्याचे राष्ट्र नाही, हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे.
हे ही वाचा >> ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांना निमंत्रण; या दोघांमध्ये मैत्री कशी झाली?
ग्रॅहम स्मिथ यांनी अलीकडेच ‘टाइम’ मासिकाशी संवाद साधताना म्हटले होते की, राज्याभिषेक सोहळ्यावर एक दशलक्ष युरो (१० कोटी रुपये) खर्च केले जाणार आहेत, हा करदात्यांच्या पैशांचा चुराडा आहे. स्मिथ म्हणाले की, राज्याभिषेक सोहळ्याऐवजी आम्हाला निवडणूक हवी आहे. चार्ल्सच्या ऐवजी आम्हाला पर्याय निवडण्याचा अधिकार हवा आहे. राज्याभिषेक सोहळा हा निरर्थक खर्च आहे. आज आपल्या देशातील लोक जगण्यासाठी धडपडत आहेत, या संकटाच्या दरम्यान आपण चार्ल्स यांच्या डोक्यावर कोट्यवधीचा मुकुट चढवत आहोत. हे बिलकूल स्वीकारार्ह नाही.
स्मिथ याच मुलाखतीत पुढे म्हणाले, “राजेशाही बेदखल करण्याची हीच योग्य वेळ आहे. आज लोकांच्या मनात क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या कुटुंबाबद्दल सकारात्मक प्रतिमा आहे. मात्र मागच्या वर्षी राणीचे निधन झाल्यानंतर राजघराण्यातील कुटुंबीयांच्या वर्तनात मोठे बदल झाले आहेत. हॅरी आणि अँड्रू यांनी राजघराण्याच्या इभ्रतीला तडे जातील असे वर्तन केलेले आहे. त्यामुळे राजघराण्याची जादू आता राहिलेली नाही. लोकांना त्यांच्यात आणि सामान्य नागरिकांत काहीही फरक दिसत नाही.”
राजेशाहीच्या विरोधातील भावना वाढली
फक्त रिपब्लिक संस्थाच राजेशाही संपविण्याची मागणी करतेय, अशातला भाग नाही. गेल्या काळात झालेल्या एका सर्वेक्षणात समोर आले की, राजघराण्याला आता पूर्वीसारखा पाठिंबा किंवा पूर्वीसारखी लोकप्रियता राहिलेली नाही. राज्याभिषेक सोहळ्याच्या एक महिन्यापूर्वी झालेल्या या सर्वेक्षणात जवळपास ५२ टक्के लोकांना या सोहळ्यात काहीच रस नसल्याचे समोर आले होते, १५ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी राज्याभिषेक सोहळा महत्त्वाचा असल्याचे सांगत समर्थन दर्शविले, २९ टक्के लोकांनी सोहळ्याबाबत सकारात्मक मत नोंदविले, तर २४ टक्के लोकांनी या सोहळ्यात विशेष रस नसल्याचे सांगितले, २८ टक्के लोकांनी या सोहळ्याच्या विरोधात नकारात्मक मतप्रदर्शन केले.
या सर्वेमध्ये राज्याभिषेक सोहळ्यावर होणाऱ्या खर्चासंबंधीदेखील प्रश्न विचारण्यात आला. या वेळी ३७ टक्के लोकांनी सांगितले की, राजघराण्याने राज्याभिषेक सोहळ्यावर होणाऱ्या खर्चाची जबाबदारी उचलली पाहिजे. तर ३६ टक्के लोकांनी सांगितले की, यूके सरकार आणि राजघराण्याने एकत्रितपणे हा खर्च केला पाहिजे, १५ टक्के लोकांनी सांगितले की, यूके सरकारनेच हा खर्च केला पाहिजे, तर १२ टक्के लोकांनी तटस्थ राहत या खर्चाबाबत माहीत नाही, असे उत्तर दिले.
नॅशनल सेंटर फॉर सोशल रिसर्च या संस्थेनेदेखील राजेशाहीबद्दलचा एक सर्व्हे केला होता. या सर्वेक्षणातदेखील राजेशाहीला आतापर्यंतचा सर्वात कमी पाठिंबा मिळाला. यामध्ये दहापैकी केवळ एका ब्रिटिश नागरिकाला राजेशाही खूप महत्त्वाची वाटली. ४५ टक्के लोकांनी सांगितले की, एकतर राजेशाही पद्धत आता रद्दबातल केली पाहिजे किंवा तिला आता फारसे महत्त्व देता कामा नये. मागच्या वर्षी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना गादीवर बसून ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वेक्षण करण्यात आले, तेव्हा हा आकडा ३५ टक्के एवढा होता. एका वर्षाच्या आतच त्यात दहा टक्क्यांनी वाढ झाली. यासोबतच राजेशाहीला महत्त्व देणाऱ्या लोकांच्या संख्येतही २०२२ पेक्षा खूप घट झाली आहे. त्या वेळी ३८ टक्के लोकांना राजेशाही महत्त्वाची वाटत होती, त्यात आता घट होऊन ही संख्या २९ टक्के एवढी झाली आहे. १९८३ पासून केल्या गेलेल्या सर्वेक्षणानुसार या वेळचे आकडे हे सर्वात नीचांकी पातळीवरचे आहेत.