नीट यूजी परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा कक्षाने काही बदल जाहीर केले आहेत. पण परीक्षा तीन महिन्यांवर आलेली असताना बदल केल्यामुळे विद्यार्थी हिताला धक्का बसल्याची चर्चा आहे.
‘नीट यूजी’तील बदल विद्यार्थी हिताचे?
एमबीबीएस, बीएएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमाच्या पदवीपूर्व प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता – सह – प्रवेश परीक्षा (नीट यूजी) महत्त्वपूर्ण समजली जाते. इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम्, मराठी, ओडिशा, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू अशा १३ भाषांमध्ये ही परीक्षा देता येते. नीट परीक्षा अवघ्या तीन महिन्यांवर आलेली असतानाच राष्ट्रीय परीक्षा कक्षाने त्यात काही महत्त्वपूर्ण बदल केल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. नीट परीक्षेत गतवर्षी झालेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर हा बदल योग्य असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. मात्र हे बदल इतक्या उशिरा केल्यामुळे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
परीक्षेच्या पॅटर्नमध्ये कोणता बदल केला ?
करोना कालावधीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय परीक्षा कक्षाने नीट यूजीच्या परीक्षेत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नीट यूजीच्या परीक्षेमध्ये ‘अ’ व ‘ब’ असे दोन विभाग करण्यात आले. ‘अ’ विभागामध्ये ३५ अनिवार्य प्रश्न होते, तर ‘ब’ विभागामध्ये १५ पर्यायी प्रश्न होते. मात्र आता एनटीएने मूळ पद्धतीने परीक्षा घेण्याचा आणि प्रश्नपत्रिकेतून ‘ब’ विभाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नीट यूजीची परीक्षा १८० अनिवार्य प्रश्नांची असणार आहे. यामध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील प्रत्येकी ४५ प्रश्न आणि जीवशास्त्रातील ९० प्रश्न असणार आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना १८० मिनिटांचा म्हणजे तीन तासांचा कालावधी दिला जाणार आहे. तसेच करोनामध्ये देण्यात आलेला अतिरिक्त कालावधीही कमी करण्यात आला आहे. या नव्या परीक्षेच्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना तयारी करण्याचा सल्ला एनटीएकडून देण्यात आला आहे.
अपार कार्डबाबतही नीटकडून गोंधळ?
विद्यार्थ्यांची अचूक ओळख पटवण्यासाठी आणि अर्ज प्रक्रिया सोपी, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी नीट परीक्षा प्रक्रियेत आधार आणि अपार आयडीचा वापर करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा कक्षाने घेतला होता. नीट यूजी २०२५ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याआधी अपार आयडी तयार करून ते आधार कार्डशी संलग्न करण्याची सूचना करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयक सर्व नोंदींसाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या गोंधळामुळे राष्ट्रीय परीक्षा कक्षाला हा निर्णय मागे घ्यावा लागला.
नीट परीक्षेत बदल कधी अपेक्षित ?
गतवर्षी नीट यूजी परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे नीट परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्याची मागणी होऊ लागली होती. त्यानुसार राष्ट्रीय परीक्षा कक्षाकडून काही महत्त्वपूर्ण बदल केले जाण्याची शक्यता होती. मात्र गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या सुमारास हा बदल जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र राष्ट्रीय परीक्षा कक्षाने नीट यूजी परीक्षेला अवघे तीन महिने शिल्लक असताना हा बदल केला. नीट यूजी परीक्षेतील बदलांबाबत मागील दोन आठवड्यांत राष्ट्रीय परीक्षा कक्षाने सहा परिपत्रके जाहीर केली. अचानक घेण्यात आलेला हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी मोठा धक्का होता.
विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय धक्कादायक?
नीट यूजी परीक्षेसाठी वर्षभर तयारी करणारे विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या सरावाला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांनी यंदाही मागील सलग काही वर्षांपासून सुरू असलेल्या परीक्षा पद्धतीनुसार सराव केला. परीक्षेचे स्वरूप बदलण्याचा निर्णय शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला घेतला असता तर त्यांनी त्यानुसार तयारी सुरू केली असती. आता ऐनवेळी परीक्षेचे स्वरूप बदलल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. नव्या बदलानुसार १८० मिनिटांतच परीक्षा द्यावी लागणार असून विद्यार्थ्यांना त्याची तयारी करावी लागणार आहे. हा बदल करताना राष्ट्रीय परीक्षा कक्षाने विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.
या बदलांबाबत न्यायालय काय म्हणते ?
परीक्षा तोंडावर आली असताना राष्ट्रीय परीक्षा कक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसणे शक्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी दिलेल्या सूचनेनुसार परीक्षांमधील बदल विद्यार्थ्यांना किमान सहा महिने आधी कळवायला हवा. मात्र, त्याकडे राष्ट्रीय परीक्षा कक्षाने दुर्लक्ष केले. ‘नीट’ परीक्षेत वारंवार होत असलेल्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी असे कठोर निर्णय घेणे आवश्यकच होते. राष्ट्रीय परीक्षा कक्षाने हा निर्णय घेण्यास इतका विलंब का केला असा प्रश्न निर्माण झाला आहे. परीक्षा तोंडावर असताना इतक्या उशिरा निर्णय घेणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरणार नाही. यावरून आपली शिक्षण व्यवस्था विद्यार्थी केंद्री नसून, यंत्रणा केंद्री असल्याचेही स्पष्ट होते, असे म्हटले जात आहे.
vinayak.dige @expressindia.com