– राखी चव्हाण
महाराष्ट्रात एकीकडे वाघांचे मृत्यू वाढत असतानाच वाघांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील सर्वाधिक वाघ विदर्भात असून त्यात सातत्याने भर पडत आहे. वाघांना त्यांचे क्षेत्र कमी पडत असल्याने आणि लगतच्या क्षेत्रात त्यांना सुरक्षित अधिवास मिळाल्याने वाघ लगतच्या क्षेत्रात जातात. मात्र, बाहेर पडलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. त्यावर तोडगा काढण्यात अद्याप तरी राज्याच्या वनखात्याला यश आलेले नाही.
वाघांची संख्या का वाढते?
वाघांना पुरेसे खाद्य, पाणी आणि योग्य अधिवास मिळाला तर वाघांची संख्या वाढते. भक्ष्याच्या घनतेवर सर्व अवलंबून असते. ताडोबा-अंधारीसारख्या व्याघ्रप्रकल्पात गाभा आणि बफरक्षेत्रासह लगतच्या क्षेत्रातही वाघांना ते मिळत असल्याने वाघांची संख्या वाढत आहे.
एका वाघाला किती क्षेत्र लागते?
एका वाघाला साधारण १५ ते १०० चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. प्रदेशानुसार वाघांना लागणारे क्षेत्र वेगवेगळे असते. मेळघाटसारख्या क्षेत्रात एका वाघाला ४० चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. हीच स्थिती राज्यातीलच नाही तर भारतातील सर्व व्याघ्रप्रकल्पांमध्ये आहे.
वाघ वाढल्यास पर्याय काय?
वाघांचे स्थानांतरण हा एक पर्याय आहे आणि महाराष्ट्रात त्यावर विचारही झाला होता. सर्वाधिक वाघ असणाऱ्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातून काही वाघ इतरत्र टप्प्याटप्प्याने स्थानांतरित करण्याबाबत येाजना होती. त्याचे काय झाले हे अजूनही कुणाला ठाऊक नाही. दरम्यान, बिहारमधून महाराष्ट्राला वाघांची मागणी झाली आणि त्याबाबत बिहारमधील वनखात्याचे अधिकारी व मंत्रालयातील अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक झाली. मात्र, महाराष्ट्राच्या वनखात्याकडून याबाबत पुढे काहीही घडले नाही.
स्थानांतरणाची प्रक्रिया कशी?
वाघांचे स्थानांतरण करताना त्याचे आधीचे क्षेत्र व जिथे पाठवायचे आहे त्या क्षेत्रांमध्ये समानता असायला हवी. म्हणजेच त्यांचा अधिवास जुळायला हवा. याशिवाय भक्ष्याची घनता आणि पाणी हा देखील महत्त्वाचा विषय आहे. वनखात्याने अशी क्षेत्र ओळखून ठेवायला हवीत. महाराष्ट्राने हे केले नसले तरीही शेजारच्या मध्य प्रदेशात अशी क्षेत्रे ओळखून ठेवण्यात आली आहेत. म्हणून संघर्षातील जेरबंद केलेला वाघ पुन्हा जंगलात सोडायचा असेल तर निर्णय घ्यायला वेळ लागत नाही. महाराष्ट्रात संघर्षातून जेरबंद केलेले वाघ सोडण्याची हिम्मतच खात्याचे अधिकारी दाखवत नाही. कातलाबोडी, तासमध्ये वाघीण सोडताना तत्कालीन वनाधिकाऱ्यांनी तातडीने घेतलेले निर्णय अलीकडचे अधिकारी घ्यायला धजावत नाहीत.
वाघाचे हल्ले का?
वाघाने माणसांवर केलेले ९० टक्के हल्ले जंगलात, तर १० टक्के जंगल आणि गावाच्या सीमेवर होतात. व्याघ्रकेंद्रित पर्यटन आणि जंगलालगतच्या गावांचे जंगलावरील अवलंबन यामुळे वाघांचा माणसांशी जास्त सामना होेेतो. परिणामी माणसांना टाळण्यासाठी ते जंगलाबाहेर पडतात आणि शेतीसह जंगलालगतच्या गावात प्रवेश करतात. या ठिकाणी मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवतो आणि मग हल्ले घडून येतात. अधिकांश घटनांमध्ये वयात येणाऱ्या वाघानेच हल्ले केले आहेत. वयात आलेले तरुण-तरुणी ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट करून पाहतात, तसेच वयात येणारा वाघ असुरक्षिततेच्या कारणावरून मानवावर हल्ले करतो असे एक निरीक्षण आहे.
सरकारचे धोरण कुठे फसते?
गावकऱ्यांचे जंगलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी वनखात्याकडून ‘गॅस-सिलेंडर वाटप’, ‘गावातील प्रत्येक कुटुंबाला शौचालय’ यांसारख्या विविध योजना राबवण्यात येतात, पण अंमलबजावणी पातळीवर सातत्याचा अभाव दिसून येतो. वाघांच्या अधिवासाची सुरक्षा, गावकऱ्यांच्या रोजगाराची हमी, गावकऱ्यांचा जंगलावरील हक्क या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून केवळ व्याघ्रकेंद्रित पर्यटनावर सरकारचा भर आहे. जंगलाशेजारचे गावकरी प्रामुख्याने मोहफुले वेचण्यासाठी व तेंदुपाने गोळा करण्यासाठी जंगलात जातात. या दोहोंच्या विक्रीतून त्यांना पैसा मिळतो. वनउपज गोळा करणे आणि त्याची विक्री करणे हेच गावकऱ्यांचे रोजगाराचे स्वरूप आहे. ते बदलायचे असेल तर त्यांना रोजगाराच्या पर्यायी संधी देणे गरजेचे आहे.
राज्यातील वाघ आणि बछड्यांची संख्या किती?
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्था, देहरादून यांच्या अभ्यासानुसार राज्यात सुमारे ३१२ वाघ व १६५ बछडे असून यातील ६४ टक्के अर्थात २०० वाघ व ५४ टक्के अर्थात ८९ बछडे एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ३० बछडे तर कोअर क्षेत्रात २५ बछडे आहेत. चंद्रपूर वनविभाग, ब्रह्मपुरी वनविभाग व मध्य चांदा वनविभागात एकूण ३४ बछडे आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षही येथे मोठ्या प्रमाणात आहे.
महाराष्ट्रातील व्याघ्रप्रकल्प आणि त्यांचे एकूण क्षेत्रफळ
मेळघाट व्याघ्र प्रकल्प – २७६८.५२ चौरस किलोमीटर
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प – १७२७.५९ चौरस किलोमीटर
पेंच व्याघ्र प्रकल्प – ७४१.२२ चौरस किलोमीटर
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प – ११६५.५७ चौरस किलोमीटर
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प – ६५३.६७ चौरस किलोमीटर
बोर व्याघ्र प्रकल्प – १३८.१२ चौरस किलोमीटर
rakhi.chavhan@expressindia.com