Nutan career after marriage: अभिनेत्री नूतनचे मन मोहून टाकणारे सौंदर्य विसरणे जवळपास अशक्यच आहे. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तिने पडद्यावर पदार्पण केले. हमारी बेटी (१९५०) हा तिचा पहिला चित्रपट. हा चित्रपट शोभना समर्थ यांनी दिग्दर्शित केला होता. रुपेरी पडद्यावर तिला पाहण्याचे भाग्य लाभलेल्या प्रेक्षकांच्या मनावर तिने कायमस्वरूपी छाप सोडली.
करीना कपूर खान, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट या अलीकडच्या पिढीतील पण यांच्याही तब्बल ६५ वर्षे आधी नूतनने विवाहित अभिनेत्रीच्या करिअरबद्दलच्या पारंपरिक समजुतीला यशस्वी छेद दिला. विवाहानंतर अभिनेत्रींचे करिअर संपुष्टात येते हा १९६० च्या दशकात असलेला जुना समज तिने खोटा ठरवला. लग्नानंतर आणि मुलगा मोहनिश बहलच्या जन्मानंतर तिने पाचपैकी चार फिल्मफेअर पुरस्कार जिंकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या रसिकांना नूतनच्या अभिनयाची कल्पना नाही, त्यांच्यासाठी १९५७ च्या पेईंग गेस्ट चित्रपटातील ‘छोड दो आँचल’ हे गाणं पाहणं पुरेस ठरेल. या गाण्यात नूतनने केवळ आपल्या डोळ्यांच्या हावभावांमधून भावना व्यक्त केल्या आहेत, जणू काही तिला संवादांची गरजच नव्हती. हे गाणं पाहताना आपोआपच चेहऱ्यावर हसू उमटतं. याच श्रेय जात ते त्या गाण्याच्या सुरेल चालीला आणि दुसरे म्हणजे नूतनच्या पडद्यावरील साध्या तरी मोहक अभिनयाला.

मी खूपच सडपातळ होते….

बिमल रॉयच्या बंदिनी आणि सुजाता यांसारख्या अमर चित्रपटांची ती नायिका होती. तिला कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागला होता. आपल्या एका जुन्या मुलाखतीत नूतनने सांगितले होते की, “मी खूपच सडपातळ होते आणि चित्रपटसृष्टीत माझी चेष्टा केली जायची. नूतनचे चित्र काढायचे असेल, तर फक्त एक सरळ रेघ ओढायची असे म्हणायचे. आईला तर वाटायचे की, कदाचित मला क्षयरोग झाला असेल म्हणूनच १७ व्या वर्षी माझ्याकडे इतक्या चित्रपटांच्या संधी असूनही आईने मला स्वित्झर्लंडमधील एका फिनिशिंग स्कूलमध्ये पाठवले.”

छबिलीचे दिग्दर्शन

अभिनेत्री असण्याबरोबरच नूतनला दिग्दर्शनाचीही आवड होती. चित्रपट हा दिग्दर्शकाचे माध्यम आहे, असे ती मानत असे. तिने आपली धाकटी बहीण तनुजाच्या पदार्पणाचा छबिली हा चित्रपट दिग्दर्शित केला. परंतु, तिला त्याचे श्रेय कधीच मिळाले नाही. शोभना समर्थ यांनी याबद्दल सांगितले होते, “नूतन दिग्दर्शन आणि संपादनात खूप चांगली होती. नाव माझे होते, पण छबिली तिनेच दिग्दर्शित केला होता. ती प्रत्येक गोष्टीतच उत्तम होती.”

बौद्धिक संवाद साधणारी अभिनेत्री

चित्रपटसृष्टीतील तिच्या उत्कटतेने त्या काळातील समीक्षकांना मंत्रमुग्ध केलेच. परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिला मान्यता मिळाली. तिच्या मृत्यूनंतर तब्बल दहा वर्षांनी फोर्ब्स मासिकाने बंदिनी मधील तिच्या अभिनयाला ‘भारतीय सिनेमातील २५ महान अभिनयप्रदर्शनां’च्या यादीत स्थान दिले. त्यामध्ये नमूद करण्यात आले होते की, “नूतनच्या अभिनयाची खासियत म्हणजे तिने कोणतीही नाट्यमयता न आणता विविध भावना प्रभावीपणे साकारल्या.” तिच्या सहकलाकारांनीही तिच्या कौशल्याची प्रशंसा केली. देव आनंद यांनी एकदा म्हटले होते की, “नूतन ही मोजक्या अशा अभिनेत्रींपैकी एक होती, जिच्याबरोबर बौद्धिक संवाद साधता येत असे.”

साधी सिनेतारका

नूतन पडद्यावर जितकी साधी वाटायची, तितकीच ती खऱ्या आयुष्यातही साधी होती. १९५८ साली ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिची आई शोभना समर्थ यांनी सांगितले होते की, “ती अतिशय समजूतदार आणि गोड मुलगी आहे, पण मला तिला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागते की, ती एक सिनेतारका आहे. सेटवर सतत मेकअप आणि वेगवेगळ्या पोशाखांमुळे ती कंटाळते, त्यामुळे घरी आल्यावर ती सर्वात जुन्या कपड्यांमध्ये आनंदी असते आणि ती मेकअप करत नाही. अगदी लिपस्टीकही लावत नाही.”

विवाहानंतर सिनेमा

सुरुवातीच्या काळातच नूतनने भारतीय चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षक अभिनेत्रींकडे कशा प्रकारे पाहतात हे समजून घेतले होते. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत तिने स्पष्टपणे सांगितले होते की, “भारतीय चित्रपटांमध्ये लग्न आणि करिअर एकत्र जुळून येत नाहीत. प्रेक्षकांना त्यांची नायिका विवाहित असलेली आवडत नाही…”


तरीही नूतनने आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा उत्तम समतोल राखला. नौदलातील लेफ्टनंट-कमांडर रजनीश बहल यांच्याबरोबर १० ऑक्टोबर १९५९ रोजी तिचा विवाह झाला आणि त्यानंतरही तिचे करिअर व्यवस्थित सुरु राहिले. तिच्याकडे आशयघन भूमिका घेऊन येणारे दिग्दर्शक थांबले नाहीत. प्रत्यक्षात, बंदिनी हा तिच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक होता. तिच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीचे श्रेय तिच्या नवऱ्यालाही जाते. कारण त्याने तिला सांगितले होते की, “तू चित्रकार किंवा लेखिका असतीस, तर मी तुला तुझे काम सोडण्यास सांगितले नसते. तसेच, अभिनेत्री असूनही मी तुला तसे म्हणणार नाही. तुझ्या मनाप्रमाणे चित्रपट कर, पण कमी प्रमाणात आणि योग्य भूमिका निवड.”

शेवट…

नूतनने एकाच वेळी उत्कृष्ट अभिनेत्री, पत्नी आणि आई म्हणून आपले जीवन उत्तमरीत्या निभावले. मात्र, लग्नानंतर ती आई आणि भावंडांपासून दूर झाली. विशेषतः तिचे आणि तिची आई शोभना समर्थ यांच्या नात्यात कटुता आली. त्या दोघींमध्ये निधीच्या गैरव्यवहारासंबंधी कायदेशीर लढाई झाली. तिची धाकटी बहीण तनुजा आईच्या बाजूने उभी राहिली आणि नूतनशी संघर्ष केला. प्रत्यक्षात, शोभना समर्थ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, दोघींमध्ये कधीच जवळीक नव्हती. “त्यांच्या स्वभावात जमीन- अस्मानाचा फरक होता. एक अतिशय अंतर्मुख होती, तर दुसरी स्पष्टवक्ती आणि उत्साही,” असे त्यांनी म्हटले होते. मात्र, मोहनिश बहलने एकदा सांगितले होते की, त्याच्या आजी, आई आणि काकू तनुजा यांनी कधीही त्यांच्या वैयक्तिक मतभेदांचा प्रभाव त्याच्यावर, तसेच त्याच्या चुलत बहिणी काजोल आणि तनीशावर पडू दिला नाही. अखेर १९८३ साली नूतन आणि शोभना यांच्यातील नातं पूर्वपदावर आलं. परंतु, आई-मुलीला एकमेकांबरोबर फारसा वेळ घालवता आला नाही. १९९० साली नूतनला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आणि २१ फेब्रुवारी १९९१ रोजी अवघ्या ५४ व्या वर्षी तिचे निधन झाले. अशाप्रकारे एका तरल अभिनेत्री गाथा पूर्णविराम पावली!