देशात नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांचा परतीचा प्रवास सुरू आहे. सर्वत्र नवचैतन्य भरणार्‍या पावसाळ्यानंतर ऑक्टोबर हिटला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवसभर रखरखते ऊन अन् कोंदट वातावरणामुळे उन्हाळ्याची सुरुवात झाली की काय, असे वाटत आहे. अवकाळी उच्च तापमान आणि वातावरणातील आर्द्रता, यालाच ऑक्टोबर हिट म्हणतात. पावसाळाच्या शेवटी ही विशिष्ट हवामान दर्शविणारी घटना घडते; विशेषतः भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात. हे वातावरण आरोग्यासाठी अधिक धोकादायक मानले जाते; ज्यात उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. ऑक्टोबर हिट म्हणजे नक्की काय? याचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑक्टोबर हिट कशामुळे होते?

ऑक्टोबर हिटमध्ये पावसाळ्यानंतर तापमानात असामान्य वाढ होते; ज्यामुळे उत्तर भारत, महाराष्ट्र व गुजरात यांसारख्या भागांवर परिणाम होतो. ‘उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स’चे वैद्यकीय संचालक डॉ. आबिद अमीन यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’कडे स्पष्ट केले. “त्यामुळे एक अस्वस्थ वातावरण निर्माण होते, जे कोरड्या उन्हाळ्याच्या उष्णतेपेक्षा वेगळे असते.” सामान्यतः, नैर्ऋत्य मोसमी वारे थंडावा वाढवतात, परंतु जसजसे हे वारे कमी होत जातात, तसतसे तापमान अनियंत्रित होऊ लागते. याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला एका तज्ज्ञाने माहिती दिली की, या वाऱ्यांच्या कमकुवतपणामुळे तापमान वाढते आणि वातावरणात दीर्घकाळ आर्द्रता राहते, विशेषत: मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये.

समुद्रकिनार्‍यावरील शहरांना या वातावरणाचा धोका अधिक असतो. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : ‘या’ राज्यात खाद्यपदार्थांच्या दुकानांवर मालकांची नावे लावण्याचे आदेश; काय आहेत राज्यांमधील अन्न सुरक्षा कायदे?

समुद्रकिनार्‍यावरील शहरांना या वातावरणाचा धोका अधिक असतो. काँक्रीट आणि डांबर दिवसा उष्णता शोषून घेतात आणि हळूहळू ती सोडतात; ज्यामुळे मुंबईसारखे मेट्रो शहर आसपासच्या ग्रामीण भागांपेक्षा जास्त उष्ण राहते. उदाहरणार्थ- ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शहरातील तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान वाढते. अलीकडेच भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सांताक्रूझ केंद्रावर ३३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हे तापमान सामान्यतेपेक्षा १.२ अंश सेल्सिअस जास्त असून, आर्द्रतेची पातळी ९० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. पुण्यालाही ऑक्टोबर हिटच्या प्रभावाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता बिघडली आहे.

त्याचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?

ऑक्टोबर हिटचा शरीराला थंड ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो; ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. डॉ. आबिद अमीन यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’कडे स्पष्ट केले की, त्यामुळे डिहायड्रेशन, डोकेदुखी, चक्कर येणे आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांसह अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. ते पुढे म्हणाले, “उच्च आर्द्रतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रित करणे कठीण होऊन दम्यासारखे आजार उद्भवण्याची भीती वाढते. वाढत्या तापमानामुळे रोगप्रतिकार शक्तीदेखील कमकुवत होऊ शकते; ज्यामुळे लोकांना सर्दीसारखे विषाणूजन्य संसर्ग सहज होऊ शकतात. तसेच तुलनेने उष्ण परिस्थितीच्या जास्त संपर्कात येण्यामुळे शरीराचे तापमान बदलते आणि थकवा व उष्माघात यांसारखे आजार संभवतात. दमट हवामानामुळे जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार वाढतो; ज्यामुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. डॉ. अमीन यांनी असेही संगितले की, वृद्ध, मुले, गर्भवती महिला, वैद्यकीय उपचाराखालील व्यक्ती आणि घराबाहेरील कामगार आदींना या वातावरणाचा धोका सर्वाधिक असतो.

ऑक्टोबर हिटचा शरीराला थंड ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो; ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

सुरक्षित कसे राहायचे?

ऑक्टोबर हिटचे दुष्परिणाम टाळण्यासाठी, कमाल उष्ण तापमानावेळी घरात राहणे महत्त्वाचे आहे. “विशेषत: सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान बाहेर जाणे टाळण्याचा प्रयत्न करा आणि पंखे किंवा वातानुकूलन यंत्रणेचा वापर करून तुमचे घरातील वातावरण थंड ठेवा,” असा सल्ला डॉ. अमीन यांनी दिला. आहारशास्त्र व पोषण सल्लागार प्रतीक्षा कदम यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितले की, अशा वातावरणात दिवसभर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याच वेळी त्यांनी अल्कोहोलयुक्त पेये टाळण्याचाही सल्ला दिला.

हेही वाचा : परदेशस्थ भारतीयांना देशाशी जोडणारे OCI कार्ड काय आहे? ओसीआय कार्डधारकांना कोणते विशेषाधिकार असतात?

“कोशिंबीर आणि फळे यांसारखे पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन करणे, आपल्या आहारात थंड पदार्थांचा समावेश करणे आणि आहार संतुलित करणे आवश्यक आहे. जीवनसत्त्वे व खनिजे यांचा उत्कृष्ट स्रोत असणारी फळे आणि भाज्या तुमच्या शरीराला हायड्रेट करतात,” असेही प्रतीक्षा कदम यांनी सांगितले. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ किंवा स्पंज बाथदेखील घेता येतो आणि थंड राहण्यासाठी हलक्या रंगाचे व सैलसर कपडे परिधान करणेही फायद्याचे ठरू शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: October heat how does it affect your health rac
Show comments