ओदिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात २७५ पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला असून साधारण ११०० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहे. हा अपघात देशाच्या इतिहासातील सर्वांत भीषण रेल्वे अपघातांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या अपघाताची वेगवेगळी कारणे सांगितली जात असून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातासंदर्भात केलेल्या भाष्यामुळे वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहेत. केंद्र सरकारने रेल्वे अपघाताच्या चौकशीची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयवर सोपवली आहे. याच पार्श्वभूमीवर ओदिशातील रेल्वे अपघात हा घातपात होता का? हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असावा का? या प्रश्नांची उत्तरं आणि याबाबत वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींची मतं जाणून घेऊ या…
ओदिशातील रेल्वे अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला, जखमींची संख्या किती?
ओदिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात शुक्रवारी (२ जून) सायंकाळी भीषण अपघात झाला. पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रिंकेश रॉय यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. “या रेल्वे अपघातात आतापर्यंत ११०० लोक जखमी झालेले आहेत. यापैकी साधारण ९०० लोकांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर साधारण २०० प्रवाशांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या अपघातात २७८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून यापैकी १०१ प्रवाशांची ओळख अद्यापही पटलेली नाही,” असे रॉय यांनी सांगितले आहे.
हेही वाचा >> विश्लेषण : ‘डब्ल्यूटीसी’ अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड?
रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे नातेवाईक या अपघातावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. काही जण या अपघातामागे घातपात असल्याची शक्यता व्यक्त करीत आहेत. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनीदेखील असाच संशय व्यक्त केला आहे. या अपघाताच्या काही तासांनंतर लगेच त्यांनी घातपाताची शक्यता वर्तवली होती.
ओदिशातील रेल्वे अपघातामागे खरंच घातपात?
ओदिशामधील रेल्वे अपघात झाल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहात जखमींवर लवकरात लवकर उपचार करण्याचे आदेश दिले. तसेच अपघातस्थळाला भेट देऊन बचावकार्य आणि शोधकार्य वेगाने होईल यासाठी प्रयत्न केले. यासह या अपघाताची चौकशी सीबीआयमार्फत करायला हवी, असे विधानही त्यांनी रविवारी केले होते. त्यानंतर या अपघाताची चौकशी आता सीबीआयकडून केली जात असून सोमवारी (५ जून) सीबीआयची १० सदस्यीय चौकशी समिती घटनास्थळावर दाखल झाली होती. या समितीकडून अपघाताच्या कारणाची सखोल चौकशी केली जात आहे.
हेही वाचा >> विश्लेषण : जडेजा की अश्विन; की दोघेही? ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम लढतीत कोणाला मिळणार संधी?
अपघातामागे घातपात असल्याचा अश्विनी वैष्णव यांना संशय
ओदिशा येथील अपघातानंतर अश्विनी वैष्णव यांनी ‘दूरदर्शन’शी बातचीत केली होती. या वेळी त्यांनी अपघाताचे नेमके कारण आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांची ओळख पटलेली आहे, असे सांगितले होते. “अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले आहे. तसेच या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांचीही ओळख पटलेली आहे. हे दुष्कृत्य करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल,” असे अश्विनी वैष्णव म्हणाले होते. तसेच रेल्वे रुळांच्या सांधाबदल यंत्रणेत बदल केल्यामुळे हा अपघात घडला असावा, अशी शक्यताही त्यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना व्यक्त केली होती. तसेच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार रेल्वे सिग्नलची व्यवस्था पाहणाऱ्या ‘इंटरलॉकिंग सिस्टीम’मध्ये मानवी हस्तक्षेपाच्या माध्यमातून बदल करण्यात आल्याचीही शक्यता वैष्णव यांनी व्यक्त केली आहे. वैष्णव यांच्या या विधानानंतर ओदिशामधील रेल्वे अपघात मानवी हस्तक्षेपामुळेच झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा >> विश्लेषण: आता चक्क सिगारेटवरही सावधानतेचा इशारा… कॅनडात सिगारेटविषयी नवे नियम काय आहेत?
रेल्वेचे सिग्नल, रुळांचे सांधेबदल यांच्याशी छेडछाड केली जाऊ शकते का?
अश्विनी वैष्णव यांच्या विधानांनंतर ओदिशातील रेल्वे अपघातामागे घातपात असल्याचे सूचित होत आहे. मात्र असे असले तरी रेल्वेची सिग्नल यंत्रणा तसेच रुळांची सांधेबदल पाहणारी यंत्रणा यामध्ये छेडछाड करता येऊ शकते का, असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत भारतीय रेल्वेत काम करणाऱ्या अनेकांनी महत्त्वाची मतं व्यक्त केली आहेत. एका रेल्वे अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे. “रेल्वे कोठे थांबणार, कोणत्या रुळावरून जाणार हे पाहणाऱ्या यंत्रणेत जोपर्यंत हेतुपुरस्सर हस्तक्षेप केला जाणार नाही, तोपर्यंत रेल्वेचा मार्ग मुख्य रुळावरून (मेन लाइन) अन्य रुळावर (लूप लाइन) बदलता येऊ शकत नाही,” असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. “इंटरलॉकिंग सिस्टीम आणि पॉइंट मशीन यामध्ये बिघाड होणे अशक्य बाब आहे. मात्र बाह्य हस्तक्षेपामुळे या यंत्रणांमध्ये बिघाड होऊ शकतो,” असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने यापूर्वीच म्हटलेले आहे. रेल्वे बोर्डाचे सदस्य जया वर्मा सिन्हा यांनीदेखील अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “रेल्वेची सिग्नल यंत्रणा सांभाळणाऱ्या यंत्रणेत ‘फेल सेफ सिस्टीम’ असते. म्हणजेच रेल्वेच्या सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास सर्वच सिग्नलमध्ये लाल रंग दिसायला लागतो. म्हणजेच सर्व रेल्वेंनी थांबावे, असा यामागे संदेश असतो. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड असल्याचे सांगितले आहे. काही लोकांनी सिग्नल यंत्रणेचे केबल्स न पाहता रुळाच्या परिसरात खोदकाम केलेले असावे. त्यामुळे हा अपघात घडला असावा. मुळात कोणतीही मशीन ही खराब होण्याची शक्यता असते,” असे सिन्हा यांनी सांगितले.
हेही वाचा >> बिहारमधील १७०० कोटींचा पूल पडला की पाडला? एका वर्षात दोनदा पूल कोसळण्याचे कारण काय?
रेल्वे यंत्रणेत छेडछाड? माजी रेल्वेमंत्र्यांचा दावा
रेल्वेचा मार्ग निश्चित करणाऱ्या यंत्रणेत छेडछाड केल्याची शक्यता माजी मंत्री दिनेश त्रिवेदी यांनीदेखील व्यक्त केली आहे. ते पश्चिम बंगालमधील भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. “मला इंटरलॉकिंग सिस्टीम, अन्य यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबत जे ज्ञान आहे, त्यानुसार मला असे वाटते की या यंत्रणेत गंभीर स्वरूपाचे बदल करण्यात आले होते. त्यामुळेच कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात झाला. या बदलांमुळेच ही रेल्वे मुख्य रुळावरून अन्य रुळावर गेली. समोर आलेल्या माहितीनुसार हा एक अपघात नसून घातपात असल्याची माझी १०० टक्के खात्री आहे,” असे त्रिवेदी म्हणाले आहेत. रेल्वेच्या यंत्रणेमध्ये एकाच वेळी अनेक योगायोग येणे अशक्य आहे. इंटरलॉकिंग सिस्टीम बंद पडल्यानंतर त्याच क्षणाला अन्य यंत्रणा आपले काम सुरू करते. या यंत्रणेला ‘फेल सेफ’ म्हणतात. ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर सर्वच सिग्नलमध्ये लाल रंग दर्शविला जातो. परिणामी कोणतीही रेल्वे पुढे प्रवास करत नाही,” असे दिनेश त्रिवेदी यांनी सांगितले.
यंत्रणेत स्वत:हून बिघाड होणे, जवळपास अशक्य?
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बंगळुरू) संस्थेचे माजी विद्यार्थी एस. के. सिन्हा यांनी रेल्वेची सुरक्षितता वाढवण्यासाठी ‘एल२एम रेल’ नावाचे स्टार्टअप सुरू केलेले आहे. त्यांनीदेखील ओदिशातील कोरोमंडल रेल्वेच्या अपघातावर भाष्य केले आहे. मानवी हस्तक्षेपामुळेच हा अपघात झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. “अपघातादरम्यानचा सर्व प्रसंग रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. या सर्व माहितीचा उपयोग अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी करण्यात येईल. रेल्वेचे अधिकारी अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी या माहितीचा वापर करतील, असा मला विश्वास आहे. भारतीय रेल्वेमध्ये वापरण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम ही अतिशय मजबूत आहे. तसेच ही यंत्रणा उभारताना सर्वोच्च खबरदारी घेण्यात आलेली आहे. याच कारणामुळे यंत्रणेत स्वत:हून बिघाड होणे जवळपास अशक्य आहे,” असा दावा एस. के. सिन्हा यांनी केलेला आहे. एखाद्या व्यक्तीने रेल्वे रुळाची मोडतोड केली असावी, हेदेखील अपघाताचे कारण असू शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा >>ओपेक प्लस देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन का घटवले?
रेल्वेची यंत्रणाच सदोष?
रेल्वेचा प्रवास नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेत छेडछाड केली असल्याचा दावा अनेक जण करत आहे. मात्र हा दावा खोटा निघाल्यास काय? असादेखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे यंत्रणेमध्येच काही दोष होता का? हेदेखील सीबीआयकडून तपासले जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात बालासोर येथे अशाच प्रकारची घटना घडली होती. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो अपघात टळला होता. इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये बिघाड असल्याचे जाणवताच संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या लोकोपायलटने बिरूर-चिकजाजूर सेक्शनमध्ये शिवानी आणि रामागिनी दरम्यान रेल्वे थांबवली होती. परिणामी मोठा अपघात टळला होता. १० ऑक्टोबर २०१८ रोजी रायबरेली-लखनौ सेक्शनची मालदा-नवी दिल्ली एक्स्प्रेस हरचंदपूर रेल्वे स्थानकावर रुळावरून घसरली होती. तेव्हा रेल्वे सुरक्षा विभागाचे आयुक्त एस. के. पाठक यांनी यंत्रणेत त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. तसेच या यंत्रणेत योग्य तो बदल करावा, असेही सांगितले होते.
सीबीआयकडे तपास सोपवल्यामुळे मोदी सरकारवर टीका
मोदी सरकारने ओदिशा येथील रेल्वे अपघाताच्या चौकशीची जबाबदारी सीबीआयवर सोपवली आहे. मात्र या निर्णयावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सीबीआयकडून गुन्ह्यांचा तपास केला जातो, रेल्वे अपघाताचा नव्हे; अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. “सीबीआय तसेच अशाच प्रकारच्या अन्य संस्थेकडे तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञ, रेल्वे सुरक्षा, सिग्नल यंत्रणा या क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे अपघाताचे कारण शोधण्यासाठी तसेच अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याची जबाबदारी सीबीआयवर सोपवणे चुकीचे आहे,” असे खरगे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. तसेच केंद्रीय यंत्रणा भाजपाच्या इशाऱ्यावर काम करतात. त्यामुळे या अपघाताची चौकशी ही केंद्रीय एसआयटी टीमकडून न्यायालयाच्या निरीक्षणाखाली केली जावी, अशीही मागणी केली जात आहे.