ओडिशात मोठ्या प्रमाणात वीज कोसळण्याच्या घटना घडतात. २०१५ मध्ये याला राज्य-विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करण्यात आले होते. सततच्या मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांत वीज कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. विजेच्या झटक्यांमुळे झालेल्या इजा आणि मृत्यूपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने ओडिशात २० लाख ताडाच्या वृक्षांची लागवड सुरू केली आहे. महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री सुरेश पुजारी यांनी रविवारी (१८ ऑगस्ट) ‘एएनआय’ला सांगितले की, ओडिशा हे विजेच्या झटक्याने गंभीरपणे प्रभावित झालेल्या राज्यांपैकी एक आहे आणि ताडाचे लागवड केलेले हे वृक्ष पुढे अशा आपत्तीच्या वेळी संरक्षणाचे काम करतील.
“राज्याच्या वन विभागाने राज्यभरात २० लाख ताडाच्या झाडांची लागवड सुरू केली आहे. ही मोहीम राज्यव्यापी करण्याचा आमचा मानस आहे. आमच्या प्रयत्नांद्वारे आम्हाला अशा आपत्तीत मृत्युमुखींची संख्या कमी करायची आहे आणि अखेरीस ती शून्यावर नेता येईल, अशी आशा आहे,” असे पुजारी म्हणाले. या प्रस्तावाला राज्य सरकारने गेल्या महिन्यात मंजुरी दिली होती. झाडांची लागवड करण्याचे कारण काय? खरेच झाडे लावल्याने वीज कोसळण्याचे प्रमाण कमी होईल का? जाणून घेऊ.
हेही वाचा : Kolkata Rape-Murder Case: पॉलिग्राफ चाचणी म्हणजे नक्की काय? कोलकाता प्रकरणात ही चाचणी कशासाठी?
ओडिशात वीज संकटात किती जणांनी गमावले जीव?
गेल्या ११ वर्षांत एकूण ३,७९० जणांना विजेच्या धक्क्याने आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी मागील तीन आर्थिक वर्षांमध्ये विजेच्या झटक्यांमुळे ७९१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात २ सप्टेंबर २०२३ रोजी दोन तासांच्या अंतराने ६१,००० विजेचे झटके नोंदवले गेले; ज्यात किमान १२ लोकांचा मृत्यू झाला. २०२१-२२ मध्ये विजेच्या धक्क्याने २८२, २०२२-२३ मध्ये २९७ व २०२३-२४ मध्ये २१२ लोकांचा मृत्यू झाला. मयूरभंज, केओंझार, बालासोर, भद्रक, गंजम, ढेंकनाल, कटक, सुंदरगढ, कोरापुट व नबरंगपूर या जिल्ह्यांमध्ये वीज पडून सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्य सरकारने २०१५ पासून वीज पडून मृत्यूचा घाला पडलेल्यांच्या प्रत्येक कुटुंबासाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिले आहे.
ओडिशात वीज कोसळण्याचे प्रमाण जास्त का?
ओडिशा हे उष्ण कटिबंधीय विभागामध्ये वसलेले पूर्वेकडील किनारपट्टीचे राज्य आहे. राज्यातील उष्ण, कोरडे हवामान विजेच्या झटक्यांसाठी योग्य परिस्थिती तयार करते. क्लायमेट रेझिलिएंट ऑब्झर्व्हिंग सिस्टीम्स प्रमोशन कौन्सिल (सीआरओपीसी) आणि भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांनी प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवाल २०२३-२०२४ नुसार पूर्व आणि मध्य भारतात सर्वाधिक क्लाउड टू लाईटनिंग (सीजी) झटके म्हणजेच विजेच्या धक्क्यांची नोंद करण्यात आली आहे.
२०२१ मध्ये आयएमडीने प्रकाशित केलेले ‘क्लायमेट चेंज अॅण्ड इन्सिडेन्स ऑफ लाइटनिंग इन ओडिशा : एक्सप्लोरेटरी रिसर्च’ या शीर्षकाच्या शोधनिबंधात विजांचे झटके वाढवण्याला कारणीभूत असलेल्या हवामान बदलाच्या भूमिकेविषयी सांगण्यात आले आहे. त्यामध्ये दीर्घकालीन तापमानवाढ एक अंश सेल्सिअसने वाढल्यास विजेच्या क्रियाकलापांमध्ये जवळपास १० टक्क्यांनी वाढ होते. बालासोर येथील फकीर मोहन विद्यापीठातील भूगोल प्राध्यापक मनोरंजन मिश्रा यांच्या मते, ओडिशा विशेषत: अतिसंवेदनशील आहे. कारण- तेथील विशेष हवामानामुळे पूर्व मान्सून आणि मान्सूनच्या कालावधीत विजा पडण्याचे प्रमाण जास्त असते. समुद्राच्या तापमानाचा प्रभाव असलेल्या चक्रीवादळांचाही यावर परिणाम होतो.
कोणाला सर्वाधिक धोका?
राज्यातील ग्रामीण भागात ९६ टक्के विजेच्या झटक्यांची नोंद केली जाते. त्याचा फटका शेतकरी आणि शेतमजुरांसारख्या रोजंदारीवर काम करणाऱ्यांनाच मोठ्या प्रमाणात बसतो. ओडिशातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या शेती व इतर संबंधित कामांवर अवलंबून आहे आणि ते मोकळ्या शेतात अनेक तास काम करीत असतात; ज्यामुळे ते विजेच्या झटक्यांच्या तडाख्यात सापडण्याचा धोका निर्माण होतो. एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान सर्वाधिक वीज कोसळण्याच्या घटनांची नोंद करण्यात आली. मात्र, सर्वाधिक मृत्यू जून ते ऑक्टोबर यादरम्यानच्या पिकाच्या कृषी हंगामात नोंदवले गेले.
ताडांमुळे ओडिशा विजेच्या संकटापासून बचाव करू शकेल?
इतर झाडांच्या तुलनेत ताडाची झाडे (पाल्म ट्री) उंच असतात. झाडांच्या या उंचीमुळे जेव्हा वीज कोसळते तेव्हा जमिनीवरील लोकांचे रक्षण होते. कारण- या झाडांमध्ये जास्त आर्द्रता आणि रस असतो,ज्यामुळे ती झाडे विजेला स्वत:कडे खेचून घेऊ शकतात आणि जमिनीवर विजेचा होणारा थेट परिणाम कमी करू शकतात. विशेष मदत आयुक्त कार्यालयाने प्रस्तावित योजनेसाठी सात कोटी रुपये मंजूर केले आहेत. सध्या अस्तित्वात असलेली ताडाची झाडे तोडण्यावर राज्याने बंदी घातली असून, ताडाची १९ लाख झाडे सुरुवातीला जंगलांच्या सीमेवर लावण्यात येणार आहेत. तज्ज्ञांनी या प्रस्तावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि अधिक व्यापक व आधारभूत धोरणाची मागणी केली आहे. एका ताडाच्या झाडाला २० फूट उंची गाठण्यासाठी किमान १५ ते २० वर्षे लागतात, असेही मिश्रा यांनी नमूद केले आहे. वीज पडल्यानंतर काही झाडांना आग लागण्याचीही भीती आहे.
हेही वाचा : Kolkata Doctor Rape and Murder : भारतातील डॉक्टरांना केंद्रीय संरक्षण कायद्याची गरज का आहे?
ओडिशाने विजेच्या झटक्यांचा अंदाज घेण्यासाठी सावधानपूर्व प्रणालीचा अवलंब केला आहे आणि मीडिया व सोशल मीडियाद्वारे तसा संदेश प्रसारित केला आहे. तर, समीक्षकांचे म्हणणे आहे की, विजेच्या झटक्यांचा अचूक अंदाज लावला जाऊ शकत नाही. ग्रामीण भागातील रहिवाशांना शिक्षित करण्यासाठी विजेच्या धक्क्यांपासून वाचण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याबद्दल व्यापक जनजागृती आवश्यक आहे.