ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील क्ले कोर्टवर खेळविल्या जाणाऱ्या एकमात्र फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत या वेळी बहुतेक लढती इतक्या लांबत आहेत, की पहाटेपर्यंत दिवसाचे सत्र चालूच ठेवावे लागत आहे. पहाटेपर्यंत खेळल्यानंतर पुन्हा नव्या फेरीसाठी कोर्टवर परतावे लागत असल्यामुळे टेनिसपटूंना विश्रांतीपासून मुकावे लागत आहे. यामुळे आता खेळाडू आणि त्यांच्या बरोबरीने व्यावसायिक खेळाडूंच्या संघटनेने यावर उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लढती लांबण्यामागचे नेमके कारण काय?

ग्रॅण्ड स्लॅमसारख्या प्रमुख स्पर्धांमध्ये दिवसाचा एकूण कालावधी आणि सामन्यांची संख्या यांचा मेळ घालताना संयोजकांना कायम तारेवरची कसरत करावी लागते. एकदा कार्यक्रम निश्चित केल्यावर तो सहसा बदलला जात नाही. ठरलेल्या कार्यक्रमानुसार हे सामने होत असतात. पण, कधी पाऊस, तर कधी अतिउष्णता यामुळे सामन्यांवर परिणाम होतो. त्यामुळे काही सामने स्थगित करून हवामान सुरळीत झाल्यावर पुढे खेळविण्यात येतात. हे सामने लांबल्यामुळे पुढील सामन्यांना उशीर होतो. या वेळी फ्रेंच ओपन स्पर्धेत पावसामुळे सामन्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले आणि फ्रेंच स्पर्धेत वेळेचे बंधन नसल्यामुळे दिवसाचा कार्यक्रम पूर्ण करावा लागत असल्यामुळे लढती लांबल्या.

हेही वाचा >>> विश्लेषण : हिंजवडी आयटी पार्क आता न आवडे कुणाला… पायाभूत सुविधांअभावी कंपन्यांचे स्थलांतर?

नैसर्गिक व्यत्यय हेच एकमेव कारण?

नैसर्गिक व्यत्ययामुळे लढती लांबणे साहजिक असले, तरी कित्येकदा लढती रंगतदार अवस्थेत खेळल्या गेल्यामुळेदेखील कालावधी लांबतो. महिलांच्या लढती फारशा लांबत नाहीत. कारण, मुळातच या लढती अधिकतम तीन सेटमध्ये खेळल्या जातात. पण, त्यांना त्यांच्या आधी खेळविल्या गेलेल्या लढती लांबल्या, तर त्याचा फटका बसू शकतो. पुरुषांचे सामने अधिकतम पाच सेटमध्ये खेळविले जातात. त्यामुळे एखादा सामना रंगलाच आणि पाचव्या सेटपर्यंत गेल्यास लढतीचा कालावधी लांबतो. त्यात पाचवा सेटला टायब्रेकर नसल्यामुळे हा कालावधी लांबतो. परिणामी, पुढील सामना सुरू होण्यास उशीर होतो.

फ्रेंच स्पर्धेत दिवसाचा कालावधी अनिश्चित?

फ्रेंच स्पर्धाच नव्हे, तर कुठल्याच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेला दिवसाच्या कालावधीचे बंधन नसते. याला अपवाद फक्त विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा ठरतो. विम्बल्डन स्पर्धा ही केवळ नैसर्गिक प्रकाशात खेळविली जाते. तेथे विद्युत प्रकाशझोताचा वापर केला जात नाही. त्यामुळे विम्बल्डनमधील स्पर्धा रात्री ११ नंतर खेळविल्या जात नाहीत.

हेही वाचा >>> इंदिरा गांधींच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारची ४० वर्षे! सुवर्ण मंदिरावर का करावी लागली कारवाई?

खेळाडू का नाराज?

ग्रॅण्ड स्लॅमसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळताना प्रत्येक खेळाडू विजेतेपदाच्या ईर्ष्येने खेळत असतो. प्रत्येक सामना ते अंतिम सामना समजून खेळत असतात. अशा वेळी दोन सामन्यांदरम्यान खेळाडूंना विश्रांती मिळणे आवश्यक असते. पुरेशी झोप मिळाली नाही, तर त्याचा परिणाम खेळाडूंच्या एकूण आरोग्यावर पडू शकतो. टेनिस विश्वातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खेळाडू तंदुरुस्तीवर अधिक लक्ष केंद्रित करत असतात. त्यामुळे खेळाडूंकडून अशा वेळापत्रकाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेत तिसऱ्या फेरीत जोकोविच आणि मुसेटी यांच्यातील सामना रात्री १०.३० वाजता सुरु झाला. सामना इतका रंगला, की तो संपला तेव्हा पहाटेचे ३.३० वाजले होते. पहाटेपर्यंत खेळल्यावर जोकोविचला लगेच चौथ्या फेरीसाठी तयारी करणे आवश्यक होते. त्यासाठी पुरेशी विश्रांती त्याला मिळाली नाही.

लांबलेल्या लढतीचा त्रास आणखी कोणाला?

स्पर्धेमध्ये खेळाडू, प्रेक्षक, बॉल बॉय, कोर्ट अधिकारी, पंच, लाइनमन असे प्रत्येक जण जोडले गेलेले असतात. सामने लांबल्यावर रात्रीच्या झोपेबरोबरच या सर्वांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर येत असल्याने या मुद्द्याकडे अनेक जण लक्ष वेधत आहेत. सामने पाहायला येणारा चाहता वर्ग हा कुठे ना कुठे काम करतच असतो. त्यामुळे प्रेक्षकांनादेखील आपले पुढचे नियोजन करण्यात अडचणी येतात. त्याचबरोबर थेट प्रक्षेपणाचा कालावधीदेखील लांबल्यामुळे या आघाडीवर वेगळ्याच प्रश्नाला सामोरे जावे लागते.

तोडगा काढण्यासाठी काय प्रयत्न?

संयोजक काही तरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असतोच. पण, यात लगेच यश येत नाही. हा मुद्दा मुळात गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे तातडीने तोडगा शोधण्यासाठी कुणी पुढे येताना दिसत नाहीत. अनेक मतमतांतरे यामध्ये दिसून येत आहेत. एक भाग म्हणजे पुरुषांच्या लढती पाच सेटऐवजी तीन सेटमध्ये करण्याचा एक मतप्रवाह पुढे येत आहे. पण, असे झाल्यास खेळातील रंगत निघून जाईल, असेही काही जण म्हणत आहेत. त्यामुळे पर्याय शोधताना कुणाचे एकमत होताना दिसून येत नाही.  

dnyanesh.bhure@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oksatta analysis why tennis players expressed dissatisfaction with match schedule in french open print exp zws