जगातील सर्वाधित आयुर्मान असलेला प्राणी कासव आहे, हे बहुतेकांनाच ठाऊक आहे. उभयचर असलेला हा प्राणी १०० वर्षांपेक्षाही अधिक काळ जगू शकतो. मात्र दक्षिण अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना या बेटावर राहणारे जोनाथन हे कासव सध्या १९३ वर्षांचे आहे. म्हणजे राजेशाहीपासून लोकशाहीपर्यंत आणि सामाजिक क्रांतीपासून डिजिटल क्रांतीपर्यंत अनेक ऐतिहासिक घटना पाहणारा हा ‘कच्छप’ प्राणी सध्या जगातील सर्वाधिक आयुर्मान असलेला जिवंत प्राणी आहे. या जोनाथन कासवाविषयी…
जोनाथन कासव… सर्वांत दीर्घायुषी प्राणी
दक्षिण अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना या दुर्गम बेटावरील जोनाथन हे कासव राहते. सेशल्स जाइंट टॉरटाइज (अल्डाब्राचेलिस गिगांटिया होलोलिसा) या प्रकारातील हे महाकाय कासव सध्या सर्वाधिक आयुर्मान असलेला जिवंत प्राणी ठरते. जोनाथनचा जन्म १८३२ मध्ये झाला. म्हणजे सध्या ते १९३ वर्षांचे आहे. वयस्कर असूनही जोनाथन सक्रिय राहते आणि इतर कासवांसह खाणे, सूर्यस्नान करणे आणि बागडणे यात दिवस आनंदाने घालवते. सेंट हेलेनाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, जोनाथनची काळजी घेणारे पशुवैद्य डॉ. जो हॉलिन्स म्हणाले की त्याने दृष्टी आणि वास घेण्याची क्षमता गमावली आहे. परंतु तरीही ते त्याच्या काळजीवाहकांना ओळखते. केळी, गाजर आणि कोशिंबिर हा त्याचा आवडता आहार असून ते नियमित त्याचे सेवन करते.
जोनाथनचा थोडक्यात इतिहास…
पूर्व आफ्रिकेमधील सेशल्समधून जोनाथनला १८८२ मध्ये सेंट हेलेना या बेटावर आणले गेले, त्यावेळी ते ५० वर्षांचे होते. जोनाथन ज्या प्रजातीचे कासव आहे, त्या प्रजातींची कासवे साधारण १५० वर्षांपर्यंतच जिवंत राहू शकतात. परंतु जोनाथनने हा आकडा केव्हाच पार केला आहे. जोनाथनला सेंट हेलेना बेटावर आणले, त्यावेळी त्याची तीन भावंडेही त्याच्यासह होती. मात्र ती ५० वर्षांपेक्षा अधिक काळ जगू शकली नाही. मात्र जोनाथन मात्र दीर्घायुषी ठरले. सेंट हेलेनाच्या गव्हर्नर निवासस्थानीच जोनाथन अधिक काळ राहिले आहे. १९३० मध्ये तत्कालीन गव्हर्नर स्पेंसर डेव्हिस यांनी या कासवाला जोनाथन असे अधिकृत नाव दिले. १९३ वर्षांचे आयुर्मान असलेल्या जोनाथनने जगातील अनेक घटना पाहिल्या आहेत. त्याचा जन्म झाला, त्यावर्षी पहिले मराठी वृत्तपत्र सुरू झाले, ब्रिटनमध्ये सुधारणा कायदा अमलात आला, अमेरिकेत अध्यक्षयीय निवडणूक होऊन अँड्रू जॅक्सन निवडून आले. या कासवाने दोन महायुद्धे, ३९ अमेरिकी अध्यक्ष आणि कित्येक देशांचे राष्ट्रप्रमुख पाहिलेत. भारताचे स्वातंत्र्ययुद्ध, स्वातंत्र्य आणि त्यानंतर १५ पंतप्रधान पाहिलेत. सध्या मोतीबिंदूमुळे त्याची दृष्टी गेली असली तरी ते अजूनही सक्रिय आहे.
इतकी वर्षे जगण्याचे रहस्य काय असावे?
कासवांचे उल्लेखनीय दीर्घायुष्य बहुतेकदा मंद चयापचय किंवा भक्षकांपासून बचाव करण्यास मदत करणारे संरक्षक कवच यांच्याशी जोडलेले असते. अधिक हालचाल नसल्याने त्यांची कमी ऊर्जा खर्चिली जाते. त्याशिवाय संरक्षक कवच असल्याने इतर प्राण्यांच्या हल्ल्यापासूनही बचाव होतो. जोनाथन ज्या प्रजातीमध्ये जन्मले ते प्राणी साधारण १५० वर्षे जगतात. मात्र जोनाथनला सेंट हेलेनाच्या गर्व्हनरकडून सांभाळले जाते. त्याचा आहार, त्याची प्रकृती याची विशेष काळजी घेतली जाते, त्यामुळे ते त्याच्या प्रजातीतील इतरांपेक्षा अधिक जगले.
सर्वाधिक दीर्घायुषी प्राणी कोणता?
आतापर्यंत सर्वाधिक आयुष्य लाभलेला प्राणी ‘मिंग द क्लॅम’ हा होता. तो एक समुद्री शिंपला (आर्क्टिका आयलंडिका) होता. समुद्री शिंपला हा माशांचा एक प्रकार आहे. हा प्राणी अंदाजे ५०७ वर्षे जगला, असा जीवशास्त्रज्ञांचा दावा आहे. २००६ मध्ये या प्राण्याचा अभ्यास करत असताना शास्त्रज्ञांकडून चुकून तो मारला गेला. ५०० वर्षांपूर्वी जन्मलेल्या या शिंपल्याच्या जन्मावेळी चीनमध्ये मिंग राजवंश होता. त्यावरून त्याचे नाव मिंग असे ठेवण्यात आले. तो आइसलँडजवळील थंड पाण्यात राहायचा.
इतर विक्रमी दीर्घायुषी प्राणी
कासव हा जमिनीवरील सर्वाधिक जगणारा प्राणी असला तरी समुद्रातील अनेक जिवांचे आयुर्मान अधिक असते. ग्रीनलँड शार्क (सोम्निओसस मायक्रोसेफलस) हा महाकाय मासा २०० ते ५०० ते वर्षे जगण्याचा अंदाज आहे. खोल समुद्रात आढळणारा हा शार्क पृथ्वीवरील सर्वात जास्त काळ जगणारा पृष्ठवंशी प्राणी मानला जातो. काही शास्त्राांना ग्रीनलँड शार्क सापडला, जो सुमारे ४०० वर्षे जुना असल्याचा अंदाज आहे. त्याशिवाय बोहेड व्हेल (बालेना मिस्टिकेटस) हा २०० वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेला जलचर असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. हा सर्वाधिक आयुर्मान असलेला सस्तन प्राणी आहे. मिंग शिवाय समुद्रातील काही शिंपले ४०० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आढळले आहेत. रफआय रॉकफिश (सेबास्टेस अल्युटियनस) हे खोल समुद्रातील मासे २०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असू शकतात, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. मंद चयापचय, खोल समुद्रातील अधिवास किंवा संरक्षक कवच यांमुळे हे प्राणी अधिक जगतात. ग्रीनलँड शार्क हा प्राणी तर अत्यंत हळूहळू वाढतो. (दरवर्षी १ सेमीपेक्षा कमी) ज्यामुळे त्यांना त्यांचे आयुष्य इतर बहुतेक प्राण्यांपेक्षा खूप जास्त असते. sandeep.nalawade@expressindia.com
© The Indian Express (P) Ltd