Odisha to Guhagar Olive Ridley turtle journey: पंचतंत्रातील ससा आणि कासवाच्या स्पर्धेची कथा सर्वांनाच माहीत आहे. या कथेतील सशाचा फाजील आत्मविश्वास आणि त्यामुळे त्याची झालेली हार तर दुसऱ्याबाजूला धीम्यागतीने जाणारे कासव कुठेही मार्ग न चुकता आपले ध्येय साध्य करते. ही जरी बोधकथा असली तरी या कथेतील एक लहानसे कासव प्रत्यक्षात ४५०० किमी प्रवास करून भल्या मोठ्या समुद्राला वळसा घालून ओडिशाहून थेट महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर पोहोचले आहे.

यावर्षीच्या सुरुवातीला महाराष्ट्र वन विभागाच्या स्वयंसेवकांना रत्नागिरीच्या गुहागर समुद्रकिनाऱ्यावर एक कासव अंडी घालताना आढळले. त्या कासवाचं जवळून निरीक्षण केल्यावर लक्षात आलं की, त्या कासवाच्या पुढच्या दोन्ही परांवर धातूचे टॅग लावले आहेत. त्यामुळे या कासवाची तत्काळ ओळख पटण्यास मदत झाली. या कासवाची ओळख ऑलिव्ह रिडले-०३२३३ अशी करण्यात आली आहे. कोण आहे हे कासव? आले कुठून? आणि त्याचा हा प्रवास महत्त्वाचा का ठरतोय याचाच घेतलेला हा आढावा.


कष्टप्रद प्रवास

या कासवाने ४,५०० किलोमीटरचा एक अत्यंत कष्टप्रद प्रवास केला आहे. चक्क ओडिशातील गहीरमाथा येथून त्याने आपल्या प्रवासाला सुरुवात केली. म्हणजेच भारताच्या पूर्व किनाऱ्यावरून प्रवास करत श्रीलंकेभोवती वळण घेत हे कासव उत्तरेला जाफनापर्यंत, तिथून पुन्हा वळून तिरुवनंतपुरमपर्यंत आणि मग पश्चिम किनाऱ्याने पुढे सरकत शेवटी गुहागरच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले.

सर्वोत्तम मार्गशोधक

गुहागरच्या पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यावर हे कासव अंडी घालण्यासाठी थांबले. त्याने १२५ अंडी घातली त्यापैकी १०७ अंड्यातून पिल्लं बाहेर आली. ०३२३३ क्रमांकाचा टॅग ZSI ने १८ मार्च २०२१ रोजी गहीरमाथा समुद्री वन्यजीव अभयारण्यात दिला होता. त्या वर्षी सुमारे १२,००० ऑलिव्ह रिडले कासवांना त्यांचे स्थलांतर आणि अन्न शोधण्याचा मार्ग ट्रॅक करण्यासाठी असे टॅग लावण्यात आले होते. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या स्थलांतराचे अशाप्रकारे पहिल्यांदाच दस्तऐवजीकरण करण्यात आले. या जातीच्या कासवांना उत्तम मार्गशोधक (नॅव्हिगेटर) म्हणून ओळखले जाते.

पहिली दुर्मीळ नोंद

या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसने वन्यजीव संस्था भारत (WII), देहरादून येथील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. सुरेश कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या पीएचडी संशोधनाचा भाग म्हणून ते ऑलिव्ह रिडले कासवांच्या हालचाली आणि स्थलांतराचा अभ्यास करतात. या कासवाचा प्रवास त्यांच्या अपेक्षेपलीकडचा होता. यासंदर्भात ते म्हणाले, “मी कधीच कल्पना केली नव्हती की, हे कासव पूर्व किनाऱ्यावरून पश्चिम किनाऱ्यापर्यंत जाऊ शकते. हे कदाचित दुर्मीळ नसेल, पण ही पहिली नोंद असावी. आपल्याला या जाती स्थलांतर करतात, हे माहित नव्हते.”

पर्यायी मार्गही घेतला असावा

पुढे ते म्हणाले,”शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की, या कासवाने श्रीलंकेला वळसा घालून ४,५०० किमीचा प्रवास केला. हे ऑलिव्ह रिडले कासवांसाठी एक परिचित खाद्यशोध क्षेत्र आहे. परंतु, हेही शक्य आहे की, त्याने रामेश्वरम बेटाला तामिळनाडूच्या मुख्य भूमीशी जोडणाऱ्या पंबन मार्गाने एक छोटा आणि पर्यायी मार्ग घेतला असेल.

अरिबाडा

ZSI च्या डॉ. बसुदेव त्रिपाठी यांनी कासव ०३२३३ ला टॅग केले होते. ते म्हणतात की, महाराष्ट्रातील गुहागरच्या किनाऱ्यावर या कासवाचा शोध लागल्यामुळे ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडी घालण्याच्या पद्धतींबाबत नव्या शक्यता समोर आल्या आहेत. हे कासव सामूहिक अंडी घालतं. या पद्धतीला अरिबाडा म्हणतात. यात हजारो कासवांच्या मादी एकाच वेळी किनाऱ्यावर मुख्यतः ओडिशाच्या किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी एकत्र येतात. त्रिपाठी म्हणतात की, आतापर्यंतच्या संशोधनानुसार ऑलिव्ह रिडले कासवं पूर्व श्रीलंकेतून ओडिशाच्या किनाऱ्यावर येत होती. त्यानंतर सुमारे सहा महिने ते याच किनाऱ्यावर राहतात आणि समूह अंडी घालून पुन्हा परत जातात.

पश्चिम किनाऱ्याचे संवर्धनही आवश्यक

“हे विशिष्ट कासव गुहागरच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आले होते. याचा अर्थ असा की, सर्व ऑलिव्ह रिडले कासवं अंडी घालण्यासाठी ओडिशा किंवा पूर्व किनाऱ्यावरच जातात असे नाही. काही कासवं पश्चिम किनाऱ्याकडेही स्थलांतर करतात. याचा अर्थ आपल्याला केवळ पूर्व किनाऱ्यांचेच नव्हे तर पश्चिम किनाऱ्यांचेही संरक्षण करणे आवश्यक आहे,” असं ते म्हणाले. “एकाच कासवाच्या हालचालींवरून आपण ठोस निष्कर्ष काढू शकत नाही. त्याचा प्रवास अपघाती होता की नैसर्गिक, हे जाणून घेण्यासाठी अधिक कासवांना टॅग करणे आवश्यक आहे.”

कासवांचे टॅगिंग

तज्ज्ञ सांगतात की, त्या कासवाने किती वेळात हे अंतर पार केले आणि नेमका कोणता मार्ग घेतला, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. कारण त्या कासवाला पॅसिव्ह फ्लिपर टॅग लावलेला होता. सॅटेलाइट टॅग नव्हता. फ्लिपर टॅग सामान्यतः टायटॅनियम किंवा इनकोनेलसारख्या धातूंनी तयार केलेले असतात. एका बाजूला क्रमांक आणि दुसऱ्या बाजूला परत पाठवण्याचा पत्ता असतो. सॅटेलाइट टॅग हे कासवाच्या कवचावर लावलेले रेडिओ ट्रान्समीटर असतात. दोन्ही प्रकारचे टॅग स्थलांतर नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी वापरले जातात. परंतु, सॅटेलाइट टॅग प्रत्येक कासवाच्या मार्गाविषयी सविस्तर माहिती देतात, तर फ्लिपर टॅगची माहिती केवळ त्या कासवाला पुन्हा पकडल्यावरच मिळते. ZSI चे त्रिपाठी सांगतात की, फ्लिपर टॅग अधिक वापरले जातात कारण ते खर्चिक नाहीत. सॅटेलाइट टेलिमेट्रीचा वापर केल्यास प्रवासाचा नेमका मार्ग समजू शकतो. परंतु, त्यासाठी लागणारा खर्च फारच जास्त असल्याने त्याचा वापर फार मर्यादित आहे.

आता महाराष्ट्रातही टॅगिंग

ओडिशामध्ये, दरवर्षी हजारो ऑलिव्ह रिडले कासवं अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. तिथे २०२१ ते २०२३ दरम्यान फ्लिपर टॅगिंग करण्यात आले. जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांवर फ्लिपर टॅगिंग सुरू करण्यात आले. देहरादूनच्या WII संस्थेच्या सहकार्याने. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत राज्याच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या किमान ६४ कासवांना टॅग करण्यात आले आहे. महाराष्ट्रात ही कासवं अलीबाग, आंजर्ले, गुहागर आणि रत्नागिरीच्या इतर किनाऱ्यांवर सामान्यतः अंडी घालण्यासाठी येतात.

‘दोनदा अंडी घालण्याची’ पद्धत

शास्त्रज्ञ सांगतात की, टर्टल ०३२३३ च्या शोधामुळे कासवाची ‘दोनदा अंडी घालण्याची’ पद्धत समजली. त्याने ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडी घालण्याच्या पद्धतींबाबतच्या विद्यमान ज्ञानात भर पडली आहे. ओडिशामध्ये या कासवांनी जे वर्तन दर्शवले होते. त्याच्या अगदीच विरुद्ध वर्तन गुहागर येथे दाखवले. गुहागरमध्ये या कासवाने एकट्याने अंडी घातली. महाराष्ट्र वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह साउथ कोकण विभागाच्या (कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभाग) वन अधिकारी कांचन पवार यांच्याशी इंडियन एक्स्प्रेसने संपर्क साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, “जेव्हा टीमला धातूचे रिंग सापडले, तेव्हा त्यांनी आम्हाला बोलावले. त्यांनी आम्हाला फ्लिपर टॅगचे फोटो पाठवले. त्यावर झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ZSI) असे नाव होते. नंतर, आम्ही तपशील तपासले. तेव्हा लक्षात आले की, या कासवाला ओडिशामध्ये टॅग करण्यात आले होते.”

…तर परत मागोवा घेता येईल

गुहागर येथे अंडी घालून झाल्यावर कासव समुद्रात परत गेले. या वर्षी सुमारे १,००० टॅग केलेली कासवं ओडिशाच्या गंजाम किनारपट्टीवरील रुशिकुल्या समुद्रकिनाऱ्यावर परत आली आहेत. जर हे कासव ओडिशाच्या किनाऱ्यावर परत आले तर आपण त्याचा मागोवा घेऊ शकतो, असे ZSI चे त्रिपाठी सांगतात.

शिवाय या महिन्याभरात फ्लिपर टॅगिंग केलेल्या इतर तीन माद्यांनीही अंडी घालण्यासाठी गुहागरच्या किनाऱ्याची निवड केल्याची नोंद कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाने केली आहे. “जर आपण कासवाच्या अधिक माद्यांना ‘फ्लिपर टॅगिंग’ करू शकलो, तर या माध्यमातून अधिक ठोस आणि उपयुक्त माहिती मिळण्यास मदत होईल. या नोंदीमुळे सागरी कासवांच्या जीवनक्रमाबद्दल अधिक माहिती मिळत आहे, जे त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे मत कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी व्यक्त केले आहे.