२०२४ च्या ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ २६ जुलै रोजी लेडी गागा, अया नाकामुरा आणि सेलिन डीओन यांच्या नृत्याविष्काराने झाला. त्यानंतर या उद्घाटन सोहळ्यात ड्रॅग क्वीन्स आणि नर्तकांचा ˈटॅब्लो’ होता. कलाकारांनी सादर केलेल्या या कलाकृतीचे साधर्म्य विख्यात चित्रकार लिओनार्डो द विंचीच्या Renaissance- रेनेसाँ या प्रसिद्ध चित्राबरोबर असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये, समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या टॅब्लो आणि या सोहळ्यातील LGBTQ कम्युनिटीचा सहभाग यासाठी कौतुक केले, तर अनेकांनी त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या सोहळ्यात धार्मिक प्रतिमांचा वापर केल्याचा आरोप आयोजकांवर करण्यात आला आहे. त्यासंदर्भात पॅरिस २०२४ च्या प्रवक्त्यांकडून माफीही मागितली गेली. त्याच पार्श्वभूमीवर नेमका वाद काय आहे? या सोहळ्यातील कलाकृती नेमकी कोणाशी साधर्म्य दर्शवते याचा घेतलेला हा आढावा.
ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात ‘द लास्ट सपर’चा संदर्भ कुठे आला? आणि लोकांकडून नाराजी का व्यक्त केली जात आहे?
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही ख्रिश्चन गटांनी ऑलम्पिक उद्घाटनादरम्यान धार्मिक प्रतिमेचा वापर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. इस्लामिक देशांकडूनही या गोष्टीला विरोध करण्यात येत आहे. हे प्रतिकात्मक दृश्यांकन अपमानजनक मानलं जात असून, अनेक प्रायोजकांनी त्यामुळेच ऑलिम्पिक २०२४ मधून काढता हात घेतला. उद्घाटन सोहळ्यादरम्यान लिओनार्डो द विंचीच्या ‘द लास्ट सपर’ या प्रसिद्ध चित्राची नाट्यमय प्रतिकृती सादर केल्याचा आरोप आयोजकांवर करण्यात आला आहे. या संदर्भात ऑलिम्पिक आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले की, भावना दुखावण्याचा त्यांचा कुठलाही हेतू नव्हता. जे झाले, ते अनावधानाने घडलेले आहे. ड्रॅग परफॉर्मर्सचा एक गट, एक ट्रान्स मॉडेल आणि नग्न गायक फिलीप कॅटरिन यांनी रेनेसाँच्या चित्राशी साम्य असलेल्या झांकीसमोर पोज दिल्यानंतर या वादाला तोंड फुटले.
१४९० साली ‘द लास्ट सपर’ ही अभिजात धार्मिक चित्रकलाकृती तयार करण्यात आली. हे चित्र मिलान शहराच्या सांता मारिया देले ग्राझी ह्या चर्चमधील एका भिंतीवर रंगवलेले असून ते जगातील सर्वात प्रसिद्ध व सर्वात अभ्यासल्या जाणाऱ्या कलाकृतींपैकी एक आहे. ह्या चित्रामध्ये येशू ख्रिस्त व त्यांचे १२ शिष्य यांदरम्यान घडलेल्या अखेरच्या जेवणावळीचा प्रसंग चितारण्यात आला आहे. ऑलिम्पिक उदघाटन सोहळ्यादरम्यान त्याच पद्धतीचे दृश्य उभे करून ट्रान्स मॉडेल, नग्न गायक दाखवून धार्मिक प्रतिकांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप आयोजकांवर करण्यात आला आहे.
उद्घाटन समारंभात ‘द लास्ट सपर’ चा संदर्भ का देण्यात आला?
उद्घाटन सोहळ्यातील दृश्य पाहून अनेकांना लिओनार्डो द विंचीच्या चित्राची आठवण आलेली असली तरी प्रत्यक्षात या चित्राचा आणि त्या दृश्याचा काहीही संबंध नसल्याचे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून त्यांनी या विषयी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार उदघाटन सोहळ्या दरम्यान सादर करण्यात आलेले दृश्य हे ग्रीक देव डायोनिस याचे होते, त्याला वाईन तयार करणारा, सृजनतेचा आणि परमानंदाचा देव मानले जाते. डायोनिस टेबलवर आला कारण तो उत्सवाचे प्रतिनिधित्त्व करणारा ग्रीक देव आहे, असे उद्घाटन समारंभाचे संचालक थॉमस जॉली यांनी रविवारी, २८ जुलै रोजी BFMTV ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. सादरीकरणादरम्यान उभे करण्यात आलेल्या दृश्यात फ्रेंच रत्न मानला गेलेला आणि सेक्वानाचा पिता असा वाईन तयार करणारा देव दाखविण्यात आला. शिवाय, सीन नदीशी जोडलेली देवीही दाखविण्यात आली. यामागे मूळ कल्पना पेगन पार्टीची होती, ज्याचा संबंध पर्वतांचा देव ऑलिम्पसशी आहे!
या वादानंतर ऑलिम्पिक आयोजक आणि कलाकार काय म्हणाले?
सादर करण्यात आलेली कलाकृती ‘द लास्ट सपर’ वर आधारित नाही असे सांगण्यात येत असले तरी पॅरिस २०२४ च्या प्रवक्त्या ऍनी डेस्कॅम्प्स यांनी लोकांची माफी मागितली आहे. एका पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या “आमचा कोणत्याही धार्मिक गटाचा अनादर करण्याचा हेतू कधीच नव्हता. त्याउलट मला वाटते की, थॉमस जॉली यांनी खरोखरच समुदाय सहिष्णुता साजरी करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला विश्वास आहे की, ती अपेक्षा पूर्ण झाली आहे. तरीही आमच्याकडून काही चूक झाली असेल, तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.” या उद्घाटन सोहळ्यात नग्न आणि निळ्या रंगात असणाऱ्या फिलिप कॅटरिनने उद्घाटन समारंभात दिलेल्या योगदानाबद्दल अभिमान असल्याचे सांगितले. फिलिप कॅटरिन म्हणाला “मला याचा अभिमान वाटला, कारण ही माझी संस्कृती आहे. आपला समाज वेगवेगळ्या लोकांचा समुदाय आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने जगतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तसे करण्याचा अधिकार आहे. मला ते करायला आवडले,” तो पुढे म्हणाला, “जर आपण नग्न आहोत, याचा अर्थ युद्ध होणार नाही, कारण आपल्याकडे शस्त्र नाहीत!”