२०२४ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये होणार आहेत. २६ जुलै ते ११ ऑगस्ट या दरम्यान पार पडणाऱ्या या क्रीडा स्पर्धांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते. यंदा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ‘ब्रेकडान्सिंग’ या नव्या खेळप्रकाराचा समावेश केला जाणार आहे. सर्फिंग, स्केटबोर्डिंग आणि स्पोर्ट्स क्लायबिंग अशा काही खेळप्रकारांचा २०२१ साली टोकियोमध्ये आयोजित केलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आला होता. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, २०३६ साली भारतातील अहमदाबादमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. त्यावेळी भारताच्या क्रीडा मंत्रालयाकडून या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये योग, टी-२० क्रिकेट, कबड्डी, स्क्वॅश आणि बुद्धिबळ अशा काही खेळांचा समावेश केला जाऊ शकतो. एखादा नवा खेळ ऑलिम्पिकमध्ये कसा समाविष्ट केला जातो, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : अमेरिकी शिष्टमंडळाची दलाई लामा भेट चीनला इतकी का झोंबली?

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये एखादा खेळ समाविष्ट करण्याचा निकष काय आहे?

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (International Olympic Committee – IOC) ही ऑलिम्पिकमधील खेळांचे नियोजन करते. या स्पर्धांबाबतचे सर्व निर्णय या समितीकडून घेतले जातात. इतर अनेक निर्णयांसोबतच, प्रत्येक स्पर्धांमध्ये कोणते खेळप्रकार असावेत वा कोणत्या नव्या खेळप्रकारांचा समावेश करण्यात यावा, याचाही निर्णय ही समितीच घेत असते. याबाबतचे निर्णय त्यांच्या वार्षिक सत्रांमध्ये घेतले जातात. प्रत्येक स्पर्धांसाठीचे ठिकाण ठरवण्यापूर्वीच हे निर्णय घेतले जातात.

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये एखादा नवा खेळप्रकार समाविष्ट करण्यासाठीचे निकष काय आहेत?

१. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मान्यता दिलेल्या आंतरराष्ट्रीय महासंघाकडून त्या खेळाचे नियमन होत असले पाहिजे.

२. ऑलिम्पिकचे काही नियम आणि तत्त्वे आहेत. या नियमांनुसारच ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन आणि नियोजन केले जाते. खेळ प्रकार समाविष्ट करण्यासाठी हे नियम आणि तत्त्वे मान्य असली पाहिजेत.

३. खेळ प्रकारांसाठी जागतिक उत्तेजक-विरोधी संहिता (World Anti-Doping Code) लागू असते. ही संहिता सर्व देशांमधील सर्व खेळ प्रकारांना लागू असते. त्या संहितेतील उत्तेजकविरोधी धोरणे, नियम आणि तत्त्वे मान्य असतील तर ऑलिम्पिकमध्ये खेळ प्रकार समाविष्ट करता येतो.

४. स्पर्धेमध्ये होणारी लबाडी रोखण्यासाठी ‘ऑलिम्पिक मूव्हमेंट कोड’ (Olympic Movement Code) तयार करण्यात आले आहेत. खेळ प्रकारात होणारी कोणत्याही स्वरूपातील फसवणूक रोखण्यासाठी आणि खेळातील प्रामाणिकपणाचे जतन करण्यासाठी लागू करण्यात आलेले हे नियम मान्य असायला हवेत.

या निकषांमध्ये बसणारे खेळ कसे निवडले जातात?

जगभरातील प्रेक्षकांना ऑलिम्पिककडे अधिकाधिक आकर्षित करून घेण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले. तसेच स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या, खर्च आणि इतर सगळ्या गुंतागुंतीच्या बाबींचे योग्य पद्धतीने नियमन करण्यासाठी हे बदल करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, या बदलांमुळेच आयोजन समितीला स्पर्धा प्रकारांमध्ये अधिक खेळ समाविष्ट करण्याचीही परवानगी मिळाली.

हेही वाचा : पूनम पांडे, दु:खाचे भांडवल आणि लक्ष वेधण्याचा प्रकार; ‘सॅड फिशिंग’बाबतचे नवे संशोधन काय सांगते?

ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणाऱ्या देशाला आपले म्हणणे मांडता येते का?

होय. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती स्पर्धांसाठीच्या आयोजनसाठीचे शहर निश्चित करते. त्या देशाची राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (National Olympic Committee – NOC) आयोजन समितीची निर्मिती करते. ही समितीच नव्या खेळ प्रकारांचा समावेश करण्याबाबतचे निर्णय घेते. उदाहरणार्थ, टोकियो २०२० च्या आयोजन समितीने पाच खेळ प्रकारांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये सर्फिंग, कराटे, स्पोर्ट्स क्लायंबिग, स्केटबोर्डिंग आणि बेसबॉल/ सॉफ्टबॉल यांचा समावेश होता. सर्फिंग, कराटे आणि स्पोर्ट्स क्लायंबिग यंदाच्या ऑलिम्पिकमध्येही असणार आहेत. पॅरिसच्या आयोजन समितीने त्याला संमती दिली आहे.

पॅरिस २०२४ च्या स्पर्धांमध्ये कोणते नवे खेळप्रकार समाविष्ट असतील?

पॅरिस २०२४ च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ब्रेकिंग किंवा ब्रेकडान्सिंगला खेळप्रकार म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे. ऑलिम्पिकच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हा एक शहरी नृत्य प्रकार आहे, जो १९७० च्या दशकामध्ये युनायटेड स्टेट्समध्ये विकसित झाला आहे. या खेळामध्ये १६ मुले आणि मुली एकमेकांच्या विरोधात समोरासमोर उभे राहतील. त्यांच्यामध्ये एकप्रकारे नृत्याची लढाईच होईल. कोणतेही संगीत वाजवले जाईल आणि त्यातून चांगले नृत्य करणारे विजयी ठरतील. हा खेळ ला कॉनकॉर्ड येथे ९ आणि १० ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olympic games paris 2024 how new sports get included in the olympics vsh
Show comments