LGBTQ डेटिंग ॲप ग्राइंडरने त्यांचे ‘एक्सप्लोर’ फंक्शन तात्पुरते प्रतिबंधित केले आहे, याचा अर्थ वापरकर्ते पॅरिसमधील ऑलिम्पिक व्हिलेजच्या भौगोलिक स्थानाचा वापर करून प्रोफाइल शोधू शकणार नाहीत. सध्या जगभरातील किमान १४ हजार खेळाडू ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये आहेत. त्यातील साधारण १५५ LGBTQ खेळाडू यावर्षी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. त्यांच्या सुरक्षतेच्या हेतूने ॲपने हा निर्णय घेतला आहे.
ॲपने म्हटले आहे की, जगात प्रेम आहेच आहे, आपल्या आजूबाजूलाही आहे. परंतु तुम्ही पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेज ग्राइंडरवर स्वाइप करत असाल तर मात्र हे शक्य नाही. LGBTQ डेटिंग ॲप, ग्राइंडरने त्याचे ‘एक्सप्लोर’ फंक्शन प्रतिबंधित केलं आहे. याचा अर्थ वापरकर्ते ऑलिम्पिक व्हिलेज ऑफ लव्ह शहरातील भौगोलिक स्थानाचा वापरकरून प्रोफाइल शोधू शकणार नाहीत. या ठिकाणी सध्या १४ हजार खेळाडू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक गावात ग्राइंडरचा वापर करून शोध घेण्यावर बंदी घातली आहे.
LGBTQ डेटिंग ॲप ग्राइंडरने असा निर्णय का घेतला?
LGBTQ डेटिंग ॲप ग्राइंडरने बुधवारी एका पोस्टमध्ये या गोष्टीचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंची छळवणूक होऊ नये किंवा ते इथे खेळायला आलेले असताना कोणत्याही खटल्यात अडकू नयेत, म्हणून चांगल्या हेतूनच कंपनीने भौगिलिक स्थानाचा वापर करत प्रोफाइलचा शोध घेणारा पर्याय बंद केला आहे. या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, अनेक खेळाडू अशा देशातून येतात की जेथे LGBTQ असणे धोकादायक किंवा बेकायदेशीर आहे. असे असताना अनेकजण या ॲपचा वापर करून LGBTQ खेळाडूची ओळख जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात, तसे होऊ नये हाही एक उद्देश यामागे आहे. ह्युमन राइट्स वॉचच्या मते यावर्षी गेममध्ये सहभागी होणाऱ्या किमान ६७ देशांचे राष्ट्रीय कायदे समलैंगिक संबंधांना अवैध ठरवणारे आहेत.
ग्राइंडरने केलेले बदल
या चिंतेचे निराकरण करण्यासाठी ग्राइंडरने ऑलम्पिक व्हिलेजमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यातील एक बदल म्हणजे ‘शो डिस्टन्स’ हा ऑप्शन ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये असेपर्यंत बंद करण्यात आलेला आहे. म्हणजेच वापरकर्ता जवळपास असणाऱ्या दुसऱ्या वापरकर्त्याला शोधू शकणार नाही. हा ऑप्शन अॅक्टिव्ह करता येऊ शकतो, परंतु डिफॉल्ट सेटिंगमध्ये ऑफ असेल. या माध्यमातून खेळाडूंना LGBTQ म्हणून ओळखले जाण्याची किंवा त्यांचा ठावठिकाणा उघड होण्याची भीती राहणार नाही. दोन आठवड्यांच्या कार्यक्रमादरम्यान ग्राइंडरकडून ऑलिम्पिक वापरकर्त्यांना अमर्यादित डिसॅपिअरिंग संदेश आणि विनामूल्य संदेश पाठविण्यास अनुमती देण्यात आली आहे. अशी वैशिष्ट्ये सहसा पेवॉलच्या मागे असतात. याव्यतिरिक्त, ॲपने खाजगी व्हिडिओ पाठवण्याची आणि निर्दिष्ट क्षेत्रामध्ये स्क्रीनशॉट घेण्याची सोयही तात्पुरती बंद केली आहे. कंपनीने अनेक प्रकारच्या सुरक्षा फीचर्समध्ये वाढ केली आहे. यात अलीकडच्या चॅटच्या अहवालाचा अॅक्सेस देण्यात आलेला आहे. २४ तासांत वापरकर्त्यांना तक्रार करता येणार आहे. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये ॲप वापरण्याच्या संभाव्य धोक्यांबद्दल साप्ताहिक स्मरणपत्रांसह नेहमीच्या जाहिरातीत देखील ग्राईंडरने बदल केला आहे. आउटस्पोर्ट्सनुसार, पॅरिसमधील ऑलिम्पिकमध्ये अंदाजे १५५ LGBTQ खेळाडू सहभागी होत आहेत, ते एकूण १० हजाराहून अधिक खेळांचा भाग आहेत. “LGBTQ+ खेळाडू कुणाच्याही घृणेचे शिकार होणार नाहीत, वा त्यांची बदनामी होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. ,” डेटिंग ॲप कंपनीने म्हटले आहे.
भूतकाळातून शिकवण
ग्राईंडरने घेतलेल्या या निर्णयामागे २०१६ साली घडलेल्या वादाची पाश्वभूमी आहे, २०१६ साली अमेरिकन वृत्तसंस्था असलेल्या डेअली बीस्टने रिओ डी जनेरियो मधील ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये खेळाडूंना भेटण्यासाठी ग्राइंडर वापरल्याबद्दलचा रिपोर्ट दिला होता. “रियोचे इतर ऑलिम्पिक खेळ: स्वाइपिंग” या शीर्षकाच्या लेखात खेळाडूंची नावे उघड केली नाहीत परंतु त्यांचे राष्ट्रीयत्व, उंची इत्यादींबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे नेटकऱ्यांना त्या खेळाडूंची ओळख पटली. वाद वाढल्यामुळे डेली बीस्टने लेख काढून टाकला आणि त्याच्या जागी एका संपादकाच्या एका नोंदीचा समावेश केला, ज्यात खेळाडूंची माफी मागण्यात आली होती. लेखाचा हेतू क्रीडापटूंना हानी पोहोचवण्याचा किंवा LGBTQ समुदायाच्या सदस्यांना कमी लेखण्याचानसला तरी, त्यानंतर जाणवणरा परिणाम महत्वाचा ठरतो. यापूर्वी ग्राइंडरने टोकियो २०२० गेम्स दरम्यान अॅथलीट्सचे प्रोफाईल ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला होता, कारण लोकांनी अॅथलीट्सचे भौगोलिक स्थान काढण्यासाठी या ॲपचा वापर केला आणि नंतर टिक टॉक, X वर त्यांच्या शोधांचे स्क्रीनशॉट प्रसारित केले.
अधिक वाचा: ऑलिम्पिक उद्घाटनावरून वाद का झाला? काय आहे ‘द लास्ट सपर’चा संदर्भ?
लैंगिक ओळखीचा वापर धमकावण्यासाठी
जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि असोसिएशन ऑफ LGBTQ कॉर्पोरेट डायरेक्टर्सचे कार्यकारी संचालक फॅब्रिस हौडार्ट यांनी फॉर्च्यूनला सांगितले की अॅथलिट्सच्या संरक्षणासाठी ॲपने उचलले पाऊल महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्या लैंगिक ओळखीचा वापर काही प्रकरणांमध्ये त्यांना धमकावण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी केला जाऊ शकतो. ऑलिम्पिक खेळाडू असोत किंवा सामान्य लोक या ॲपचा वापर करून त्यांच्यावर हल्ला केला जाऊ शकतो, ही त्यांची जबाबदारी आहे, असे हौडार्टने फॉर्च्यूनला सांगितले. अॅपने असा निर्णय घेतला याचाच अर्थ असा आहे की, त्यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्यांची त्यांना जाणीव आहे.
मार्केट इंटेलिजेंस फर्म सेन्सर टॉवरने नोंदवले की, फ्रान्समधील ग्राइंडरचे डाउनलोड जुलै महिन्याच्या मध्यात स्थिर होते परंतु यात बुधवारी पॅरिसमधील अॅथलिट्सच्या आगमनानंतर २५ टक्क्यांनी त्यात वाढ झाली. सेन्सर टॉवरच्या म्हणण्यानुसार, फ्रान्समध्ये २० जुलै रोजी टिंडर आणि हिंज सारख्या इतर डेटिंग ॲप्सच्या डाउनलोड मध्ये अनुक्रमे १० आणि ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑलिम्पिकमधील खेळाडू बदनाम होऊ नयेत वा त्यांना धमकावले जाऊ नये, कोणत्याही वाईट गोष्टींचा त्यांना फटका बसू नये, यासाठी असे केले जाणार असेल तर त्यासाठी अॅपने उचललेल्या या पावलांचे स्वागतच करायला हवे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.