भक्ती बिसुरे
ओमायक्रॉन परिवारातील नवा सदस्य म्हणून बीए-१ या उत्परिवर्तनाची घोषणा नुकतीच शास्त्रज्ञांकडून करण्यात आली आहे. करोना विषाणू गटामधील, दक्षिण आफ्रिकेतून आलेला सदस्य म्हणजे ओमायक्रॉन होय. त्याचेच प्रामुख्याने महाराष्ट्रातील नवे उत्परिवर्तन म्हणून बीए-१ कडे पाहिले जात आहे. करोना विषाणूच्या डेल्टा या उत्परिवर्तनाने जगभर निर्माण केलेल्या हाहाकारानंतर नवे उत्परिवर्तन किंवा म्युटेशन हा शब्द सर्वाना धडकी भरवत आला आहे. नवे उत्परिवर्तन आले की ते किती घातक ठरणार, ते नवे उत्परिवर्तन नवी लाट आणण्यास कारणीभूत ठरणार का अशी चिंताही निर्माण होते. त्या प्रश्नांचे हे निराकरण..
बीए-१ म्हणजे काय?
जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र आहे. वाढीचा वेग या निकषावर करोनाच्या मागील दोन्ही लाटांपेक्षा हा प्रसार वेगवान असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात बीए-१ या उत्परिवर्तनामुळे करोनाची दुसरी लाट निर्माण करणारे डेल्टा हे उत्परिवर्तन मागे पडत असल्याचे निरीक्षण जनुकीय क्रमनिर्धारणात गुंतलेल्या शास्त्रज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. बीए-१ हे ओमायक्रॉनचे उत्परिवर्तन महाराष्ट्रात करण्यात येत असलेल्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्यांतून निदर्शनास आले आहे. हे ओमायक्रॉनचेच बदललेले रूप असल्याने वाढीचा प्रचंड वेग आणि सौम्य संसर्ग या दोन निकषांवर ओमायक्रॉन आणि बीए-१ या दोघांमध्ये साम्य असल्याचे दिसून येत आहे.
बीए-१ किती धोकादायक?
सध्या राज्यात ज्या करोनाबाधित रुग्णांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येत आहे, त्यांच्यामध्ये संसर्ग निर्माण करण्यास बीए-१ हा ओमायक्रॉन गटातील विषाणू प्रामुख्याने कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णवाढीसही तोच कारणीभूत ठरत असल्याचे मानले तरी तो डेल्टाप्रमाणे गंभीर नाही. बीए-१ किंवा ओमायक्रॉन गटातील संसर्ग असलेल्या रुग्णांना प्रामुख्याने घशात विषाणू संसर्ग होत असल्याचे आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांच्या लक्षणांवरून स्पष्ट होत आहे. ताप, थकवा, मळमळ, डोके, अंग, पाय दुखणे, भूक कमी होणे या बाबी सोडल्यास इतर गंभीर लक्षणे रुग्णांमध्ये आढळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. विशेषत: फुप्फुसांना संसर्ग, त्यातून न्यूमोनियासदृश परिस्थिती निर्माण होणे, कृत्रिम प्राणवायू लावण्याची गरज हे चित्र अद्याप फारसे दिसत नाही. त्यामुळे बहुतांश रुग्ण घरी राहून, साध्या विषाणूजन्य आजाराचे उपचार, विश्रांती आणि चौरस आहाराने बरे होत आहेत. त्यामुळे बीए-१ विषाणू मारक नाही असा सकारात्मक निष्कर्ष निघतो.
बीए-१ ची वाढ डेल्टाला रोखणार?
सध्या महाराष्ट्रात करोनाचे जे रुग्ण आढळत आहेत, त्यांवरून रुग्णांमध्ये झालेला संसर्ग अत्यंत सौम्य प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. त्यावरून राज्यात सध्या दिसणारी रुग्णवाढ ही डेल्टाची नसल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांकडून काढण्यात येत आहे. मूळ ओमायक्रॉनच्या बरोबरच त्याचे बीए-१, बीए-२ आणि बीए-३ अशी तीन उत्परिवर्तने दिसून येत आहेत. त्यांपैकी बीए-१ हे उत्परिवर्तन महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमधील मोठय़ा प्रमाणावर रुग्णांमध्ये संसर्ग निर्माण करत आहे. राज्यात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांच्या जनुकीय क्रमनिर्धारणादरम्यान बहुसंख्य वैद्यकीय नमुने ओमायक्रॉनसदृश बीए-वन संसर्गाचे असल्याचे दिसून येत आहे. मात्र, हे उत्परिवर्तनही ओमायक्रॉनसदृश गटातील असल्याने त्याचा संसर्ग असलेल्या रुग्णांची नोंद ओमायक्रॉनग्रस्त म्हणूनच करण्यात येत आहे. त्यामुळेच बीए-१ हे नवे उत्परिवर्तन डेल्टा या घातक उत्परिवर्तनाला नामशेष करत असल्याचा निष्कर्ष समोर येत आहे.
पण आणखीही नवी उत्परिवर्तने आतापासून दिसताहेत?
डेल्टामुळे जगभर आलेली करोना संसर्गाची लाट ओसरल्यानंतर करोनाचे वादळ शमले असे वाटून जनजीवन पूर्वपदावर आले. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेतून दाखल झालेल्या ओमायक्रॉनने आतापर्यंत सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्येचे रोज नवे विक्रम रचणारा हा विषाणू ओमायक्रॉन आहे असे वाटत असतानाच तो प्रत्यक्षात ओमायक्रॉन परिवारातील नवा सदस्य बीए-१ असल्याचे समोर आले आहे. त्याच वेळी जगाच्या कानाकोपऱ्यांतून आणखी नव्या उत्परिवर्तनांची कुणकुण लागण्यास सुरुवात झाली आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉनचे एकत्रित रूप असलेल्या डेल्टाक्रॉनची चर्चा सायप्रसमधून समोर येत आहे. त्याच वेळी फ्रान्सने आयएचयू या नव्या उत्परिवर्तनाचा इशारा दिला आहे. इस्रायलने आठवडय़ाभरापूर्वीच फ्लू आणि करोनाचे एकत्रित रूप असलेल्या फ्लूरोनाचे सूतोवाच केले आहे. थोडक्यात, ओमायक्रॉन हे करोना विषाणूचे शेवटचे उत्परिवर्तन ठरण्याची शक्यता नाही. मात्र, संसर्गाच्या वाढीचा वेग हा निकष लावला असता ओमायक्रॉन हे शेवटचे घातक उत्परिवर्तन ठरण्याची शक्यता वैद्यकीय जगताकडून वर्तवण्यात येत आहे.
लसीकरणाचे महत्त्व किती? विषाणूचे उत्परिवर्तन झाले तरी त्याचे मूलभूत गुणधर्म कायम राहणार आहेत. त्यामुळे साथीची तीव्रता रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तसेच संसर्ग झाला तरी त्याची परिणामकारकता कमी करण्यासाठी जोखीम गटात मोडणारे ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्त यांचे वेगवान लसीकरण, वर्धक मात्रा देणे याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे नव्या उत्परिवर्तनाचा धोका समजा कमी असला तरी लसीकरणाचे महत्त्व कमी होत नाही.