जगभरातून अनेक प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजाती नामशेषांच्या यादीत गेल्या आहेत. आययुसीएन म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या लाल यादीत नामशेष प्रजातीचा समावेश होतो. अशीच एक सशाची ‘ओमिल्टेमी कॉटनटेल’ ही प्रजातीदेखील नामशेष मानली जात होती. मात्र, १२० वर्षांनंतर ती पुन्हा आढळून आली. वन्यजीव संवर्धक आणि संशोधकांसाठी हा सुखद धक्का ठरला.

नामशेष ‘ओमिल्टेमी कॉटनटेल’ प्रकटली कशी?

एका शतकाहून अधिक काळ, ‘ओमिल्टेमी कॉटनटेल’ ससा इतिहासात हरवला आहे असे मानले जात होते. १२० वर्षांपूर्वी तो शेवटचा दिसून आला. त्यानंतर शास्त्रज्ञांनी त्याला पाहिले नव्हते. दरम्यान, शास्त्रज्ञांनी हात टेकले असले तरी मेक्सिकोच्या सिएरा माद्रे डेल सूर येथील स्थानिक शिकाऱ्यांनी मात्र हा ससा नामशेष झाल्याचे मान्य केले नाही. ते या सशाला मायावी म्हणत आणि हा मायावी ससा अजूनही दाट जंगलात फिरत असल्याचा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे पर्यावरणशास्त्रज्ञ जोस अल्बर्टो अल्माझान – कॅटलान यांना उत्सुकता वाटली आणि पाच वर्षांपूर्वी हे गुढ उकलण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. स्थानिक शिकाऱ्यांच्या आत्मविश्वासामुळे ही गमावलेली प्रजाती पुन्हा मिळवण्यासाठी जागतिक संवर्धन उपक्रम ‘रे : वाइल्ड’ सोबत अल्माझान – कॅटलान आणि त्यांच्या चमुने भागीदारी केली. या सशाचे संभाव्य अधिवास ओळखून त्याचे काळजीपूर्वक नकाशे तयार केले आणि खडकाळ भूभागात खोलवर त्यांनी कॅमेरा ट्रॅपचे जाळे उभारले. तब्बल पाच वर्षांनंतर त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले. या ठिकाणी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये १२० वर्षांपासून नामशेष झालेल्या ओमिल्टेमी कॉटनटेल सशाचे छायाचित्र टिपले. विशेष म्हणजे परिस्थिती प्रतिकूल असतानाही सशाची ही प्रजाती तग धरून असल्याचे सिद्ध झाले.

‘ओमिल्टेमी कॉटनटेल’ इतके महत्त्वाचे का?

‘ओमिल्टेमी कॉटनटेल’ प्रजातीचा ससा आकाराने अतिशय लहान आणि साधा असला तरी पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. सशाची प्रजाती कोणतीही असली तरी तो चारा खाणारा प्राणी आहे. त्यामुळे चारा शोधताना बियाणे इतरत्र पसरतात आणि जंगलात पुन्हा नवी झाडे तयार होतात. सशाच्या विष्ठेतून माती सुपीक होते. जमीन समृद्ध होते आणि त्यामुळे त्याठिकाणच्या वनस्पतीची वाढ चांगली होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे ससे एक महत्त्वाची शिकार प्रजाती म्हणून काम करतात. साप, घुबड, ओसेलॉट्स, प्यूमा आणि कायोटीसह विविध भक्षकांसाठी ते महत्त्वाचे ठरतात. म्हणजेच या भक्षकांसाठी हा ससा अन्नसाखळीचा आधार आहे. ही प्रजाती आता जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे, शास्त्रज्ञ परिसंस्थेतील त्याच्या भूमिकेबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

‘ओमिल्टेमी कॉटनटेल’ प्रजातीचे पुढे काय?

‘ओमिल्टेमी कॉटनटेल’ प्रजातीचा ससा तब्बल १२० वर्षांनंतर सापडला. स्थानिक शिकाऱ्यांचा विश्वास आणि शास्त्रज्ञांची चिकाटी यामुळे नामशेष झालेल्या या प्रजातीचे अस्तित्व पुन्हा सापडले. मात्र, आता हे ससे किती आहेत, त्यांची संख्या काय, भविष्यात या प्रजातीला त्यांचे अस्तित्व टिकवताना त्यांच्यासमोर असणारे धोके हे प्रश्नदेखील उपस्थित होतात. आता जंगलातील त्यांची संख्या किती हे निश्चित करण्याची आणि त्यांच्या पुनरुत्पादन सवयी आणि जगण्याचा दर याचे मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे. जंगलतोड आणि मानवी अतिक्रमणामुळे अधिवास नष्ट होत असल्याने त्यांचे अस्तित्व कायम राखण्याचे आव्हान शास्त्रज्ञांसमोर आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी ही प्रजाती खऱ्या अर्थाने नामशेष होऊ नयेत यासाठी प्रमुख धोके ओळखले पाहिजेत.

संवर्धन यशाचा वाढता कल काय आहे?

अलीकडच्या काही वर्षात ज्या प्रजाती नामशेष झाल्याचे समजले जात आहे, ज्या प्रजातीचा पुनर्शोध वारंवार लागत आहे. त्यामुळे निसर्ग आपण गृहीत धरतो त्यापेक्षा अधिक लवचीक असू शकतो. तब्बल १२० वर्षांनंतर ‘ओमिल्टेमी कॉटनटेल’ प्रजातीच्या सशाचा पुनर्शोध लागला. जगभरात, अशाच प्रकारच्या संवर्धन प्रयत्नांमुळे उल्लेखनीय यशोगाथा समोर आल्या आहेत. भारतात, पिग्मी डुकरे पुन्हा आढळली. दक्षिण अटलांटिकमधील एक दुर्गम बेट असलेल्या ट्रिस्टन दा कुन्हा येथे, संवर्धनवाद्यांनी जगातील दुर्मिळ पक्ष्यांपैकी एक असलेल्या विल्किन्सच्या बंटिंगला वाचवण्यात यश मिळवले आहे. ओमिल्टेमी कॉटनटेल सशाच्या पुनरागमनामुळे हे स्पष्ट होते की, ज्या प्रजाती खूप पूर्वीपासून नष्ट झाल्याचे वाटले, त्या अजूनही अस्तित्वात आहेत. फक्त त्यांना चिकाटीने शोधण्याची गरज आहे. याच पद्धतीने संवर्धन प्रयत्न केले तर आणखी शोध लागू शकतात. यातून एकच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे जगात अजूनही नैसर्गिक आश्चर्ये आहेत, जी अद्याप उघड झाली नाहीत.

शास्त्रज्ञ काय म्हणतात?

अल्झामान – कॅटलॉन यांच्या मते, सशाची ही प्रजाती बियाणे पसरवण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यांची विष्ठा मातीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाची आहे. एवढेच नाही तर ते साप, घुबड, टिग्रिलो, ओसेलॉट्स, प्यूमा आणि कायोटीसारख्या भक्षकांसाठी अन्न साखळीचा आधार आहेत. ‘री : वाइल्ड’च्या क्रिस्टीना ब्रिग्ज यांनी या संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले की, ‘ओमिल्टेमी कॉटनटेल’ ससा पुन्हा कधीही नामशेष होणार नाही याची खात्री करण्यासाठी अल्बर्टो आणि त्यांची टीम काम करत आहे.

rakhi.chavhan@expressindia.com

Story img Loader