९ जून रोजी भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीतील सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह ३० केंद्रीय मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले ५ राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार नसलेले ३६ राज्यमंत्री आहेत. भारत हा संसदीय लोकशाही असून पंतप्रधान हेच खऱ्या अर्थाने देश चालवतात, तर राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात. राज्यघटनेतील कलम ७४ मध्ये, पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन करण्याची तरतूद आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडेच खऱ्या अर्थाने कार्यकारी अधिकार असतात. मंत्रिपदावर येणारा व्यक्ती हा लोकसभा वा राज्यसभा या दोन्हीपैकी एका सभागृहाचा सभासद असावा लागतो. जर तो नसेल तर मंत्रिपदावर आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्या व्यक्तीला या दोन्हीपैकी एका सभागृहावर निवडून यावे लागते. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळालाही हाच नियम लागू पडतो. मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार नसलेले राज्यमंत्री आणि उपमंत्रीही असू शकतात. राज्यघटनेमध्ये असे वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण केलेले नाही. मात्र, ब्रिटिशांच्या पद्धतीनुसार अनौपचारिक पद्धतीने हे वर्गीकरण करण्यात आले आहे. यातील केंद्रीय मंत्र्यांचा दर्जा पंतप्रधानांच्या खालोखाल असतो आणि ते महत्त्वाची खाती सांभाळतात. राज्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांच्या खालोखाल असतात आणि त्यांच्या मदतीसाठी असतात. एखाद्या खात्याचा स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री थेट पंतप्रधानांना बांधील असतात. ते आपल्या खात्याच्या कामकाजाची माहिती वा अहवाल थेट पंतप्रधानांकडे सोपवतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा