Valentines Day: तुमचा व्हॅलेंटाईन डे कसा सुरू आहे? तुमच्या मनातली ड्रिम डेट प्रत्यक्षात साकारु शकलात का? इन्स्टाग्रामवर तुमच्या साथीदाराच्या बरोबरीने कपलगोल्सचा फोटो किंवा रील टाकलंत का? तुमच्या मनातली राजकुमारी किंवा राजकुमार मिळण्याच्या दिशेने तुम्ही ठोस पाऊल टाकलं का? आजचा दिवस कसा साजरा करायचा याचं नियोजन झालंय ना?
सोशल मीडियाच्या जगात प्रेम मिळणं, प्रेम व्यक्त करणं हे सगळंच गुंतागुंतीचं झालं आहे. ऑनलाईन माध्यमात एकापेक्षा जास्त साथीदार असण्याची शक्यताही आहे. प्रेम, आकर्षण, जिव्हाळा यासंदर्भात भावना व्यक्त करण्यासाठी नवनवीन संकल्पना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असतात.
कशा आणि कुठून येतात या संकल्पना? एकाचवेळी इतक्या गोष्टी कशा एकत्रितपणे अस्तित्वात असतात. या संकल्पना किंवा शब्दांमुळे व्यक्त होणं सोपं झालं आहे का? व्हॅलेंटाईन्सशी संबंधित लोकप्रिय संकल्पनांचा आढावा घेऊया.
घोस्टिंग
जवळपास दशकभर घोस्टिंग ही संकल्पना वापरात आहे. एखाद्या व्यक्तीशी असलेले नातेसंबंध अचानक तोडून टाकण्याला घोस्टिंग असं म्हणतात. केवळ प्रेमाचे नातेसंबंध असणाऱ्या युगुलांपुरती ही संकल्पना मर्यादित राहिलेली नाही. मित्रमैत्रिणी, सहकारी, ओळखीपाळखीचे, दूरचे नातेवाईक अगदीच कशाला नोकरीइच्छुक मंडळी या सगळ्यांच्या संदर्भातही ही संकल्पना उपयोगात आणली जाते. घोस्टिंग हा शब्द कसा प्रचलित झाला याविषयी स्पष्ट माहिती नाही पण २०१५ मध्ये अभिनेता शॉन पेन आणि चार्लिझ थेरॉन यांचं ब्रेकअप झालं. चार्लिझने शॉनशी असलेले नातेसंबंध एकदम तोडून टाकले. जवळच्या कोणी बोलणं टाकलं तर राग येणं, चिडचिड होणं साहजिक आहे. पण याचे गंभीर परिणामही पाहायला मिळतात. ज्याच्याशी संबंध तोडले जातात त्या माणसाला नकोसं वाटू शकतं. बाकीच्यांपासून आपण वेगळे झालो आहोत अशी भावना निर्माण होते.
हॉन्टिंग
घोस्टिंग आलं म्हटल्यावर हॉन्टिंग हवंच. तुमचं जवळचं नातं असलेल्या व्यक्तीने थेट बोलणं बंद केलं, मेसेजला उत्तर देणं बंद केलं पण डिजिटल पातळीवर ती व्यक्ती तुमचा पाठपुरावा करते याला हॉन्टिंग असं म्हणतात. इन्स्टा स्टोरी पाहणं, पोस्ट लाईक करणं असं अप्रत्यक्ष पद्धतीने व्यक्त होणं, संवाद साधणं सुरू असतं पण थेट संपर्क केला जात नाही.
रिझ
ऑक्सफर्ड डिक्शनरीने नोंद घेतलेला शब्द म्हणजे रिझ. याचा स्वैर अर्थ होतो- स्टाईल, आकर्षकता. साथीदाराला आकर्षून घेण्याची क्षमता असलेला माणूस. रिझ म्हणजे फक्त शारीरिक आकर्षणापुरतं मर्यादित विषय नाही. रिझ म्हणजे एकप्रकारची क्षमता किंवा कौशल्य. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने केलेल्या मांडणीनुसार गेमिंग आणि इंटरनेट कल्चरच्या माध्यमातून रिझ ही संकल्पना उदयास आली आहे. रिझ हा शब्द किंवा संकल्पना लोकप्रिय करण्याचं श्रेय अमेरिकास्थित युट्यूबर आणि ट्वीच स्ट्रीमर केई केनाट याला जातं. हाऊ टू रिझ पीपल यासंदर्भात त्याने नेटिझन्सना सल्ला दिला होता. त्यानंतर तो शब्द टिकटॉकवर प्रचंड लोकप्रिय झाला.
ब्रेड क्रम्बिंग
नातेसंबंधाबाबत ठोस नक्की असं काहीही ठरलेले नसतानाही एखादी व्यक्ती तुमचं सातत्याने लक्ष वेधून घेते त्याला ब्रेड क्रम्बिंग असं म्हणतात. सोशल मीडियावर एखाद्या पोस्टला लाईक, कधी पोस्ट शेअर करणं, व्हॉट्सअपवर प्रदीर्घ संवाद, अवचित भेटीगाठी पण नातं पक्कं होण्याबाबत काहीही नाही. तुमचं लक्ष कमी झालं किंवा स्वारस्य घटलं असं वाटलं तर अप्रत्यक्ष संवादाचं प्रमाण वाढतं. बरीच वर्ष आता हा शब्द वापरात आहे. सायकॉलॉजी टुडे यानुसार हान्सेल आणि ग्रान्टेल यांच्या गोष्टीत या स्वरुपाच्या संवादाचा उल्लेख होता. आधुनिक जगात अनेक माणसं एकटी पडलेली असताना ब्रेड क्रम्बिंग परिमाणकारक ठरू शकतं.
बेन्चिंग/कुकी जारिंग
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर नात्यात असता पण त्याचवेळी बॅकअप ऑप्शन म्हणून एखाद्याचा विचार करता त्याला बेन्चिंग असं म्हणतात. जेव्हा तुमचं मुख्य नातं काहीसं डळमळीत असतं त्यावेळी असा विचार केला जातो. तुम्ही प्राधान्याने ज्याचा विचार केलेला असतो त्या व्यक्तीने दुर्लक्ष केलं किंवा काही कारणाने नात्यात दुरावा आला तर तुम्ही या राखीव पर्यायाकडे वळता. या शब्दाचा नेमका उमग कुठून झाला हे अद्याप समजलेलं नाही.
सिच्युएशनशिप
केंब्रिज डिक्शनरीने या शब्दाची दखल घेतली आहे. दोन व्यक्तींमध्ये प्रेमळ नातं आहे पण आपण एकमेकांचे साथीदार आहोत हे त्यांनी अद्याप पक्कं केलेलं नाही पण ते फक्त निव्वळ मित्र नाहीत अशा नात्याला सिच्युएशनशिप म्हटलं जातं. कामापुरते मित्र म्हणवले जातात तो प्रकार हा नव्हे. दोन अशी माणसं जी मित्र आहेत पण त्यांच्या नात्याला नाव मिळालेलं नाही. ते एकमेकांचे प्रेमळ साथीदार होऊही शकतात किंवा नाहीही. जेव्हा दोन्ही माणसं नात्याला ठराविक टॅग/लेबल द्यायला उत्सुक नसतात त्या स्थितीलाही हे म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीबरोबर संवाद साधण्यासाठी काय निमित्त साधावं हे लक्षात न येण्यालाही सिच्युएशनशिप म्हटलं जातं. टाईम मॅगझिननुसार मुक्त लेखक कॅरिना सेइह यांनी २०१७ मध्ये ही संकल्पना पहिल्यांदा मांडली.
फूबिंग
सर्वाधिक वापरली जाणारी संकल्पना. साथीदाराऐवजी फोनला प्राधान्य देण्याचा प्रघात. मॅककॅन या ऑस्ट्रेलियातल्या प्रसिद्ध जाहिरात एजन्सीने ही संकल्पना पहिल्यांदा वापरली.
या लेखात आधी ग्रीन फ्लॅग असा शब्द आला होता. अशी व्यक्ती जी तुमच्यासाठी एकदम आदर्श आहे आणि तुम्ही त्या नात्यात पुढे पाऊल टाकावं. कॉबवेब म्हणजे आधीच्या नात्यातल्या आठवणी, तो माणूस हे हळूहळू विसरून जाणं आणि नव्या नात्याची सुरुवात करणं.
इतक्या संकल्पना कशा?
या संकल्पना म्हणजे महासागरातले काही प्रातिनिधिक मोती आहेत. प्रेमासंदर्भातल्या संकल्पना/शब्द यांची यादी न संपणारी आहे. सोशल मीडियामुळे दर काही दिवसांनी नवा ट्रेंड येतो. नवे शब्द रूढ होतात. जुने टाकून दिले जातात. अनेक संभाषणं ही सोशल मीडियावरच्या अॅप्सच्या माध्यमातून सुरू होतात. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वातावरणात, संस्कृतीचा संदर्भ असणाऱ्या माणसांना बोलताना एक सामाईक दुवा म्हणून या संकल्पना जन्माला येतात. या शब्दांचा किंवा संकल्पनांच्या वापरामुळे एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर तेही रोखता येतं. असं घडणारे तुम्ही एकटे आणि पहिले नाही हेही यातून स्पष्ट होतं. सोशल मीडियाचं स्वरुपच असं आहे की एखादा शब्द प्रचंड लोकप्रिय होतो. सोशल मीडिया न वापरणाऱ्या माणसांनाही तो माहिती होतो.
हे शब्द किंवा संकल्पना वापरण्यातून तुमच्या मनातला जोडीदार मिळण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होतं. समविचारी तो किंवा ती कुठे आहे, कोण आहे याची जाणीव होते. डेटिंग अॅप्सचा जन्म झाला तेव्हा बरेचजण प्रोफाईल सर्वसाधारण असं तयार करायचे. सरधोपट प्रोफाईल ठेवल्याने होणारे तोटे समजल्यानंतर अनेकांनी आपले विचार, आचरण यासंदर्भात ठोस माहिती द्यायला सुरुवात केली. त्यामुळे झालं असं की तुमच्यासारखी डेटिंग लिंगो म्हणजे प्रेमासाठी ठराविक शब्द वापरणारी माणसं कोण आहेत हे तुम्हाला समजू शकतं. तुम्ही कदाचित सारखं कंटेट पाहू शकता, वाचू शकता. तुमचे विचार जुळू शकतात. अल्गोरिदमच्या माध्यमातून जोडी जुळण्यापेक्षा नैसर्गिक आचारविचारातून तुम्हाला साथीदार मिळू शकतो.
तिसरं कारण म्हणजे मानसिक आरोग्याबाबत जनजागृती होत आहे तसं काऊंसेलिंग किंवा थेरपी यातून नवे शब्द किंवा संकल्पना जन्माला येतात. भावनिक प्रगल्भता यासंदर्भात अनेक ठिकाणी मनोविश्लेषणातून अनेक नव्या गोष्टी समोर येत आहेत. सोशल मीडियावर लोक व्यक्त होतात तेव्हा नातेसंबंध समजावून देण्यासाठी या संकल्पनांचा-शब्दांचा आधार घेतात. कधीकधी शब्दांचा वापर त्याचा अर्थ समजून न घेता करणं नुकसानदायी ठरू शकतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गॅसलायटिंग. प्रदीर्घ काळासाठी एखाद्या माणसाची आजूबाजूची माणसं, परिस्थिती, स्वत:चे विचार याबद्दल संभ्रमावस्था तयार होणे. सोशल मीडियावर मात्र दोन माणसांचं एखाद्या गोष्टीबद्दल भिन्न मत असेल तर गॅसलायटिंग म्हटलं जातं.