भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या आज ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे ग्रस्त आहे. सूर्यप्रकाश केवळ ऊर्जेचाच नव्हे, तर आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या ड जीवनसत्त्वाचा नैसर्गिक स्रोतदेखील आहे. ड हे असे जीवनसत्व आहे, जे आपल्याला नैसर्गिक सूर्यप्रकाशातून मिळते. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी सर्व पोषक तत्त्वे गरजेची असतात. त्याची कमतरता असेल तर अनेक रोगांचा सामना करावा लागतो. यामधलाच व्हिटॅमिन डी हा आवश्यक घटक आहे. चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचे असते. भारतात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे.
सोमवारी प्रसिद्ध झालेल्या नवीन अहवालातून समोर आले आहे की, नागरिकांच्या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भारत एका मोठ्या सार्वजनिक आरोग्य संकटाच्या उंबरठ्यावर आहे. देशभरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची प्रकरणे वाढत आहेत. अशात इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स (ICRIER) ने, व्हिटॅमिन डी चाचणी, पूरक आहार आणि त्यांची उपलब्धता सुधारण्यासाठी तातडीने धोरणात्मक पावले उचलण्याची मागणी केली आहे. भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता वाढण्याचे कारण काय? याला आरोग्य संकट का म्हटले जात आहे? भारतातील एकूण स्थिती काय? त्याविषयी जाणून घेऊ.
नवीन अभ्यास काय सांगतो?
‘रोडमॅप टू अॅड्रेस व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी इंडिया’ या अहवालात भारतातील व्हिटॅमिन डीच्या एकूण परिस्थितीला ‘साइलेंट हेल्थ क्राइसिस’ म्हटले आहे. हा अहवाल इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स आणि ANVKA फाउंडेशनच्या संशोधकांनी केलेल्या मेटा-विश्लेषणावर आधारित आहे. या अभ्यासात एम्स, आयसीएमआर-एनआयएन आणि पीजीआयएमईआर यांसारख्या प्रमुख वैद्यकीय आणि संशोधन संस्थांमधील तज्ज्ञ यांचा समावेश होता. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेला लाखो लोकांना प्रभावित करणारा ‘साइलेंट हेल्थ क्राइसिस’ म्हटले आहे.
व्हिटॅमिन डी शरीराला न मिळाल्याने केवळ हाडेच कमकुवत होत नाहीत तर त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो आणि कुटुंबांवर व आरोग्य सेवा प्रणालीवर मोठा आर्थिक भारही पडतो. या संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर्स, तज्ज्ञ, उद्योग, नेते आणि संपूर्ण समाजाकडून एकत्रित प्रयत्न आवश्यक आहे,” असे आकाश हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक आणि अभ्यासाचे सह-लेखक डॉ. आशीष चौधरी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “योग्य आहार, जागरूकता मोहिमा आणि आरोग्य धोरणांद्वारे आपण ‘व्हिटॅमिन डी कुपोषण मुक्त भारत’ तयार करू शकतो. ते म्हणाले, हे केवळ सार्वजनिक आरोग्य अभियान नाही तर विकसित भारत २०४७ च्या दिशेने वाटचाल करत असताना निरोगी, मजबूत आणि अधिक उत्पादक भारताच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.” पाचपैकी एका भारतीयामध्ये व्हिटॅमिन डीच कमतरता आहे.
भारताच्या पूर्वेकडील भागात विशेषतः उच्च पातळी दिसून येत आहे. ३८.८ टक्के मुले, नवजात बालके आणि वृद्धांमध्ये ही समस्या चिंताजनक आहे. महिलांमध्ये याचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे आणि ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागात याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश असूनही व्हिटॅमिन डीची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे आणि या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेसाठी कारणीभूत घटक कोणते?
जीवनशैली आणि पर्यावरण : प्रदूषणाच्या उच्च पातळीमुळे नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या व्हिटॅमिन डीसाठी आवश्यक असलेल्या सूर्य किरणांमध्ये अडथळा निर्माण होतो. शहरातील गर्दी आणि घरून काम करण्याच्या सवयीमुळे पुरेसा सूर्यप्रकाश माणसाला मिळत नाही.
आहारातील कमतरता : अंडी, मासे आणि फोर्टिफाइड डेअरीसारखे व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न अनेकांसाठी परवडणारे नाही. केवळ आठ ते १४ टक्के भारतीय शिफारस केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात.
त्वचेचा रंग : गडद त्वचेचा रंग असल्यास व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी तीन ते सहा पट जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. तसेच सनस्क्रीनचा वापर, शरीर झाकणारे कपडेदेखील सूर्यकिरण शोषणात अडथळा निर्माण करतात.
महागड्या औषधी : रुग्णालयातील चाचणीचा खर्च हा जवळजवळ १,५०० पेक्षा जास्त असतो आणि व्हिटॅमिन डीच्या औषधांची किंमत १० टॅब्लेटसाठी ४८ ते १३० दरम्यान असते. हे सर्वांना परवडणारे नाही, त्यामुळे प्रत्येक जण या गोळ्यांचे सेवन करू शकत नाही.
धोरणात्मक आव्हाने : सध्या या संकटाला लक्ष्य करणारा कोणताही राष्ट्रीय कार्यक्रम नाही. अनेक राज्यांमध्ये माध्यान्ह भोजनासारख्या प्रमुख योजनांमध्ये व्हिटॅमिन डीचा समावेश नाही.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांशी संबंधित आजारांपासून ते रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यापर्यंतचे अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवा व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊ शकतो, असा इशारा ‘इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स’ने दिला आहे, त्यासाठी भारताला जागरूकता मोहिमांसारख्या उपक्रमांची आवश्यकता आहे. यावर तातडीने पावले उचलण्यात आली नाही तर देशात आजारांमध्ये वाढ होण्याचा धोका आहे, ज्यामुळे आधीच ताण असलेल्या आरोग्य सेवा व्यवस्थेवर दबाव निर्माण होईल,” असे इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्सचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मिश्रा म्हणाले.
व्हिटॅमिन डीची कमतरता म्हणजे सार्वजनिक आणीबाणी?
व्हिटॅमिन डीची कमतरता ही केवळ एक आरोग्य समस्या नसून ती एक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे, ज्याकडे दुर्लक्ष होत आहे, असे अहवालात म्हटले आहे. तज्ज्ञांनी हा मुद्दा राष्ट्रीय चिंतेचा विषय म्हणून पुन्हा मांडण्याचे आणि त्यावरील उपायांकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. यात शिफारस करण्यात आलेली प्रमुख बाब म्हणजे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची कारणे आणि परिणामांबद्दल जनतेला शिक्षित करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील जागरूकता मोहीम सुरू करणे, हेदेखील आवाहन करण्यात आले आहे.
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता
भारतात पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश असला तरी लोक सूर्यप्रकाश घेण्याकरिता बाहेर पडत नाहीत. बाह्य क्रियाकलापांची अनुपस्थिती हे ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे एक मुख्य कारण आहे. अहमदाबादमधील शाल्बी हॉस्पिटलमधील इमर्जन्सी मेडिसिन आणि क्रिटिकल केअरचे सल्लागार डॉ. मिनेश मेहता यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले की, शहरी भागातील बहुतेक लोक त्यांचा बहुतांश वेळ घरामध्ये, कामावर वा शाळेत घालवतात.
बहुतांशी शरीर झाकलेले कपडे घालणे, सनस्क्रीनचा वाढता वापर, हे पुरेसा सूर्यप्रकाश न मिळण्याचे आणखी एक कारण आहे. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे वायू प्रदूषण. धूर, धुके व धूळ यांचे उच्च प्रमाण थेट सूर्यप्रकाशाला प्रतिबंधित करते आणि यूव्हीबी किरणांना अवरोधित करते, जे त्वचेला ड जीवनसत्त्व तयार करण्यासाठी आवश्यक असतात.