राज्यासह देशाच्या विविध भागांत कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. कांद्याचे दर ८० रुपये किलोवर गेले आहेत. हा तुटवडा किती दिवस राहील, त्याविषयी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कांद्याचा तुटवडा का निर्माण झाला?

दिवाळीनिमित्त नाशिक परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होणारी कांद्याची खरेदी – विक्री आठवडाभर बंद होती. त्यामुळे नाशिक परिसरातून राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यात नियमितपणे जाणारा कांदा गेला नाही. आठ दिवसांचा मोठा खंड पडल्यामुळे खरेदी – विक्री आणि स्थानिक बाजारात कांदा पाठविण्याची साखळी विस्कळीत झाली. मुंबई, पुण्यासह राजधानी दिल्लीतही कांद्याचा तुटवडा जाणवू लागला होता. त्यामुळे कांद्याचे दर ८० रुपये किलोपर्यंत गेले होते. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा जवळपास संपला आहे. अगदी किरकोळ प्रमाणात दोन ते तीन टक्के कांदा शिल्लक आहे. त्याचीही विक्री सुरू आहे. त्यामुळे जास्त काळ टिकणारा, दर्जेदार उन्हाळी कांद्यांची बाजारातील उपलब्धता कमी झाली आहे.

खरीप हंगामातील कांद्याची स्थिती काय?

राज्यात खरीप हंगामात ८६,३४० आणि उशिराच्या खरीप हंगामात १,४१,७३२, अशी एकूण सुमारे २.३० लाख हेक्टरवर कांद्याची लागवड होते. ही कांदा लागवड प्रामुख्याने नाशिक, पुणे, लातूर, छत्रपती संभाजीनगर विभागात होते. राज्याच्या अन्य भागांत फारशी किंवा दखल घेण्याइतकी लागवड होत नाही. यंदा कांदा लागवडीने सरासरी गाठली होती. पण, पावसाळ्यातील चार महिन्यांत सतत पाऊस पडत राहिला. त्यामुळे कांद्याचे पीक चांगले होते. पण, काढणीच्या वेळेत नाशिक, पुण्यासह मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नाशिक परिसरात खरीप कांद्याचे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. एकरी सरासरी साठ क्विंटल कांदे निघतात. यंदा ते जेमतेम १५ ते २० क्विंटल निघत आहेत. अगदीच चांगले पीक असलेल्या आणि पावसाचा फटका कमी बसलेल्या ठिकाणी ३० क्विंटलपर्यंत कांदा निघत आहे. त्यामुळे खरीप कांदाही अपेक्षित प्रमाणात बाजारात येताना दिसत नाही.

हेही वाचा >>> आर्यन झाला अनाया: क्रिकेटर संजय बांगर यांच्या मुलाने केलेली ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ची प्रक्रिया कशी होते? त्याचे दुष्परिणाम काय?

शेतकऱ्यांना किती दर मिळतो, ग्राहकांना किती द्यावा लागतो?

नाशिकमधील पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सोमवारी (११ नोव्हेंबर) उन्हाळी कांद्याला सरासरी ५७०० रुपये क्विंटल आणि लाल कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. नाशिक परिसरातील बाजार समित्यांमध्ये असेच दर आहेत. पण, उन्हाळी कांद्याची आवक फार होत नाही. जेमतेम हजार क्विंटल किंवा त्याहून कमीच आवक होत आहे. खरिपातील लाल कांद्याची आवक बाजार समितीनिहाय दोन हजार क्विंटलच्या घरात आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी होत आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार उन्हाळी कांद्यासाठी प्रतिकिलो सरासरी ५० ते ५५ आणि लाल कांद्यांसाठी सरासरी ४० रुपये किलो दर मिळत आहे. पुणे, मुंबईतील ग्राहकांना दर्जेदार उन्हाळी कांद्यासाठी प्रतिकिलो ७० ते ८० रुपये आणि दर्जेदार लाल कांद्यासाठी ५० ते ६५ रुपये मोजावे लागत आहेत.

हेही वाचा >>> जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?

कांद्याचा तुटवडा आणखी किती दिवस?

महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि काही प्रमाणात पूर्व राजस्थान आणि दक्षिण उत्तर प्रदेशात कांद्याची लागवड होते. पण, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक वगळता अन्य राज्यांत फारसा कांदा होत नाही किंवा या राज्यांमधून महाराष्ट्रात कांदा येत नाही. खरीप हंगामातील कांद्यांची बाजारात आवक हळूहळू वाढेल, त्यानंतर बाजारातील कांद्याची उपलब्धता वाढून टंचाईची स्थिती कमी होईल. पुढील महिनाभर कांद्याचा काहीसा तुटवडा राहणार आहे. पण, दरात खूप वाढ होण्याची शक्यता नाही. खरीप हंगामातील कांद्याची बाजारातील आवक वाढल्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीला कांद्याच्या दरात काहीसा दिलासा मिळू शकेल. दिल्लीच्या १०० किलोमीटर परिसरात म्हणजे अलवर, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशातील कांद्याची काढणी आता सुरू झालेली आहे. त्यामुळे दिल्ली परिसरातही कांद्याचे दर आवाक्यात येतील. उत्तर भारताची कांद्याची गरज भागल्यामुळे राज्यातील कांद्याच्या दरावरील दबावही काहीसा कमी होईल. राज्यात रब्बी हंगामात सरासरी ४.५ लाख हेक्टरवर कांद्याची लागवड होते. नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागात रब्बी हंगामात लागवड जास्त असते. पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे पाण्याची चांगली उपलब्धता आहे, त्यामुळे राज्यात रब्बी हंगामात सरासरी इतकी लागवड होण्याचा अंदाज आहे. रब्बी हंगामअखेर राज्यासह देशभरात कांद्याची उपलब्धता चांगली राहण्याचा अंदाज आहे.

dattatray.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion crisis in maharashtra loksatta analysis how long shortage of onion remain in india zws