प्रथमेश गोडबोले
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या विवाह नोंदणी विभागाने बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ‘विवाह नोंदणी २.०’ ही नवीन संगणक प्रणाली तयार केली आहे. नोंदणी विवाह करून इच्छिणाऱ्या वधू-वरांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून, विनाअडथळा दिलेल्या तारखेनुसार विवाह करता येणार आहे. ही प्रणाली नेमकी काय आणि तिचे फायदे काय हे समजून घ्यायला हवे.
नोंदणी विवाह म्हणजे काय?
विशेष विवाह कायदा १९५४ अन्वये विवाह नोंदणी करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत विवाह नोंदणी २.० ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. प्रचलित भाषेत या विवाहाला ‘कोर्ट मॅरेज’ असे म्हटले जाते. राज्यातील जिल्हा मुख्यालयाचे दुय्यम निबंधक विशेष विवाह नोंदणीचेही काम करतात. मात्र, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांसाठी विवाह अधिकाऱ्यांची स्वतंत्र कार्यालये आहेत. विशेष विवाहासाठी इच्छुक वधू – वर यांना ३० दिवस आधी विवाह अधिकाऱ्याकडे नोटीस द्यावी लागते. ३० दिवसांत कोणतेही आक्षेप प्राप्त न झाल्यास किंवा प्राप्त आक्षेपांमध्ये तथ्य दिसून न आल्यास विवाह अधिकारी नोटीसपासून ९० दिवसांपर्यंत विवाह करू शकतात.
विवाह नोंदणी ऑनलाइन करण्याची पार्श्वभूमी काय?
विशेष विवाह कायदा १९५४ नुसार नोंदणी विवाह करणाऱ्या जोडप्यांना नियोजित विवाहाची नोटीस, वय आणि रहिवास यांबाबत ऑनलाइन नोटीस बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबतची अंमलबजावणी राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून येत्या १ ऑगस्ट २०१८ पासून करण्यात आली आहे. विशेष विवाह नोंदणीसाठी वर आणि वधू यांना विवाह नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोटीस देणे आणि ३० दिवसांनंतर विवाह करणे, अशा दोन कामांसाठी जावे लागते. त्यामुळे नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रिया नियोजित वर किंवा वधू यांना विवाह नोंदणी अधिकारी कार्यालयात न जाता कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. याकरिता ‘आयजीआर महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर दुवा (लिंक) उपलब्ध आहे.
विश्लेषण : ‘चंद्रयान-३’ मोहीम काय आहे?
जुन्या प्रणालीत काय अडचणी होत्या?
राज्यात पुणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या तीन ठिकाणीच विवाह नोंदणीची स्वतंत्र कार्यालये आहेत. त्यानुसार ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून शुल्क भरणे, नोटीस, तारीख आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाणपत्र आदी प्रक्रिया ऑनलाइन प्रणालीद्वारेच होत असली, तरी ही प्रणाली कालबाह्य झाली होती. त्यामुळे ऐन विवाहाच्या दिवसाची तारीख देऊनही सर्व्हर बंद पडणे, बायोमॅट्रिकमध्ये अडथळे, छायाचित्र अपलोड करताना विलंब, अशा विविध तांत्रिक अडचणींचा सामना अधिकाऱ्यांना करावा लागत होता. तांत्रिक अडथळे निर्माण होताच राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राकडे (एनआयसी) तक्रार करावी लागत असून, त्यांच्याकडून दुरुस्ती झाल्यावरच पुढील प्रक्रिया पार पाडली जात होती. या सर्व प्रक्रियेमध्ये वधू-वरांना तारीख मिळाल्यानंतरही विवाहाचा ‘मुहूर्त’ टळला, तरी ताटकळत बसावे लागत होते. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने एनआयसीवर अवलंबून न राहता स्वत:च ‘विवाह नोंदणी २.०’ प्रणाली विकसित केली आहे.
विवाह नोंदणीतील वेळ वाचवणे शक्य आहे?
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणीप्रमाणेच विशेष विवाह नोंदणी प्रक्रियेचे संगणकीकरण केले आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विवाह नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरवर जोडण्यात आली आहेत. विवाह नोंदणी अधिकारी कार्यालयात आल्यानंतर माहिती भरण्यामध्ये (डाटा एण्ट्री) पक्षकारांचा वेळ जाऊ नये आणि त्यामध्ये चुका होऊ नयेत, याकरिता डाटा एण्ट्री करण्याची सुविधा विभागाने ‘आयजीआर महाराष्ट्र जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
नोंदणी विवाहाची प्रक्रिया कशी आहे?
ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुलभरीत्या करता यावी याकरिता विवाह नोंदणी २.० प्रणाली निर्माण करण्यात आली आहे. या प्रणालीचा वापर करून विवाहेच्छुक वधू – वर विवाह अधिकाऱ्याकडे ऑनलाइन पद्धतीने नोटीस देऊ शकतात. नोटीस देण्याकरिता प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाइन शुल्क जमा करून ३० दिवसांचा नोटीस कालावधी संपल्यानंतर पुढील ६० दिवसांत आपल्या सोयीनुसार विवाहाची तारीख ठरवून त्या तारखेची आगाऊ वेळ (अपॉइंटमेंट) ऑनलाइन घेऊ शकतात. या दिवशी विवाह नोंदणी कार्यालयात उपस्थित राहून विवाह करता येईल. विवाह प्रमाणपत्र याच प्रणालीद्वारे तात्काळ प्राप्त होईल.
ऑनलाइन नोंदणीचे टप्पे कसे आहेत?
igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन विवाह नोंदणी २.० मध्ये लॉगइन करावे लागेल. वधू – वर आणि तीन साक्षीदार यांची माहिती भरावी लागेल. वय आणि रहिवाससंबंधी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. छायाचित्र कॅप्चर करावे लागेल आणि आधार पडताळणी करून अर्ज भरावा लागेल. विवाह अधिकारी यांनी नोटीसला मान्यता दिल्यानंतर ऑनलाइन शुल्क भरावे लागेल. विवाहाच्या तारखेची आगाऊ तारीख (अपॉइंटमेंट) आरक्षित करावी लागेल. नियोजित तारखेला आपली मूळ कागदपत्रे घेऊन विवाह नोंदणी कार्यालयात विवाह अधिकाऱ्यांसमोर विवाह करून प्रमाणपत्र घ्यावे लागेल.
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून विदा संरक्षण विधेयकाला मंजुरी; विधेयकातील तरतुदी काय आहेत?
प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली कुठे सुरू झाली?
सन २०२२-२३ या वर्षात राज्यात ३४ हजारपेक्षा जास्त आणि केवळ पुण्यात ७९०० पेक्षा जास्त विवाह नोंदणी पद्धतीने झाले आहेत. सद्य:स्थितीत पुणे, नगर आणि सोलापूर या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर विवाह नोंदणी २.० प्रणाली सुरू करण्यात आली आहे. लवकरच संपूर्ण राज्यात या प्रणालीचा वापर सुरू करण्यात येणार आहे. ही प्रणाली वापरण्यास सुलभ आणि सोपी असून नागरिकांना त्याचा लाभ घेऊन अतिशय सोप्या पद्धतीने नोंदणी करता येईल, असे नोंदणी व मुद्रांक विभागाचे उपमहानिरीक्षक (संगणक) अभिषेक देशमुख यांनी सांगितले.
prathamesh.godbole@expressindia.com