पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूबरोबरच पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकींचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या टाइम्स नाऊ-सीव्होटर्सच्या ओपिनियन पोलमध्ये कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला अगदी थोड्या फरकाने सत्ता कायम राखण्यात यश मिळेल तर तामिळनाडूमध्ये डीएमके-काँग्रेस युती विरुद्ध एआयएडीएमके असा चुरस पहायला मिळेल असा अंदाज मधून व्यक्त करण्यात आला आहे. केरळमध्ये एलडीएफला पुन्हा एकदा सत्ता मिळेल. तर आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलण्याची चिन्ह दिसत असल्याचं या ओपिनियन पोलमधून दिसून आल्याचं म्हटलं आहे. या ओपिनियन पोलची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. या पाचही राज्यांमध्ये कोणाला किती जागा मिळणार यासंदर्भात ओपिनियन पोल काय सांगत आहेत जाणून घ्या येथे क्लिक करुन…
असं असलं तरी अनेकांना ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमधील फरक ठाऊक नाहीय. निवडणुकीचे अंतिम निकाल हाती येण्याआधी ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमधून वेगवेगळे अंदाज वर्तवले जातत. या पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. मात्र हे पोल म्हणजे नेमकं काय आहे? ते कशा पद्धतीने घेतला जातात? अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत…
ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमध्ये फरक काय?
ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. ओपिनियन पोल मतदानापुर्वी सादर केला जातो. मतदान होण्यापुर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ओपिनियन पोल तयार केला जातो.
Opinion Poll म्हणतो, बंगालमध्ये ‘फिर एक बार ममता सरकार’; आसाममध्ये कमळ फुलणार तर दक्षिणेत भाजपा निष्प्रभ ठरणारhttps://t.co/lXJFw1JUGH
जाणून घ्या कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार#cvoter #OpinionPoll #WestBengalElections2021 #BJP #TMC #MamataBanerjee— LoksattaLive (@LoksattaLive) March 9, 2021
ओपिनियन पोलवर कितपत निर्भर राहू शकतो?
ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमधील मुख्य फरक म्हणजे एक मतदानाआधी आणि एक मतदानानंतर घेतला गेलेला असतो. ओपिनियन पोल मतदानाच्या आधी घेतला गेला असल्याने तो बदलण्याची शक्यता असते. त्याचे अंदाज बदलू शकतात. पण एक्झिट पोल हा मतदान घेतल्यानंतरचा असल्याने त्याच्यावर निर्भर राहू शकतो.
एक्झिट पोल कधी जाहीर केला जातो?
निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असून त्यातील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. कारण एक्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो. एक्झिट पोल हा नेहमी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो. भारतात एक्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जातो.
कशा पद्धतीने घेतला जातो एक्झिट पोल?
एक्झिट पोल हा ज्यादिवशी मतदान होते म्हणजे मतदानाच्या दिवशीच घेतला जातो. मतदानाच्या दिवशीच मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं आहे यासंबंधी विचारलं जातं. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणार पंधरावा, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्व्हे केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली?
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली यामध्ये मतांतर आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली असं म्हटलं जातं. १५ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.