सध्या ‘ओपनहायमर’ या हॉलिवूडच्या चित्रपटाची जगभरात चर्चा सुरू आहे. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट नवनवी शिखरं गाठत आहे. भारतासारख्या देशातही या चित्रपटाला लोक आवडीने पाहात आहेत. जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या नेतृत्वात अमेरिकेने जगातील पहिल्या अणूबॉम्बची निर्मिती कशी केली, याबाबत या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. हा अणूबॉम्ब ज्या ठिकाणी तयार करण्यात आला होता, त्या प्रयोगशाळेची सध्या चर्चा सुरू आहे. अनेक लोकांचे जबरदस्तीने पुनर्वसन करून ही लॅब उभारण्यात आली होती, असे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ही लॅब कशी उभारण्यात आली होती? लॅब उभारताना कोणत्या लोकांना अडचणी आल्या? हे जाणून घेऊ या…
चित्रपटात सांगितली वेगळी परिस्थिती
अणुबॉम्ब तयार करण्यासाठी उत्तर न्यू मेक्सिकोमधील एका गुप्त ठिकाणी प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली होती. या भागात फक्त मुलांची एक शाळा होती आणि स्मशान होते, असे या चित्रपटात सांगण्यात आलेले आहे. सत्य मात्र यापेक्षा वेगळे आहे, असा दावा अनेकजण करत आहेत.
बुलडोझरने लोकांची घरं पाडण्यात आली
मिळालेल्या माहितीनुसार ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी १९४२ साली अमेरिकेच्या सैन्याने ३२ हिस्पॅनो कुटुंबांना (ज्यांचे पूर्वज स्पेन देशातील होते, असे नागरिक) त्या ठिकाणाहून जबरदस्तीने हटवले होते. ‘काही लोकांवर जबरदस्ती करण्यात आली, तर काही लोकांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. या लोकांची घरं बुलडोझरने पाडण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या काही गुरांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. काही गुरांना सोडून देण्यात आले होते. ज्या लोकांना विस्थापित करण्यात आले होते, त्यांना खूप कमी नुकसान भरपाई देण्यात आली होती. काही लोकांना तर कसलीही नुकसान भरपाई दिली गेली नाही,’ असे ६७ वर्षीय लॉयडा मार्टिनेझ यांनी सांगितले. मार्टिनेझ यांनी लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी (LANL) येथे साधारण ३२ वर्षे संगणक शास्त्रज्ञ म्हणून काम केले. अमेरिकेने याच प्रयोगशाळेत आपला पहिला अणूबॉम्ब तयार केला होता. मार्टिनेझ यांच्या एस्पॅनोला व्हॅली येथील घराच्या शेजारी या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी पुनर्वसन केलेली काही शेतकरी, पशूपालक राहायचे. त्यांचा दाखला देत मार्टिनेझ यांनी वरील माहिती दिली.
‘प्रशासनाला याची खबर नव्हती’
याबाबत नॅशनल न्यूक्लियर सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशनच्या प्रवक्त्याने अधिक माहिती दिली आहे. व्हाईट प्रॉपर्टीची मालकी असणाऱ्या लोकांच्या तुलनेत हिस्पॅनिक शेतकऱ्यांना खूपच कमी नुकसान भरपाई मिळाली. मात्र प्रयोगशाळा उभारण्यासाठी लोकांची घरे पाडली जात आहेत, गुरे मारली जात आहेत किंवा मोकळी सोडून दिली जात आहेत, याची प्रशासनाला कसलीही खबर नव्हती. या लोकांचे जबरदस्तीने पुनर्वसन केले जात आहे, याची प्रशासनाला कल्पना नव्हती, असे या प्रवक्त्याने सांगितले.
मार्टिनेझ यांनी लोकांच्या हक्कासाठी दोन दशकं लढा दिला
मार्टिनेझ यांनी पुनर्वसनाची झळ बसलेले लोक, हिस्पॅनो, स्थानिक महिला, प्रयोगशाळेतील अन्य कर्मचारी यांच्या हक्कांसाठी अनेक दशकं लढा दिलेला आहे. या लोकांना व्हाईट प्रॉप्रर्टी असणाऱ्या लोकांप्रमाणेच नुकसान भरपाई मिळावी, त्यांच्यावर उपचार केले जावेत यासाठी त्यांनी न्यायालयीन लढा दिलेला आहे. त्यातील दोन महत्त्वाचे खटलेदेखील त्यांनी जिंकलेले आहेत. याबाबत बोलताना ‘ही प्रयोगशाळा उभारताना कशा प्रकारे अन्याय झाला, अमेरिकेच्या या कृष्णकृत्यांकडे दुर्लक्ष का केले गेले, याबाबत हिस्पॅनिक अमेरिकन लोक चांगल्या प्रकारे सांगू शकतील,’ असे मार्टिनेझ यांनी सांगितले.
अमेरिकेच्या कामगार विभागाने आर्थिक तरतूद केली, पण…
या प्रयोगशाळेमुळे अनेकांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम झाला. मार्टिनेझ यांच्या वडिलांनी या प्रयोगशाळेत काम केले होते. घातक समजल्या जाणाऱ्या बेरिलियम या रासायनिक घटकाच्या सतत संपर्कात आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. अशा लोकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मार्टिनेझ यांनी प्रयत्न केले. त्यांनी अमेरिकन काँग्रेसपर्यंत हा मुद्दा पोहोचवण्याचा अनेक मार्गांनी प्रयत्न केला. याचा पुढे काहीसा सकारात्मक परिणाम झाला. २००० साली अमेरिकन काँग्रेसने मार्टिनेझ यांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले. अण्वस्त्र निर्मितीसाठी काम करणारे अनेकजण किरोणत्सार आणि विषारी घटकांच्या संपर्कात येतात. परिणामी त्यांचा मृत्यू होतो किंवा ते आजारी पडतात हे अमेरिकन काँग्रेसने मान्य केले. त्यानंतर अमेरिकेच्या कामगार विभागाने अशा कर्मचाऱ्यांच्या नुकसान भरपाई म्हणून आर्थिक निधीची तरतूद केली. मात्र हा निधी पीडित लोकांना मिळण्यासाठी कित्येक वर्षे लागली, असे मार्टिनेझ यांनी सांगितले.
‘ओपनहायमर यांना त्याची कसलीही चिंता नव्हती’
या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी ज्या लोकांचे पुनर्वसन करण्यात आले, त्यांनी कोणकोणत्या अडचणींना समोरे जावे लागले, याबबत न्यू मेक्सिको विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक मायरिया गोमेझ यांनी अधिक सांगितले आहे. ‘त्या भागात प्रयोगशाळा उभारण्यासाठी माझ्या आजी-आजोबांचे ६३ एकर शेत घेण्यात आले. माझे आजोब हे ‘मॅनहॅटन प्रोजक्ट’मध्ये काम करायचे. त्यांचा पुढे कर्करोगाने मृत्यू झाला. अनेक लोकांना त्यांच्या राहत्या घरातून बाहेर काढण्यात आले. मात्र ओपनहायमर यांना त्याची कसलीही चिंता नव्हती’ असे गोमेझ म्हणाल्या. गोमेझ यांनी न्यू मेक्सिकोतील प्रयोगशाळेच्या स्थापनेवर ‘न्यूक्लियर न्यूवो मेक्सिको’ हे पुस्तकही लिहिलेले आहे.
मेक्सिको-अमेरिका युद्धानंतर हा प्रदेश अमेरिकेच्या ताब्यात आला
स्पॅनिश वसाहत राजवटीच्या काळात जो प्रदेश हिस्पॅनो लोकांना देण्यात आला होता. त्याच प्रदेशात लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी (LANL) उभारण्यात आली होती. १८४६-१८४८ सालाच्या दरम्यान मेक्सिको-अमेरिका युद्धानंतर या हा प्रदेश अमेरिकेने ताब्यात घेतला. त्यानंतर हा प्रदेश हिस्पॅनो आणि व्हाईट होमस्टेडर्स यांना देण्यात आला. न्यू मेक्सिको येथील इतिहासाचे अभ्यासक रॉब मार्टिनेझ यांनी या जमीन हस्तांतरणावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रयोगशाळेसाठी जमीन घेणे ही अमेरिकन सरकारसाठी फार मोठी बाब नव्हती. कारण १८४८ सालापासून अमेरिका असेच करत आलेला आहे. असे रॉब मार्टिनेझ म्हणाले. रॉब यांच्या काकांनी या प्रयोगशाळेत काम केले होते.
अरिबा काऊन्टी सर्वांत गरीब प्रदेश
दरम्यान, २००४ होमस्टेडर कुटुंबांनी अमेरिकन सरकारकडून मदत म्हणून १० दसलक्ष डॉलर्स मिळवण्याचा लढा शेवटी जिंकला. लॉस आलमोस काऊन्टीमध्ये (प्रदेश) लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी आहे. हा सधन प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर याच प्रदेशाच्या लगत असलेला अरिबा काऊन्टी (प्रदेश) अमेरिकाचा सर्वाधिक गरीब भाग म्हणून ओळखला जातो. या प्रदेशातील लोकांचे शिक्षण कमी आहे. या भागात ९१ टक्के लोक हिस्पॅनिक आणि मूळचे अमेरिकन आहेत.