मोबाईलच्या एका क्लिकवर आज आपण आवडेल तो पदार्थ मागवू शकतो. स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, बिग बास्केट यांसारख्या आघाडीच्या फूड डिलिव्हरी कंपन्यांचा व्यवसाय गेल्या काही वर्षांत खूपच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्सदेखील आणत असतातच. परंतु, आता या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून दारू मागविणेदेखील शक्य होणार आहे. त्यामुळे आता आवडत्या खाद्यपदार्थासह दारूही घरपोच मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या राज्यांत दारूचे ऑनलाइन वितरण सुरू करण्यात आले आहे? या निर्णयाचा नक्की काय परिणाम होणार? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

‘द इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, तमिळनाडू, गोवा, केरळ व दिल्ली या राज्यांमध्ये सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्याचा विचार सुरू आहे. सध्या दारूचे ऑनलाइन वितरण फक्त पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये उपलब्ध आहे. या प्रायोगिक उपक्रमात सुरुवातीला कमी अल्कोहोलयुक्त पेये, जसे की बीअर, वाईन व लिकर्स वितरित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

हेही वाचा : ‘पीएम श्री’ योजनेचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार? ही योजना नेमकी आहे तरी काय?

दारूचे फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे वितरण करण्याचा निर्णय

कोविड-१९ साथीच्या आजाराने लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॉपिंग आणि होम डिलिव्हरीकडे वळले आहेत. ग्राहकांना त्यांच्या दारापर्यंत वस्तू मिळण्याची सवय झाली आहे. हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचाच फायदा घेत ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ग्राहकांना अनेक ऑफर्स किंवा पर्याय देत आहेत. आता फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचा अल्कोहोलयुक्त पेये समाविष्ट करण्याचा मार्गही मोकळा केला. पश्चिम बंगालने जून २०२० मध्ये ई-रिटेल ॲपद्वारे राज्य पेय महामंडळाने दारूच्या होम डिलिव्हरीचा प्रयोग सुरू केला. स्विगी, स्पेन्सर व इतर काही प्लॅटफॉर्म या उपक्रमात सामील झाले. हा प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला. स्पेन्सरच्या माध्यमातून नियमितपणे ड्रिंक्स ऑर्डर करणाऱ्या स्थानिकाने एका वृत्तपत्राला सांगितले, “या मार्गाने दारू खरेदी करणे सोईचे झाले आहे.”

दारूविक्रीत होम डिलिव्हरी ऑर्डर्सचा वाटा सुमारे १५ टक्के होता, असे कोलकाता येथील एका आघाडीच्या दारूविक्रेत्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड व आसामसह इतर राज्यांनी कडक अटी घालून, ऑनलाइन दारू वितरणास तात्पुरती परवानगी दिली होती. परंतु, हे निर्बंध असतानाही हा उपक्रम यशस्वी ठरला. रिटेल इंडस्ट्रीच्या अधिकाऱ्यांच्या मते, ऑनलाइन डिलिव्हरीमुळे पश्चिम बंगाल व ओडिशामधील दारूविक्री आतापर्यंत २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे.

या निर्णयामागील कारण काय?

” परदेशी लोकसंख्या वाढत असल्याने दारूची मागणीही वाढली आहे. मोठ्या शहरांमध्ये, जेवणाबरोबरच दारू घेण्याचे ट्रेंड वाढले आहे. अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी दुकानांमधून दारू खरेदी केली त्यांना वाईट अनुभव आल्याचे अनेक उदाहरणे आहेत,” असे एका व्यवसायिकाने’ इकॉनॉमिक टाइम्स’ला सांगितले आहे. मे २०२१ मध्ये ‘आयएसएडबल्यूआय’च्या लोकल सर्कल्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने एक संशोधन केले. या सर्वेक्षणात आठ शहरांमधील ३३ हजार प्रतिसादकर्ते सहभागी झाले होते. दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू व हैदराबादमधील सुमारे ८१ टक्के ग्राहकांनी सांगितले की, दारूचे विविध ब्रॅण्ड उपलब्ध करून देणारी सुविधा व सुरक्षिततेचा दृष्टिकोन या कारणांस्तव त्यांना होम डिलिव्हरीची सेवा वापरायला आवडेल. ऑनलाइन दारू वितरणाचे संभाव्य फायदे आणि तोटे यांबद्दल राज्य अधिकारी आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि उत्पादकांकडून प्रतिक्रिया गोळा करीत आहेत.

ऑनलाइन दारू वितरणाचे संभाव्य फायदे

स्विगी येथील कॉर्पोरेट अफेअर्सचे उपाध्यक्ष दिनकर वशिष्ठ यांनी ऑनलाइन डिलिव्हरी मॉडेलच्या फायद्यांवर भर दिला. त्यांनी सांगितले की, ऑनलाइन दारू विक्री करताना वयासंबंधीच्या मर्यादांचे पालन केले जाते. पश्चिम बंगालमध्ये ग्राहकांनी त्यांच्या वैध सरकारी आयडीचा फोटो आणि प्रमाणीकरण यांसाठी सेल्फी अपलोड करून, वयाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पब चेन द बीअर कॅफेचे मुख्य कार्यकारी राहुल सिंग यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये सांगितले की, दारूची ऑनलाइन होम डिलिव्हरी ग्राहकांच्या सोई वाढविण्याबरोबरच आर्थिक वाढीला चालना देणारी आहे. हा एक जागतिक ट्रेंड असल्याचेही त्यांनी सांगितले.

इंडस्ट्री आणि ब्रुअरीजकडून मिळणारा प्रतिसादही स्वागतार्ह आहे. किंगफिशर ब्रॅण्ड असलेली युनायटेड ब्रुअरीज व बुडवेझरची मालकी असलेल्या ‘एबी इनबेव्ह’सारख्या बीअर आणि वाईन निर्मात्यांनी बीअरच्या होम डिलिव्हरीमध्ये स्वारस्य दाखविले आहे, अशी माहिती उद्योग अधिकाऱ्यांनी दिली. हा ट्रेंड वाढत आहे. कारण- किराणा मालाप्रमाणेच बीअरची खरेदी केली जाते; विशेषतः मोठ्या शहरांमध्ये.

आव्हाने

ऑनलाइन दारू विक्री, हे डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी एक आव्हानच आहे. कारण- अनेक राजकीय प्रतिक्रिया, सामाजिक आव्हाने व रिटेल संस्थांकडील दबाव त्यांच्या कार्यात अडथळा आणत आहे. ‘हिप बार’ दारूचे वितरण करणारी प्रमुख ई-कॉमर्स कंपनी आहे. २०२१ मध्ये कर्नाटकमध्ये त्यांनी याची सुरुवात केली. परंतु, काही स्थानिक रिटेल संस्थांच्या दबावामुळे त्यांना आपली सेवा बंद करावी लागली, असे कंपनीचे संस्थापक प्रसन्न नटराजन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले. या संदर्भात कंपनीने सर्वोच्च न्यायालयात खटलाही दाखल केला होता.

हेही वाचा : रात्रीपेक्षा दिवस का मोठा होत आहे? वैज्ञानिकांनी सांगितलं धक्कादायक कारण

“अल्पवयीन लोकांनी दारू विकत घेतल्यास काय होईल, बेपर्वा सेवनामुळे घरगुती हिंसाचार वाढेल आणि लोक नोकर्‍या गमावतील, अशी भीती लोकांमध्ये आहे”, असे नटराजन यांनी वृत्तपत्राला सांगितले होते. या उपक्रमात अनेक अडथळे आहेत. तरीही भारतातील अनेक राज्यांमधील हा प्रायोगिक प्रकल्प व्यावसायिक आणि ग्राहक अशा दोहोंसाठीही फायद्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास, हे पाऊल इतर बाजारपेठा आणि उद्योगांसाठी एक आदर्श ठरू शकते.