गेल्याच महिन्यात अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये ‘ओरिजिन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या कथानकासाठी इसाबेल विल्करसन यांचे ‘कास्ट: द ओरिजिन ऑफ अवर डिसकॉन्टेंट्स’ हे पुस्तक प्रेरणादायी ठरले. या चित्रपटाचा विषय जातिभेद, रंगभेद तसेच वांशिक भेदाच्या भीषण समस्येवर भाष्य करणारा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात जातिव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. जातिभेदासारख्या भीषण समस्येवर भाष्य आणि उघड विरोध करणाऱ्या जगातील मुख्य विद्वानांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी आहे आणि हेच सत्य या नव्याने प्रदर्शित झालेल्या चित्रपटातही पाहायला मिळते. या चित्रपटातील बाबासाहेबांच्या भूमिकेने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे कार्यकर्तृत्त्व थेट हॉलीवूडच्या मोठ्या पडद्यावर पोहोचल्याची सार्वत्रिक चर्चा आहे. त्याच निमित्ताने या चित्रपटाचा विषय, बाबासाहेबांची भूमिका याविषयांचा घेतलेला हा वेध.
अधिक वाचा: ‘ओरिजिन’च्या निमित्ताने: भारतीय सिनेसृष्टीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रण केव्हा व कुणी केले?
वास्तववादी चित्रपट
‘ओरिजिन’ हा अवा डुव्हर्ने लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट आहे. अवा डुव्हर्ने या त्यांच्या ऑस्कर-नामांकित चित्रपट ‘Selma’ (२०१४) साठी प्रसिद्ध आहेत. ओरिजिन या चित्रपटाची कथा इसाबेल विल्करसन यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमात इसाबेल विल्करसन यांची भूमिका आंजन्यू एलिस-टेलर यांनी केली असून संपूर्ण चित्रपटात विल्करसन या जर्मनी, भारत आणि अमेरिकेचा दौरा करताना दाखविण्यात आल्या आहेत. रंगभेद-जातीभेदांवरील संशोधनासाठी त्या प्रत्येक देशाच्या इतिहासातील जातभेद, रंगभेद आणि वंशभेद यांचा आढावा घेतात. या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन ८० व्या व्हेनिस इंटरनॅशल फिल्म फेस्टिवलमध्ये ६ सप्टेंबर २०२३ साली झाले. तर चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला. अनेक विख्यात समिक्षकांनी या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. लेखिका इसाबेल विल्करसन यांनी अनेक वैयक्तिक समस्यांशी झुंज देत ‘कास्ट: द ओरिजिन ऑफ अवर डिसकॉन्टेंट्स’ हे पुस्तक लिहिले, हे पुस्तक लिहिताना वेगवेगळ्या देशांतील सामाजिक परिस्थितींचा आढावा घेण्यासाठी केलेला संघर्ष या चित्रपटात अधोरेखित करण्यात आला आहे. थोडक्यात, ‘ओरिजिन’ हा चित्रपट लेखिका इसाबेल विल्करसन यांचा प्रवास दर्शवतो.
चित्रपटातील बाबासाहेब
या चित्रपटाच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राबद्दल आणि कार्याविषयी नव्याने आस्था निर्माण झाली आहे. या चित्रपटात शाळेच्या बाहेर बसलेला अस्पृश्य भीमा, कोलंबिया विद्यापीठात पुस्तके वाचत फिरत असतानाचा तरुण भीमराव दाखविण्यात आला आहे. अडीच तासांच्या या चित्रपटात दिग्दर्शक अवा डुव्हर्ने यांनी जर्मनीतील ज्यूंचा छळ, अमेरिकेतील वांशिक वर्णभेद आणि भारतातील जातीय अत्याचार यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात मुख्यत्त्वे वांशिक भेदापेक्षा जातीभेदावर अधिक भर देण्यात आला आहे. जर्मनी, अमेरिका आणि भारत यांच्या इतिहासाच्या माध्यमातून जगातील भेदभावाची सार्वत्रिक कारणमीमांसा या चित्रपटात चित्रित करण्यात आली आहे.
अधिक वाचा: भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?
या चित्रपटात गौरव पठानिया यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली आहे. गौरव पठानिया हे व्हर्जिनियातील इस्टर मेनोनाइट विद्यापीठात समाजशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. एका दृश्यात विल्करसन या २०१२ साली ट्रेव्हन मार्टिन या निष्पाप कृष्णवर्णीय तरुणाच्या हत्येनंतर उद्भवलेल्या प्रश्नांच्या शोधात असताना, त्या डॉ.आंबेडकरांचे ‘द ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ वाचताना दाखविण्यात आल्या आहेत. या चित्रपटात डॉ.बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात. कधी ते कोलंबिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये, कधी न्यूयॉर्कमध्ये, तर कधी ते महाड सत्याग्रहात दिसतात. निर्मात्यांनी बाबासाहेबांना ‘जाती अंतर्गतच लग्न’ या विषयावरही चर्चा करताना दर्शविले आहेत.
विल्करसन जातीच्या प्रश्नाकडे का वळल्या?
मूलतः विल्करसन अमेरिकेतील वर्णद्वेषाची कारणे तपासत असताना त्या जातीभेदाशी संलग्न प्रश्नांना सामोऱ्या जातात. याच प्रश्नांचा शोध घेण्यासाठी त्या हातातील सुरू असलेले संशोधन सोडून जर्मनी आणि भारताला भेट देतात. या भेटीदरम्यान त्यांच्या मनात अनेक प्रश्न येतात. भारतात सर्वजण प्रामुख्याने गहूवर्णाचे आहेत. असे असताना त्यांच्यामध्ये स्पृश्य- अस्पृश्य भेद कसा काय केला जाऊ शकतो. तसेच ज्यू आणि आर्य दोन्ही गोरे आहेत, तरी देखील नाझींनी या दोन्ही गटांना एकमेकांपासून वेगळे कसे केले? असे प्रश्न त्यांना पडतात. वंश असो वा जात त्याची शुद्धता राखण्यासाठी आंतरजातीय विवाहांना विरोध करण्यात आला, त्यामुळे या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता लेखिकेच्या मनात निर्माण झाली होती. तिच्या या प्रवासात तिने विचारलेल्या प्रश्न आणि त्यावरील उत्तराच्या प्रसंगातून प्रेक्षकांना वेगळ्याच ज्ञानवर्धक प्रवासाकडे चित्रपट घेवून जातो.
जात ही हाडासारखी जन्मजात!
लेखिकेच्या मते त्वचा रंग भेदासाठी काम करते तर “जात” ही “हाडा” सारखी जन्मजात गोष्ट आहे. या दोन्ही गोष्टी अबाधित ठेवण्यासाठी विवाह हे उत्तम साधन आहे. म्हणूनच जातीअंतर्गत विवाह पद्धतीचा अवलंब केला गेला. मग ते होलोकॉस्ट असो, वा जिम क्रो किंवा भारत असो यांनी जातीतील विवाहाचे कठोर समर्थन कसे केले याची उदाहरणे चित्रपटात देण्यात आली आहेत. चित्रपटाच्या उत्कंठावर्धक समारोपाच्या वेळी काही प्रेक्षक टाळ्या वाजवतानाही दिसतात. या चित्रपटात विल्करसन यांचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ दोन्ही दाखविण्यात आलेला आहे. परंतु चित्रपटाचे स्वरूप हे डॉक्युमेंटरी किंवा बायोग्राफीसारखे नाही. संपूर्ण चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
अधिक वाचा: बुद्धमूर्तीमुळे प्रकाशात आले पहिल्या शतकातील प्राचीन जागतिकीकरण !
चित्रपटात विल्करसन या हार्वर्डचे प्राध्यापक भारतीय विचारवंत डॉ.सूरज येंगडे यांना भेटतात. डॉ. सूरज येंगडे हे त्यांना जातिव्यवस्थेबद्दल अधिक माहिती देतात. येंगडे यांच्या मते बाबसाहेबांचे आफ्रिकन- अमेरिकन लोकांशी जवळचे संबंध आहेत. याशिवाय ते भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये जात हा एक मूलभूत घटक कसा आहे यावर प्रकाश टाकतात. भारतात हाताने मैला साफ करण्याची कुप्रथा आजही कायम आहे. कोणत्याही सुरक्षितेशिवाय मानवी मलमूत्राने भरलेल्या मॅनहोलमध्ये साफसफाईसाठी उतरणारे केवळ दलित समाजातीलच असतात. त्यावेळी त्यांच्या शरीरावर फक्त तेलाचे लेपण असते.
बाबासाहेबांचा ध्वनिमुद्रित आवाज
चित्रपट निर्मात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ध्वनिमुद्रित आवाजाचाही उपयोग केला आहे. त्यांचे एकाच जातीत होणाऱ्या विवाहांविषयीचे विचार जात पद्धतीचे रक्षण कसे करते हे व्यक्त करण्यासाठी याचा वापर करण्यात आला आहे. समानतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची या चित्रपटातील भूमिका नक्कीच प्रभावित करणारी आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्याची चांगली कामगिरी आणि दिग्दर्शकाच्या विशिष्ट कथनाने अमेरिकेतील ‘रॉटन टोमॅटोज’वर चित्रपटाला विलक्षण प्रशंसा मिळवून दिली आहे. ‘ओरिजिन’ हा चित्रपट अमेरिका आणि युनायटेड किंगडम या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला असून भारतातील प्रदर्शनाच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.