महाराष्ट्रात धाराशिव येथे चैत्र वैद्य अष्टमीला हिंगलाज देवीचा प्रकटदिन साजरा होतो. हिंगलाज देवी ही भारतात अनेक भागात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक या भागात देवीच्या उपासकांची संख्या अधिक आहे. प्रांतापरत्त्वे देवीच्या रूपात फरक जाणवत असला तरी देवीच्या मूळ स्थानाविषयी कोणतेही दुमत नाही. हिंगळाज किंवा हिंगलाज देवी हिंगूळा, हिंगलाज, नानी माता अशा अनेक नावांनी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील गडहिंग्लज येथील हिंगुळा देवी ही गुड्डाई या नावाने प्रसिद्ध असली तरी गडहिंग्लज नावाची उत्पत्ती सांगताना हिंगुळा देवीचा गड येथे असल्याने हा भाग गडहिंग्लज ओळखला जातो असे सांगितले जाते. स्थानिक कथेनुसार बलूची व्यापाऱ्यासोबत ही देवी गडहिंग्लज येथे आली. ही देवी गुजरातमध्ये पराजिया सोनी जातीची तसेच काही क्षत्रिय कुळांची कुलदेवता आहे. विशेष म्हणजे राजस्थान येथे या देवीचे मंदिर ज्या ठिकाणी आहे ते ठिकाणही हिंग्लजगढ म्हणून प्रसिद्ध आहे. हिंगुळा देवी ही पार्वतीचे रूप मानले जाते.

मूळस्थान

हिंगुळा किंवा हिंगुलजा/ हिंगुळजा देवीचे मूळ स्थान पाकिस्तानात बलुचिस्तानातील हिंगलाज हे ठिकाण आहे. कराचीच्या वायव्येला सुमारे २५० कि.मी. वर बलुचिस्तान प्रांतातल्या मकरान टेकड्यांच्या प्रदेशात हिंगोळ नदीच्या काठावर एका गुहेमध्ये नानी बीबी किंवा हिंगुळजादेवी हे पवित्र क्षेत्र वसलेले आहे. हे स्थान देवीच्या शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. या ठिकाणी हिंगुळजा देवी ही टेकडीवर एका लहान गुहेत विराजमान आहे. पाकिस्तानातील हिंदू दरवर्षी देवीच्या यात्रेला आवर्जून जातात. हे स्थान हिंदूचे असले तरी स्थानिक मुस्लिम समाजदेखील ‘नानी बिबी’ या नावाने याच देवीची पूजा करतो.

sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
Mallikarjun kharge
Acharya Pramod Krishnam : “खरे हिंदू…”, मल्लिकार्जुन खरगेंवर काँग्रेसच्या माजी नेत्याचीच टीका!
Sharda Sinha, Chhath Puja songs, Bihar,
शारदा सिन्हा… छठ पूजा गीतांना अजरामर करणारी ‘बिहार कोकिळा’
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे
sussane khan share photo of son hridaan and hrehaan
हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”

आणखी वाचा : करवीरनिवासिनी महालक्ष्मीचा निस्सीम भक्त हुतात्मा मुतय्या शिलालेखातून अजरामर!

देवीचे स्थान मूलतः प्राचीन व्यापारी मार्गावर आहे. बलुचिस्तान या भागाचे इतिहासातील महत्त्व अनन्य साधारण आहे. संपूर्ण भारताच्या इतिहासाचा विचार करता गांधार, बलुचिस्तान या भागात अनेक संस्कृतींचा संगम आपल्याला इतिहासात पाहावयास मिळतो. हा प्राचीन व्यापारी मार्ग असल्याने भू-मार्गाने भारताला इतर जगाशी जोडण्याचे काम या मार्गाने केले. म्हणूनच इराणी, ग्रीक, नंतरच्या काळात सूफी संस्कृतीचा प्रभाव या प्रदेशात प्रकर्षाने जाणवणारा आहे. इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकापासून या मार्गावरील लेणींचा वापर व्यापारी थांबण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी करत होते. हे व्यापारी भारत तसेच भारताबाहेर अशा दोन्ही ठिकाणी व्यापारासाठी प्रवास करत होते. म्हणूनच या व्यापाऱ्यांनी ते ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी आपले आराध्य दैवत असलेल्या हिंगुळा किंवा हिंगुळजा देवीला त्यांनी सोबत नेले. त्यामुळेच भारताच्या अनेक भागात या देवीची ठाणी आढळतात.

हिंगुळजा यात्रा

दरवर्षी पाकिस्तानातील हिंदू भाविक देवीच्या देवळापर्यंत पायी यात्रा काढतात. चैत्र महिन्यात देवीच्या प्रकट दिनाच्या दिवशी देवीच्या दर्शनाचा मानस या यात्रेमागे असतो. या यात्रेदरम्यान भाविक वाहनप्रवास टाळतात. देवीला पायी यात्रा करणारे भक्त अधिक प्रिय आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पायी यात्रा करून ते हिंगुळा नदीच्या पाण्यात अंघोळ करून मगच देवीच्या दर्शनाला जातात. एखादा नवस करण्यासाठी किंवा झालेला नवस पूर्ण करण्यासाठी जवळच असलेल्या मातीच्या ज्वालामुखीच्या तळ्यात नारळ व फुले टाकण्याची प्रथा आहे. तर काही जण देवीच्या दर्शनानंतर मकरानच्या किनारपट्टीवर समुद्राचे दर्शन घेण्यासाठी जातात, या सागरदर्शनानंतरच यात्रा पूर्ण झाल्याचे पुण्य मिळते अशीही भाविकांची धारणा आहे. या यात्रेचा एक संदर्भ १४ व्या शतकातील आहे. या संदर्भानुसार यात्रा पूर्ण करून आलेल्या भाविकाला देवात्म्याचा दर्जा दिला जात होता आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे दहन करण्याऐवजी त्याची समाधी बांधण्यात येत होती, असे संदर्भ सापडतात. अभ्यासकांच्या मते ही परंपरा जुनी असण्याची शक्यता आहे. परंतु सध्या या प्रकारची कोणतीही परंपरा अस्तित्वात नाही.

आणखी वाचा : विश्लेषण: क्लिओपात्रा खरंच गाढविणीच्या दुधाने अंघोळ करायची का?

शक्तिपीठ

शक्तिपीठे म्हणजे देवीच्या उपासनेचे केंद्र होय. देवीशी संबंधित धार्मिक संदर्भामध्ये शक्तिपीठांच्या संख्येत फरक जाणवतो. पाकिस्तान मधील हिंगलाज देवीच्या स्थळाचा संदर्भ या शक्तिपीठांमध्ये केला जातो.

कथा

पाकिस्तान मधील या स्थळास हिंगुळा देवीचे स्थान का म्हटले जाते त्याविषयी अनेक कथा प्रसिद्ध आहेत. प्रचलित कथांपैकी मुख्य कथा ही सतीच्या आत्मदहनाशी संबंधित आहे. सती ही दक्ष प्रजापतीची कन्या होती. तिचा विवाह हा भगवान शिवाशी झाला होता. दक्ष प्रजापति हा शिव उपासनेच्या विरुद्ध होता. त्यामुळे आपल्या मुलीचा शंकराशी झालेला विवाह त्याच्या पसंतीस पडला नव्हता. म्हणूनच त्याने सतीशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नये हे घरात बजावून सांगितले होते. पुढे दक्ष याने केलेल्या ‘बृहस्पतिसव’ यज्ञात शिवास आमंत्रण दिले नाही. भर यज्ञात सतीसमोर शिवाचा अपमान केला. हा अपमान सहन न झाल्याने सतीने त्याच वेळी हवन कुंडात आत्मदहन केले. हे समजताच शिवाने त्याच्या जटेतून वीरभद्र निर्माण केला आणि अखेरीस वीरभद्राने दक्षाचा वध केला. शिवशंकर सतीचे निष्प्राण शरीर मस्तकावर घेऊन तांडव नृत्य करू लागले. शिव शंकराला शांत करण्यासाठी भगवान विष्णू यांनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. या नंतर तिच्या शरीराचे अवयव ज्या ठिकाणी पडले. त्या स्थळी शक्तिपीठे तयार झाली, असे मानले जाते. पाकिस्तान येथील हिंगळाज या ठिकाणी सतीचे ब्रह्मरंध्र पडले होते अशी आख्यायिका आहे. याशिवाय आणखी एक कथा प्रचलित आहे या कथेनुसार गुप्तरूपाने असलेल्या शिवाला पार्वतीने हिंगुळा नदीच्या काठावर शोधून काढले होते. म्हणून देवीचे हे स्थान हिंगुळाज किंवा हिंगलाज म्हणून प्रसिद्ध झाले. हीच हिंगलाज देवी/ माता व्यापारी असलेल्या तिच्या भाविकांसोबत राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रात मध्ये आली आणि इथलीच झाली.