दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात नोबेल पारितोषिकांची घोषणा केली जाते. जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार सहा विभागांतील अतुलनीय कामगिरीसाठी दिला जातो. त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या तीन विज्ञान शाखांचा समावेश आहे. १९०० मध्ये या पुरस्कारांची सुरुवात झाली, तेव्हापासून आजतागायत या तीनच विज्ञान शाखांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. गेल्या सव्वाशे वर्षांत विज्ञानाने विविध क्षेत्रांत प्रगती केली. संगणकशास्त्र, तंत्रज्ञान ही नवी विज्ञान क्षेत्रे विकसित झाली. त्यामुळे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आणखी विविध क्षेत्रांसाठी विस्तारला जावा, याबाबत नेहमीच चर्चा होत असते. मात्र अद्याप नोबेल या तीनच मूलभूत विज्ञान शाखांसाठी दिला जात आहे. त्यामुळेच इतर विज्ञान शाखांतील संशोधकांवर आंतरराष्ट्रीय कौतुकाची थाप पडावी म्हणून आणखी काही पुरस्कार दिले जात असून ते नोबेलइतकेच प्रतिष्ठेचे ठरले आहेत. अशाच काही पुरस्कारांविषयी…

गणितासाठी आबल पारितोषिक

गेल्या शतकभरात गणित या शास्त्रशाखेत खूप प्रगती झाली आहे. जगभरातील गणितज्ञांना नोबेलसारख्याच प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे यासाठी २००२ पासून ‘आबल पारितोषिक’ देण्यात येऊ लागले. नॉर्वेमधील नॉर्वेजियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेस अँड लेटर्स या संस्थेकडून हे पुरस्कार दिले जातात. गणित क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी करणाऱ्या गणितज्ञाला दरवर्षी ७.५ दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर किंवा सुमारे सात लाख डॉलर दिले जातात. श्रीनिवास एस. आर. वर्धन या भारतीय वंशाच्या अमेरिकी गणितज्ञाला २००७ मध्ये या पुरस्काराने गौरवण्यात आले. गणितातील आणखी एक प्रतिष्ठेचे पारितोषिक म्हणजे दर चार वर्षांनी दिले जाणारे फील्ड्स मेडल. मात्र हा सन्मान केवळ ४० वर्षांखालील गणितज्ञांनाच दिला जातो.

हेही वाचा : पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या भेटीदरम्यान नक्की काय घडले? भारत-कॅनडातील तणावाचे कारण काय?

‘मिलेनियम टेक्नॉलॉजी’ पुरस्कार

हा तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पनांसाठी दिला जाणारा मोठा पुरस्कार आहे. ‘टेक्नोलॉजी ॲकॅडमी, फिनलंड’ या संस्थेकडून हा पुरस्कार दिला जातो. चांगल्या जीवनमानास समर्थन देणाऱ्या नवकल्पनांसाठीच हा पुरस्कार दिला जातो. २००४ पासून या पुरस्काराची सुरुवात झाली असून आतापर्यंत भारतीय वंशाच्या दोन संशोधकांस हा पुरस्कार मिळाला आहे. प्रा. शंकर बालसुब्रह्मण्यम यांना ‘नेक्स्ट जनरेशन डीएनए सिक्वेन्सिंग’ (एनजीएस) या तंत्रज्ञानाच्या नावीन्यपूर्णतेसाठी २०२० मध्ये हा पुरस्कार मिळाला. तर या वर्षी चेन्नईतील बी. जयंत बालिगा यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. इन्सुलेटेड-गेट बायपोलर ट्रान्झिस्टर या सेमीकंडक्टर डिव्हाइसचा शोध लावल्याबद्दल त्यांना हे पारितोषिक मिळाले.

संगणक विज्ञानासाठी ट्युरिंग पुरस्कार

आधुनिक संगणक विज्ञानाचे जनक मानले जाणारे ब्रिटिश गणितज्ञ ॲलन ट्युरिंग यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो. १० लाख डॉलर अशी पुरस्काराची रक्कम असून संगणकीय क्षेत्रातील योगदानासाठी १९६६ पासून हा पुरस्कार दिला जातो. २०१४ पासून हा पुरस्कार गूगलने प्रायोजित केला आहे. १९९५ मध्ये भारतीय वंशाचे अमेरिकी संगणकतज्ज्ञ राज रेड्डी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींची रचना केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला.

अभियांत्रिकीसाठी ड्रॅपर पुरस्कार

ड्रॅपर पुरस्कार हा कोणत्याही क्षेत्रातील अशा अभियंत्याला दिला जातो, ज्याच्या संशोधनामुळे मानवी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास लक्षणीयरीत्या मदत झाली. नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगतर्फे १९८९ पासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. चार्ल्स स्टार्क ड्रॅपर या अमेरिकन अभियंत्याच्या नावावरून हा पुरस्कार दिला जात असून पुरस्काराची रक्कम पाच लाख डॉलर आहे.

हेही वाचा : संयुक्त राष्ट्र संघटना शांतता सेना काय आहे? इस्रायल-लेबनॉन सीमेवर तैनात संयुक्त राष्ट्रांच्या सैनिकांवर हल्ला का करण्यात आला?

टायलर पारितोषिक

टायलर पारितोषिक हे ‘पर्यावरणाचे नोबेल पारितोषिक’ म्हणून ओळखले जाते. पर्यावरण क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला या पुरस्काराने गौरवण्यात येते. अडीच लाख डॉलरचे पारितोषिक असलेल्या या वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्काराची स्थापना १९७३ मध्ये फार्मर्स इन्शुरन्स ग्रुपचे संस्थापक जॉन टायलर आणि एलिस टायलर यांनी केली. १९९१ मध्ये एम. एस. स्वामीनाथन, २००९ मध्ये वीरभद्र रामनाथन, २०१५ मध्ये माधव गाडगीळ, २०१६ मध्ये सर पार्थ दासगुप्ता, २०२० मध्ये पवन सखदेव या भारतीयांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

भूगर्भशास्त्रासाठी वेटलेसेन पारितोषिक

नोबेल पारितोषिकाने दुर्लक्षित केलेल्या भूगर्भशास्त्र संशोधकांच्या सन्मानार्थ १९५९ पासून वेटलेसेन पुरस्कार दिला जातो. जॉर्ज उंगर वेटलेसेन यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार दर तीन वर्षांनी दिला जातो. विजेत्यांना २,५०,००० डॉलरचे पारितोषिक दिले जाते.

विज्ञान व कलेसाठी वुल्फ पारितोषिके

भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि कृषी शास्त्र या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संशोधनासाठी वुल्फ फाऊंडेशनतर्फे दरवर्षी चार पारितोषिके दिली जातात. त्याशिवाय एखाद्या क्षेत्रातील कलावंताला पाचवे पारितोषिक दिले जाते. प्रत्येकी एक लाख डॉलरची ही पारितोषिके आहेत. नोबेल हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असला तरी वुल्फ पारितोषिक नोबेल विषयांच्या पलीकडे काम करणाऱ्या अभ्यासकांना दिले जाते. यंदा पीक उत्पादन सुधारणा, दृष्टी पुनर्संचयित करणारी जनुक थेरपी आणि गणितीय क्रिप्टोग्राफी अशा विविध विषयांवर संशोधन करणाऱ्यांना ही पारितोषिके देण्यात आली. ब्रिटिश गायक पॉल मॅकार्टनीलाही या पारितोषिकाने गौरवण्यात आले. २००० मध्ये भारतीय कृषीतज्ज्ञ गुरुदेव खूश यांना तर यंदाच्या वर्षी वेंकटेशन सुंदरेशन यांना कृषी क्षेत्रातील या पारितोषिकाने गौरवण्यात आले. वनस्पती पुनरुत्पादन आणि बियाणे निर्मितीच्या अनुवंशशास्त्र आणि आण्विक जीवशास्त्रातील अग्रगण्य शोधांसाठी सुंदरेशन यांना हा सन्मान मिळाला.

हेही वाचा : ७,००० कोटींचे ड्रग्ज रॅकेट पोलिसांनी कसे उद्ध्वस्त केले? दिल्लीसह मुंबईत ७५० किलोहून अधिक अमली पदार्थ आले कुठून?

क्योटो पारितोषिके

क्योटो पुरस्काराची स्थापना १९८४ मध्ये जपानी उद्योगपती काझुओ इनामोरी यांनी पारंपरिकपणे नोबेल पारितोषिकात समाविष्ट नसलेल्या क्षेत्रातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी केली. प्रगत तंत्रज्ञान, मूलभूत विज्ञान आणि कला व तत्त्वज्ञान असे तीन विभाग या पुरस्काराचे आहेत. दरवर्षी ‘इनामोरी फाऊंडेशन’ प्रत्येक श्रेणीसाठी १०० दशलक्ष येन म्हणजेच जवळपास साडेपाच कोटी रुपये प्रत्येक पुरस्कार प्राप्तकर्त्याला देते. साहित्यिक व विचारवंत गायत्री चक्रवर्ती स्पीवाक यांना २०१२ मध्ये, ख्यातनाम तबलावादक झाकीर हुसेन यांना २०२२ मध्ये तर चित्रकला, व्हिडीओ कला आणि व्हिडीओ मांडणशिल्प कलावंत असलेल्या नलिनी मलानी यांना २०२३ मध्ये या पारितोषिकाने गौरवण्यात आले. कला व तत्त्वज्ञान या विभागात या तीनही भारतीयांना ही पारितोषिके मिळाली.

sandeep.nalawade@expressindia.com