Owl trafficking on Diwali: दरवर्षी दिवाळीच्या काळात हजारो घुबडं अंधश्रद्धेची बळी ठरतात. यामागील कारण म्हणजे त्यांना पकडलं जातं आणि बळी देण्यासाठी विकण्यात येतं. घुबडाचे विविध भाग कवटी, पिसे, कानावरील तुरा, नखे, हृदय, यकृत, मूत्रपिंड, रक्त, डोळे, चरबी, चोच, अश्रू, अंड्याचे कवच, मांस, आणि हाडे यांचा वापर काही धार्मिक पूजा-विधींमध्ये केला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१८ साली, TRAFFIC या वन्यजीव व्यापार निरीक्षण नेटवर्कने (wildlife trade monitoring network) निशाचर प्राण्यांच्या अवैध व्यापाराचा अभ्यास केला. या अभ्यासानुसार भारतात आढळणाऱ्या ३० प्रकारच्या घुबडांपैकी १५ प्रकारच्या वन्य घुबडांचा अवैध व्यापार करण्यात येतो हे वास्तव समोर आले. या पक्ष्यांची हाडे, नखं, कवट्या, पिसे, मांस आणि रक्त यांसाठी शिकार केली जाते. या भागांचा वापर नंतर ताईतमध्ये, काळ्या जादूसारख्या विधींमध्ये आणि पारंपरिक औषधांमध्ये केला जातो. विशेषत: कान असलेल्या घुबडांकडे सर्वात जास्त जादुई शक्ती असल्याचे मानले जाते. त्यामुळेच दिवाळी हा या घुबडांच्या बळीसाठी शुभ काळ असल्याचे मानले जाते, असे ‘डाऊन टू अर्थ’ने प्रकाशित केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

अधिक वाचा: युरोपियन देशांना त्यांच्या वसाहतवादी भूमिकेविषयी माफी मागण्याची भीती का वाटते?

एला फाउंडेशनचे संस्थापक सतीश पांडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, भारतात घुबडांची अचूक गणना आजवर कधीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे किती घुबडे मारली जातात किंवा त्यांची तस्करी केली जाते हे अचूकपणे सांगणे कठीण आहे. काही अहवालांनुसार, दरवर्षी ७० ते ८० हजार घुबडांची हत्या केली जाते. काही ठिकाणी दिवाळी आणि लक्ष्मी पूजेच्या काळात ही संख्या जास्त असते, असे पांडे यांनी सांगितले.

घुबडांचा बळी का दिला जातो?

घुबडांभोवती अनेक अंधश्रद्धा आणि परस्परविरोधी समजुती आहेत. एका मान्यतेनुसार लक्ष्मी देवी ही संपत्ती, शक्ती आणि ऐश्वर्याची देवी आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिची साग्रसंगीत पूजा केली जाते. तिचे अस्तित्त्व कायम आपल्या घरात असावे यासाठी प्रार्थना केली जाते. किंबहुना हा हेतू साध्य करण्यासाठी काही ठिकाणी तिचे वाहन असलेल्या गरुडाचा बळी दिला जातो. असे केल्याने देवीची उपस्थिती आणि तिच्याशी संबंधित संपत्ती घरातच राहते, अशी समजूत आहे. घुबड हा निशाचर आहे. त्याचे मोठे डोळे, वागणूक आणि मोठा गूढ आवाज या सर्वांचाच संबंध अशुभ घटना, दुर्दैव किंवा मृत्यूशी असल्याचा समज आहे. तर आणखी एका मान्यतेनुसार लक्ष्मी देवीची जुळी बहिण अलक्ष्मी आहे. जी शुभ लक्ष्मीच्या अगदीच उलट आहे..तिला अशुभ मानलं जातं. ती लक्ष्मीबरोबर वेगळ्या रूपात सर्वत्र संचार करते. या मताचे अनुयायी घुबडाला या अशुभ रूपाचे प्रतिनिधित्व मानतात आणि त्याचा बळी देतात. काही तांत्रिक पुजारी देखील गरुड, घार आणि घुबडे यासारख्या शिकारी पक्ष्यांच्या शरीराच्या अवयवांची मागणी करतात. ते लोकांना चुकीची माहिती देऊन फसवतात. या पक्ष्यांच्या अवयवांचा वापर किंवा सेवन केल्यास त्यांचे आरोग्यसंबंधी समस्यांचे निराकरण होईल किंवा दुष्ट प्रभावांपासून मुक्तता मिळेल असे सांगतात.

अधिक वाचा: History of Ikat: इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये भारतीय कापड; काय सांगते इकतची प्राचीन परंपरा?

डॉ. सतीश पांडे, पक्षितज्ज्ञ आणि एला फाउंडेशनचे संस्थापक यांनी ‘द प्रिंट’शी बोलताना एका प्रसंगाचे कथन केले होते. त्यांनी महाराष्ट्राच्या ईशान्य भागातील एका दुर्गम गावात काही तरुण मुलांना पाहिले, ती मुलं अत्यंत गरीब होती आणि अंगावर धड कपडेही नव्हते. ते एका पिशवीत घुबड घेऊन चालले होते. त्यांनी गोफण वापरून घुबडाला पकडले होते. त्या मुलांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, त्यांचा घुबडाचे डोळे खाण्याचा विचार होता. असे केल्यास त्यांना गाडलेला खजिना दिसू शकेल. हे अत्यंत विचित्र स्पष्टीकरण आहे, परंतु दुर्दैवाने, अशा असंख्य अंधश्रद्धा आहेत ज्यांच्यामुळे घुबडांवर अत्याचार होतो. डॉ. सतीश पांडे म्हणतात, समाजाचा हा वर्ग अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतो. एला फाउंडेशनने मागील दोन वर्षांपासून पुण्यातील पिंगोरी येथील एला हॅबिटॅटमध्ये ‘इंडियन घुबड महोत्सव’ आयोजित केला. तिथे मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जातात. विशेषतः मुलांना आणि विविध गट तसेच घटकांना घुबडांविषयी असलेल्या अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी आणि त्यांचे पर्यावरणीय महत्त्व समजावून सांगण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

गुन्हेगार शोधणे कठीण?

भारतामध्ये ३५ हून अधिक प्रकारच्या घुबडांच्या स्थानिक आणि स्थलांतरित प्रजाती आढळतात. हे निशाचर शिकारी पक्षी परिसंस्थेतील संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कारण उंदीर, सरडे, कीटक, आणि उभयचर प्राणी त्यांचे भक्ष्य असतात. त्यामुळे घुबडांच्या अस्तित्वाचे संरक्षण करणे पर्यावरणासाठी आवश्यक आहे. घुबड हे उंदरांची शिकार करतात आणि कृषी क्षेत्रातील किड्यांची संख्या नियंत्रित ठेवतात. भारतात घुबडांना वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. ज्यात त्यांची शिकार, व्यापार, आणि कोणत्याही स्वरूपात वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीसुद्धा, दरवर्षी घुबडांची हत्या केली जाते, विशेषतः ग्रामीण भागात आणि भारताच्या ईशान्य व मध्य राज्यांतील छोट्या शहरांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडे गुन्हेगारांना ओळखण्याची मर्यादित क्षमता असल्यामुळे हा गुन्हा शोधणे कठीण होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Owl trafficking and ritual sacrifices surge during diwali authorities issue alerts to prevent illegal wildlife trade svs