ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तामिळनाडूतील एका मंदिरातून चोरीला गेलेली एक प्राचीन मूर्ती परत करण्याचे मान्य केले आहे. ही कांस्य मूर्ती ५०० वर्षे जुनी असून तामिळनाडूतील प्रसिद्ध संत तिरुमनगाई आळवार यांची आहे. ही मूर्ती ब्रिटनमध्ये कशी पोहोचली, याची निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी तस्करांनी ६० च्या दशकात ती मंदिरातून चोरली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘कौन्सिल’ने अश्मोलियन संग्रहालयातून संत तिरुमनगाई आळवार यांची १६ व्या शतकातील कांस्यमूर्ती परत करण्यात यावी, या भारतीय उच्चायुक्तांच्या मागणीला ११ मार्च २०२४ रोजी सकारात्मक प्रतिसाद दिला. १९६७ साली ऑक्सफर्ड विद्यापीठातील अश्मोलियन म्युझियमने डॉ. जे.आर. बेलमोंट (१८८६-१९८१) नावाच्या संग्राहकाच्या संग्रहातून सोदबीजच्या लिलावगृहातून ही मूर्ती विकत घेतली होती. ही मूर्ती ६० सेमी उंच असून या संदर्भात संग्रहालयाने सांगितले की, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एका अभ्यासकाने या प्राचीन मूर्ती संदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर भारत सरकारतर्फे ही मूर्ती परत करण्यासंदर्भात विनंती करण्यात आली. भारतातून चोरीला गेलेल्या अनेक मूर्ती, शिल्पकृती आणि कलावस्तू अलीकडेच भारतात परत आणल्या गेल्या. त्यामुळे या मूर्तीच्याही घरवापसीचे वेध लागले आहे.

4th-century CE Sanskrit inscription unearthed in PoK's Gilgit
Shaivism in POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडला शिव उपासनेचा प्राचीन पुरावा; का ठरतोय हा संस्कृत कोरीव लेख महत्त्वाचा?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…
Bhau Daji Lad Museum, Devendra Fadnavis, Renovation ,
आक्रमणे आणि अनास्थेमुळे भारताच्या ऐतिहासिक वारशाचा ऱ्हास – देवेंद्र फडणवीस, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे नूतनीकरण
Billeshwar Mahadev temple UP Unnao
Mahabharata era Shivling damaged: महाभारतकालीन शिवलिंगाची विटंबना; अटक केलेल्या आरोपीनं सांगितलं धक्कादायक कारण

अधिक वाचा: जगातील आठवे आश्चर्य अशी मान्यता लाभलेले अंगकोर वाट आहे तरी काय? या मंदिराचा हिंदू संस्कृतीशी काय संबंध?

आळवार संत परंपरा

तिरुमनगाई आळवार हे तामिळनाडूतील शेवटचे आळवार संत होते. तिरुमनगाई यांच्याविषयी जाणून घेण्यापूर्वी आळवार परंपरेविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. मराठी विश्वकोशात भा.ग. सुर्वे यांनी आळवार परंपरेविषयी सविस्तर टीप लिहिली आहे. यात दिलेल्या नमूद केल्याप्रमाणे, ‘दक्षिण भारतातील तामिळ भाषक वैष्णव संतकवींच्या एका परंपरेस आळवार म्हणतात. आळवार म्हणजे मग्न झालेला अथवा ईश्वराच्या प्रेमसागरात बुडून गेलेला. इसवी सनाच्या पाचव्या ते आठव्या शतकात तामिळनाडूमध्ये आळवार संतपरंपरेचे प्राबल्य आढळते. एकूण १२ आळवार संत आहेत. ते पुढील प्रमाणे (कंसात संस्कृत तर कंसाबाहेर तामिळ नावे आहेत):

१. पोय्‌गै आळवार (सरोयोगी)
२. भूतत्ताळवार (भूतयोगी)
३. पेयाळवार (महदाहवयसूरि)
४. तिरुमळिशै आळवार (भक्तिसारमुनि)
५. नम्माळवार (शठकोप दिव्यसूरि)
६. मधुरकवी आळवार
७. कुलशेखर आळवार
८. पॅरियाळवार (विष्णुचित्त)
९. आंडाळ (गोदा)
१०. तोंडरडिपॉडी आळवार (भक्तांघ्रिरेणु)
११. तिरुप्पाण आळवार (पाणकवि)
१२. तिरुमंगै आळवार (परकाल दिव्यसूरि)

जातीभेद नसलेली परंपरा

आळवारांत जातीभेद नाहीत. या परंपरेत ब्राह्मण- शूद्रादी वर्णांचे लोक होते. आंडाळ (गोदा) या स्त्री संत होत्या. या संत परंपरेत वेद आणि वैष्णवागम यांतील तत्त्वज्ञानाचा समन्वय त्यांच्या भक्तिमार्गात साधलेला दिसतो.

तिरुमनगाई/ तिरुमंगै आळवार कोण होते?

या संतांच्या यादीतील शेवटचे तिरुमंगै/ तिरुमनगाई आळवार हे शेवटचे संत होते. ते सर्वात ज्ञानी संत म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक काव्यरचना केल्या. नरकवी पेरुमल आणि परकला या दोन महत्त्वाच्या उपाधींनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तिरुमनगाई आळवार हे विष्णूचे एक अनन्यभक्त होते. त्यांनी आपल्या भक्तिरसपूर्ण काव्यांनी समाजाला प्रेरित केले. त्यांचा जन्म तामिळनाडूतील तिरुक्कुरायळूर या गावातील एका प्रतिष्ठित आणि संपन्न कुटुंबात झाला होता. आयुष्याच्या पूर्वार्धात ते एक योद्धा आणि गडरक्षक होते. काही व्यक्तिगत आणि आध्यात्मिक अनुभवांमुळे ते भक्ती मार्गाकडे वळले.

त्यांनी रचलेली प्रमुख काव्ये

पेरिया तिरुमोळी: पेरिया तिरुमोळी या त्यांच्या १००२ पद्यांच्या काव्यरचनेत त्यांनी भगवान विष्णूच्या विविध रूपांच्या स्तुती करून त्याचबरोबर विविध मंदिरांची, विशेषतः श्रीरंगम मंदिराची महती गायली आहे.
तिरुनेदुंतांढगम: तिरुनेदुंतांढगम या काव्यात तिरुमंगै आळवार यांनी विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रार्थना केली आहे. ही रचना भक्ती, प्रेम, आणि समर्पण यांचा संगम आहे.
तिरुक्कुरुंथांढगम: या काव्यरचनेत तिरुमंगै आळवार यांनी स्वतःच्या भक्तीची गहनता आणि विष्णूशी असलेल्या आपल्या नात्याचे वर्णन केले आहे.
तिरुवेलुक्कुटिरुक्कै: या काव्यात त्यांनी विष्णूचा महिमा वर्णन केला आहे आणि त्याच्या विविध गुणांचे वर्णन केले आहे.

अधिक वाचा: अयोध्येतील राम मंदिराची नागर शैली नेमकी आहे तरी काय?

सामाजिक योगदान

तिरुमनगाई आळवार यांचे योगदान आजही तामिळनाडूतील विष्णू भक्ती परंपरेत मोठे आहे. त्यांच्या कवितांचे नियमित पठण आणि कीर्तन आजही केले जाते. त्यांच्या काव्यांनी आणि भक्तीने श्रीरंगम आणि इतर मंदिरांचे महत्त्व वाढवले आहे. त्यांनी आपल्या कवितांमधून विष्णू भक्तीचा प्रचार केला. त्यांच्या रचनांनी लाखो लोकांना साधनेसाठी प्रेरित केले. त्यांच्या काव्यातील भक्ती, प्रेम, आणि समर्पण यामुळे त्यांची काव्ये अतिशय प्रभावी ठरली आहेत. त्यांनी आपल्या कवितांमधून समाजातील अन्याय, अत्याचार, आणि अधर्म यांच्यावर घणाघात घातला. त्यांच्या काव्यांना आजही तमीळ साहित्य आणि भक्ती परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. तिरुमनगाई आळवार हे विष्णू भक्ती परंपरेतील एक महान संत आणि कवी होते. त्यांच्या जीवनाच्या प्रेरणादायी कथा आणि भक्तिरसपूर्ण काव्ये यामुळे ते अजरामर झाले. त्यांचे योगदान आजही तामिळनाडूतील विष्णू भक्ती परंपरेत मोठे आहे आणि त्यांच्या कवितांमुळे लाखो भक्तांना प्रेरणा मिळते. त्याच संतश्रेष्ठींच्या कांस्य मूर्तीचे पुन्हा एकदा भारतात आगमन होणार असल्याने वैष्णव पंथीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Story img Loader