वाढते वजन अनेकांसाठी त्रासदायक ठरते. हा आजार वेदना देणारा नसला तरी हळू हळू शरीराला आतून कमकुवत करतो. लठ्ठपणामुळे हृदय आणि किडनीवर सर्वात जास्त परिणाम होतो. लठ्ठपणामुळे लिव्हरवरदेखील सूज येते. डायबिटीज हेदेखील लठ्ठपणाचे एक मुख्य कारण आहे. त्यामुळे वाढत्या वजनाला नियंत्रणात आणण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. परंतु, वजन जितके सहज वाढते, तितकेच कमी करण्यासाठी वेळ लागतो. जगभरात वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येमुळे ओझेम्पिक आणि वेगोव्हीसारख्या वजन कमी करणाऱ्या औषधांची विक्री वाढली आहे. हॉलीवूडमध्ये या औषधांचा सर्वाधिक वापर केला जात आहे.

डॅनिश फर्म नोवो नॉर्डिस्क ही युरोपमधील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने वार्षिक विक्रीमध्ये अब्जावधी डॉलर्सची उलाढालदेखील केली आहे. परंतु, हे औषध एका विषारी सरड्याच्या विषाने तयार झाले आहे, ही बाब आश्चर्यकारक आहे. या सरड्याचे नाव आहे गिला मॉन्स्टर. सरड्याचा आणि ओझेम्पिक औषधीचा संबंध काय? औषधांसाठी विषाचा वापर कसा केला जातो? त्याविषयी जाणून घेऊयात.

गिला मॉन्स्टर आणि ओझेम्पिक औषधीचा संबंध काय?

२० व्या शतकाच्या शेवटी जगभरात लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असताना टोरंटो विद्यापीठातील एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉक्टर डॅनियल ड्रकर एका संप्रेरकाच्या शोधात होते. त्याच्या संशोधनामुळे अखेरीस त्यांनी त्यांचे सहकारी गॅस्ट्रोनेन्टेरोलॉजिस्ट जॉन इंग, जीन-पियरे रौफमन आणि बायोकेमिस्ट जॉन पिसानो यांच्या कामाकडे लक्ष वेधले. त्यावेळी हे त्रिकूट अत्यंत विषारी आणि सर्वात धोकादायक सरडा गिला मॉन्स्टरवर संशोधन करत होते. गिला मॉन्स्टर अमेरिकेच्या दक्षिणेकडील आणि मेक्सिकोच्या उत्तरेकडील मूळ सरपटणारा प्राणी आहे. त्यांचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले. मात्र, अखेर त्यांनी या प्राण्याच्या विषात आढळणार ‘एक्सेंडिन-४’ हा घटक ओळखला. या घटकात मानवी शरीरात आढळणाऱ्या संप्रेरक जीएलपी-१ बरोबर संरचनात्मक समानता दिसून आली.

जगभरात वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येमुळे ओझेम्पिक आणि वेगोव्हीसारख्या वजन कमी करणाऱ्या औषधांची विक्री वाढली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

‘एक्सेंडिन-४’ची चयापचय लवकर होत नाही, ही बाब संशोधकांना आश्चर्यचकित करणारी होती. याचा अर्थ असा की, ते शरीरात दीर्घकाळापर्यंत सक्रिय राहते; ज्यामुळे ते मधुमेहावरील औषधासाठी योग्य ठरते. त्याच्या शोधाबद्दल उत्साहित, संशोधकांनी अनुभवी व्यवहार विभाग तसेच इतर औषधी कंपन्यांशी संपर्क साधला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी स्वतः हार्मोनचे पेटंट घेतले. त्यांनी या शोधाचा परवाना ॲमलिन नावाच्या आता बंद पडलेल्या बायोटेक स्टार्टअपला दिला. २००५ मध्ये हे औषध अखेर ‘Exenatide’ किंवा ‘Byetta’ या नावाने टाइप २ मधुमेहावरील उपचार म्हणून सुरू करण्यात आले. यातून प्रेरित होऊन डॅनिश कंपनी नोवो नॉर्डिस्कने मधुमेहावरील उपचार म्हणून ‘जीएलपी-१’ मध्ये संशोधन सुरू केले. अनेक वर्षांच्या संशोधन आणि प्रयत्नांनंतर त्यांनी सेमॅग्लुटाइड शोधून काढले, जे केवळ रक्तप्रवाहात जास्त काळ टिकत नाही तर मानवी चाचण्यांमध्ये दुप्पट वजन कमी करते. हे औषध लठ्ठपणाच्या उपचारांसाठी वेगोवी आणि मधुमेहासाठी ओझेम्पिक या ब्रँड नावाने ओळखले गेले.

जगातील सर्वात घातक सरडा – गिला मॉन्स्टर

गिला मॉन्स्टरला वैज्ञानिकदृष्ट्या हेलोडर्मा सस्पेक्टम म्हणून ओळखले जाते. या सरड्याचे नाव गिला नदीच्या खोऱ्यावरून देण्यात आले आहे, जे दक्षिण-पश्चिम अमेरिका आणि उत्तर मेक्सिकोमध्ये आहे. या खोऱ्यातच हे सरडे आढळून येतात. सुमारे ५० सेंटीमीटर (२० इंच) पर्यंत वाढणारा हा अमेरिकेतील एकमेव विषारी सरडा आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, त्यांचे डोकं मोठे असते आणि त्यांच्या जबड्यात जोरदार चावा घेण्याची ताकद असते. चावा घेतल्यावर त्यांचे विष शरीरात शिरते. बऱ्याच दातांना दोन खोबणी असतात, जे खालच्या जबड्यातील ग्रंथींमधून मज्जातंतूचे विष वाहून नेतात.

प्रसिद्ध यूट्यूबर कोयोट पीटरसन याला गिला मॉन्स्टरने चावा घेतला होता. त्याचे वर्णन त्याने सर्वात त्रासदायक, वेदनादायक परिस्थितींपैकी एक म्हणून केले होते. या घटनेची आठवण करून देताना तो म्हणाला की, माझ्या हातावर विषाचा प्रभाव पडल्याच्या पहिल्या दोन तासात मी भ्रमात होतो. मी खरोखर विचार करू लागलो की, आता माझा हात काढून टाकणे हा माझ्यासाठी एकमात्र पर्याय असेल, कारण हा त्रास असहनशील होता.” तो पुढे म्हणाला, “सलग आठ तास मला वेदना होत होती, त्यानंतर ही वेदना कमी झाली. ही वेदना तुमच्या नसांमधून गरम लाव्हा वाहतोय अशी होती. त्याला कोणतेही उपाय थांबवू शकत नव्हते.”

प्राण्यांचे विष आणि वैद्यकीय यश

विशेष म्हणजे प्राण्यांच्या विषाने आधुनिक वैद्यकशास्त्राला मदत केल्याचे हे एकमेव उदाहरण नाही. संपूर्ण इतिहासात, शास्त्रज्ञांनी जीवन वाचवणारी औषधे विकसित करण्यासाठी प्राण्यांच्या सर्वात शक्तिशाली विषाचा वापर केला आहे. उदाहरणार्थ, ब्राझिलियन पिट व्हायपरच्या विषाने एसीई इनहिबिटर म्हणून ओळखले जाणारे औषध तयार केले. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात, संशोधक या सापाच्या विषाचा आणि रक्तदाबावरील परिणामांचा अभ्यास करत होते. त्यांनी विषापासून पेप्टाइड वेगळे केले, जे अँजिओटेन्सिन-कन्व्हर्टिंग एन्झाइम (एसीई) नावाच्या एंझाइमला प्रतिबंधित करू शकते आणि रक्तदाब कमी करू शकते. त्यामुळे पेप्टाइडची सिंथेटिक आवृत्ती तयार करण्यात आली, ज्याला ‘कॅप्टोप्रिल’ म्हणतात, असे ‘द कॉन्व्हर्सेशन’च्या अहवालात सांगण्यात आले आहे.

आज कॅप्टोप्रिल क्वचितच लिहून दिले जाते, मात्र यामुळे एसीई इनहिबिटरची नवीन आवृत्ती तयार करण्यात आली आहे, ज्याचे नाव आहे ‘एनलाप्रिल.’ याचा वापर उच्च रक्तदाब आणि हृदयसंबंधित विकारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. काही प्राण्यांचे विषदेखील कर्करोगाच्या उपचारात उपयुक्त असल्याचे आढळले आहे. २००४ मध्ये ऑन्कोलॉजिस्ट जिम ओल्सन यांना लक्षात आले की, १४ तासांच्या कठीण शस्त्रक्रियेनंतरही किशोरवयीन मुलीमध्ये ट्यूमरचा अंगठ्याच्या आकाराचा भाग राहिला; ज्यामुळे ते नाराज झाले. यावर एक चांगला मार्ग शोधण्याच्या इच्छेने, त्यांनी आणि त्याच्या टीमने शस्त्रक्रियेदरम्यान कर्करोगाच्या पेशी दिसून येऊ शकतील अशा रेणूंचा शोध घेतला. त्यांना डेथस्टॅल्कर स्कॉर्पियन (लेयुरस क्विन्क्वेस्ट्रियटस) च्या विषापासून क्लोरोटॉक्सिन हे पेप्टाइड मिळवण्यात यश आले. त्यांना आढळले की, हे कंपाऊंड विशेषत: ब्रेन ट्यूमर पेशींशी संबंधित आहे; ज्यामुळे संशोधकांना टोझ्युलेरिस्टाइड विकसित करता येते. टोझ्युलेरिस्टाइड अगदी लहान कर्करोगाच्या क्लस्टर्सलादेखील हायलाइट करतो.

बिवालिरुडिन आणि डेसिरुडिन ही अँटीकोआगुलंट औषधेदेखील आहेत, जी हिरुडिनपासून म्हणजेच जळूपासून तयार झाली आहेत. आज ही औषधे अशा लोकांना दिली जातात, ज्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याचा उच्च धोका असतो, जसे की ॲट्रिअल फायब्रिलेशन, हार्ट ॲरिथमियाचा प्रकार. आज यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने उच्च रक्तदाब, हृदयासंबंधित विकार आणि मधुमेहापर्यंतच्या परिस्थितींवर उपचार करण्यासाठी प्राण्यांच्या विषापासून तयार केलेल्या सात औषधांना मान्यता दिली आहे. आणखी दहा औषधे क्लिनिकल चाचण्यांमध्ये आहेत.

Story img Loader