Mohammad Ali Jinnah and Rattanbai: काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांना धर्म विचारून नंतर… हिंदू म्हणूनच ठार मारण्यात आले. त्यामुळे दहशतवाद्यांसाठी इस्लाम धर्म किती महत्वाचा हेच सिद्ध झालं. तीच गोष्ट अनेकदा कट्टर प्रेमाच्या बाबतीतही तेवढीच लागू होते, असं म्हणतात. हीच ताकद असुराला सूर आणि सूराला असूर करू शकते, अशी समजूत आहे. प्रेमाला कुठल्याही जातीचा, धर्माचा रंग नसणं खरं तर अपेक्षित आहे, पण तरी तसा रंग असतोच हेही अनेकदा सिद्ध झालं आहे. किंबहुना सध्या झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे असणाऱ्या पाकिस्तानच्या मुळाशीदेखील हेच बीज आहे. सध्या भारत सरकारने मुंबईतील साऊथ कोर्ट या वास्तूच्या संवर्धनाचं काम हाती घेतलं आहे. साऊथ कोर्ट ही वास्तू म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीचे जनक मोहम्मद अली जिना यांचं मुंबईतील घर अर्थात जिना हाऊस. याच घरात त्यांचा संसार फुलला आणि त्या संसाराचा दुर्दैवी अंतही झाला.
घर ताब्यात घेतले
मुंबईने आपल्या अंगणात अनेकांना जागा दिली, नावं घ्यावीत तेवढी थोडीच. याच यादीतील एक नाव म्हणजे मोहम्मद अली जिना. जिना हे १८९६ साली म्हणजेच त्यांच्या वयाच्या २० व्या वर्षी लंडनमधून शिक्षण पूर्ण करून मुंबईत स्थायिक झाले. परंतु, भारत आणि पाकिस्तान फाळणीनंतर ते कधीही भारतात परतले नाहीत. म्हणूनच, १९४९ साली भारत सरकारने जिना हाऊस (साऊथ कोर्ट) ताब्यात घेतले.
बहर आणि अंत दोन्ही तिथेच
सरकारकडून या घराविषयी नेमकं किती भाडं हवंय असा प्रश्न जिनांना विचारला असता, त्यांनी ते घर सुंदर असून मी मुंबईवर प्रेम करतो. अजूनही तिथे परत जायची मला आशा आहे. त्यामुळे ते एका लहान युरोपीय कुटुंबासाठी किंवा एका सुसंस्कृत भारतीय राजपुत्रासाठी योग्य आहे, असं उत्तर दिल होतं. एकुणातच जिना यांचं त्या घरावर प्रेम होत. त्यांचा संसार येथेच बहरास आला आणि अंतही पावला.
४२ वर्षांचे जिना आणि वधू वयवर्षे १६
जिन्ना यांची पत्नी रतनबाई पेटीट म्हणजेच रत्ती यांचा जन्म २० फेब्रुवारी १९०० रोजी ब्रिटिश भारतातील मुंबईत पारसी कुटुंबात सर दिनशा पेटीट (दुसरे बॅरनेट पेटीट) आणि लेडी दिनाबाई पेटीट यांच्या पोटी झाला होता. त्यांच्या आजोबांनी, दिनशा माणेकजी पेटीट (पहिले बॅरनेट) यांनी भारतातील सुरुवातीच्या कापड गिरण्या उभारल्या. रतनबाई पेटीट या त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांना त्याकाळी ‘बॉम्बेचे फूल’ म्हटले जात होते. एकुणातच रत्ती या सुखवस्तू कुटुंबातील होत्या.
मित्राची चीड
मोहम्मद अली जिना त्यावेळी ४० वर्षांचे होते. रत्तींच्या वडिलांपेक्षा केवळ तीन वर्षांनी लहान होते. रत्तीचे वडील आणि जिना हे मित्र असल्याने त्यांचे रत्तीच्या घरी नियमित येणं-जाण होतं. तिथेच रत्ती आणि जिना यांची ओळख झाली आणि प्रेम बहरू लागलं. दोघांच्या वयात २३ वर्षांचे अंतर होते. हा विवाह संपूर्ण भारतात चर्चेचा विषय ठरला होता. खरंतर, रत्तीच्या वडिलांना आपल्या मित्राकडून झालेल्या या कृतीची चीड आली होती.
लग्नाचा प्रस्ताव पुढे ढकलला
प्रश्न फक्त धर्माचा नव्हता तर दोघांमध्ये वयाचे बरेच अंतर होते. सुशिक्षित वातावरण असलेल्या या कुटुंबात रत्तीची स्वतःची २९ वर्षांची अविवाहित आत्या फ्रान्समधील नाइस शहरातल्या बोर्डिंग स्कूलमध्ये बॅचलर पदवी घेत होती. म्हणूनच रत्तीच्या वडिलांनी हा लग्नाचा प्रस्ताव पुढे ढकलला. परंतु, ते संपूर्ण वर्ष या कुटुंबासाठी तणावपूर्व होते. काहीही असलं तरी या कुटुंबाने रत्तीचा १६ वा वाढदिवस मोठ्या थाटात ताजमहाल हॉटेलमध्ये साजरा केला.

धर्मातील फरक आणि वयातील अंतर
आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी सर दिनशा यांनी आपल्या पाहुण्यांसाठी एक खुसखुशीत भाषण केले. त्यानंतर रत्ती उठली आणि म्हणाली, “थँक यू, पापा…” आणि अचानक एक मोठा धक्का दिला. तिने शांतपणे जाहीर केलं की जिना यांच्या विवाह प्रस्तावाला तिने होकार दिला आहे आणि लवकरच त्यांचा विवाह होणार आहे. तिने उपस्थित लोकांना त्यांच्या आनंदासाठी शुभेच्छा देण्यास सांगितलं. सभागृहात एकदम शांतता पसरली. एवढ्या उघडपणे घडलेल्या घटनेनंतर ही गोष्ट मागे घेणं शक्य नव्हतं आणि रत्ती आपला निर्णय बदलण्यास तयार नव्हती. तिच्या पालकांना हे कधीच स्वीकारता आलं नाही. त्यांच्या आक्षेपांमध्ये धर्मातील फरक, वयातील प्रचंड अंतर आणि एका मित्राची झालेली फसवणूक यांचा समावेश होता.
पारशी समाजाचा रोष
१९१८ साली आपल्या १८ व्या वाढदिवसानंतर काही आठवड्यांतच रत्तीने इस्लाम धर्म स्वीकारला आणि जिना यांच्याशी इस्लामिक पद्धतीने विवाह केला. त्यामुळे तिच्या कुटुंबाने आणि पारसी समाजाने तिच्याशी संबंध तोडले. पारशी समाजाचा केवळ रत्तीवरच नव्हे, तर तिच्या पालकांवरही रोष होता. जिना आणि रत्ती यांच्या विवाहानंतर पारशी धर्मगुरूंनी सर्व तरुणांना धार्मिक शिक्षण देण्याची मागणी केली होती. पेटीट कुटुंबाला पारशी पंचायतीने दोन पर्याय दिले होते. एकतर आपल्या मुलीसह समाजातून बहिष्कृत व्हावं किंवा मुलीला वारसातून वगळून आणि सर्व संपर्क तोडून समाजात राहावं. कुटुंबाने दुसरा पर्याय स्वीकारला.
जिना दांपत्य प्रामुख्याने मलबार हिलवरील साउथ कोर्ट मॅन्शनमध्ये राहत होते. तिथेच त्यांच्या मुलीचा जन्म झाला. तरीही माहेरच्यांशी संबंध पूर्ववत होऊ शकले नाहीत. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच जिना यांनी आपलं घर रत्तीच्या ताब्यात दिलं. तिला पूर्णपणे हवं तसं घर सजवण्याची मुभा दिली गेली. जिनांना माहीत होतं की, रत्तीला फॅशनची चांगली जाण होती. त्यामुळे, त्यांनी आपल्या कपड्यांची निवड, इतर गोष्टींची जबाबदारी तिच्यावर सोपवली. या सगळ्याचा फायदा जिनांना राजकीयदृष्ट्या झाला. कारण त्यामुळे त्यांची प्रतिमा एका फॅशनेबल, आधुनिक मुस्लिम पुरुष म्हणून निर्माण झाली.

स्लीव्हलेस ब्लाउज आणि शिफॉन साडी
दोघंही युरोपला वारंवार प्रवास करत आणि तिथे बराच काळ घालवत. ते दोघंही लोकांचे लक्ष वेधून घेणारे जोडपे होते. केवळ त्यांच्या वयाच्या आणि स्वभावाच्या विसंगतीमुळे नव्हे, तर रत्ती फॅशनच्या बाबतीत काटेकोर होती. तिचा मुख्य पोशाख स्लीव्हलेस ब्लाउज आणि शिफॉन साडी असायचा. तिचा असा धाडसी पोशाख केवळ मुस्लिम समुदायालाच नव्हे, तर ब्रिटिशांनाही धक्का देणारा होता. तरीही जिना तिच्यावर प्रेम करत होते. तिच्या प्रत्येक हट्ट पूर्ण करत होते. रत्ती त्यांना प्रेमाने J-जे असे म्हणत होती.
बहिणीचे पालकत्व
त्यांची एकुलती एक मुलगी, दिना जिना हीचा जन्म १५ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. दिनाच्या आयुष्यातील पहिल्या आठ वर्षांमध्ये तिच्याकडे तिच्या दोन्ही पालकांकडून दुर्लक्ष झालं. जिना राजकारणात व्यग्र होते आणि रत्तीने तिच्या देखभालीची जबाबदारी आया आणि नोकरांवर सोपवली होती. इतकंच काय, तिच्या नावाची निवडही तिच्या पालकांनी केलेली नव्हती. जिना यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या बहिणीचे फातिमाचे पालकत्त्व स्वीकारले होते
फातिमा व रत्तीमध्ये भांडण
फातिमाला जिना आणि रत्तीचे लग्न पसंद नव्हते. नवविवाहित जोडप्याला मोकळीक मिळावी म्हणून फातिमाला सुरुवातीला तिच्या दुसऱ्या बहिणीकडे पाठवण्यात आलं, पण नंतर ती दर रविवारी साउथ कोर्टवर येऊ लागली. फातिमा आणि रत्ती यांचे स्वभाव पूर्णपणे भिन्न होते. फातिमा ही संयमी, काटेकोर आणि जिनांच्या स्वभावाशी साम्य असलेली स्त्री होती. त्यामुळे दोघींमध्ये भांडण होऊ लागली.
रत्तीची नात्यातील तगमग
जिनांनी फातिमाला १९१९ साली डेंटल कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण कारण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि १९२३ साली तिचं स्वतःचं क्लिनिक उघडण्यासाठी मदतही केली. तरीही, रत्ती आणि जिना यांच्या नात्यात आलेली दरी मिटवण्यात हे अपयशी ठरलं. शिवाय तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे जिना सतत व्यग्र होते. परिणामी ते रत्तीकडे पुरेसं लक्ष देऊ शकले नाहीत. तिच्या आयुष्यातील शेवटच्या पत्रांमध्ये तिच्या मनात सुरु असलेली ही तगमग दिसून येते.
रत्तीचे निधन
रत्ती आणि जिना यांच्या नात्यात कटुता आल्यावर दिनाला रत्तीच्या आईला भेटण्याची संधी मिळाली. रत्ती या पोटाच्या आजाराने ग्रस्त होत्या. १९२८ च्या सुरुवातीला त्यांनी मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमधील एका सूइटमध्ये राहायला सुरुवात केली आणि जिना यांना आठ वर्षांच्या दिनाबरोबर घरी सोडलं. त्या वसंत ऋतूत पॅरिसमध्ये आपल्या आईसोबत असताना रत्ती अचानक कोमामध्ये गेल्या आणि त्यांची प्रकृती गंभीर झाली. दोन महिन्यांनंतर, १९ फेब्रुवारी १९२९ रोजी मुंबईतील ताज हॉटेलमधील त्यांच्या खोलीत त्या पुन्हा बेशुद्ध पडल्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या २९ व्या वाढदिवशी त्यांचे निधन झाले.
म्हणून लग्न करायला नको होतं…
रत्तीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करणारी कोणतीही अधिकृत वैद्यकीय नोंद उपलब्ध नाही. त्यामुळे कर्करोगापासून ते कोलायटिसपर्यंत अनेक तर्क लावले गेले. जिना त्या वेळी दिल्लीमध्ये होते. त्यामुळे त्यांना आपल्या पत्नीच्या मृत्यूची माहिती वडिलांकडून फोनवरून मिळाली. रत्ती यांच्यावर अंत्यसंस्कार मुंबईतील खोजा शिया इशना अशरी जमात अरणबाग स्मशानभूमीत करण्यात आले. पत्नीच्या मृत्यूनंतर जिन्ना यांनी आपल्या एका मित्राकडे, ती अजून लहान मुलगी होती, मी लग्न करायला नको होतं. ती माझी चूक होती, असे मत व्यक्त केले.
जिना यांच्या स्वतःच्या मुलीने जेव्हा पारशी उद्योगपती नेव्हिल वाडिया यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी त्याला तीव्र विरोध केला. अगदी तसाच संघर्ष त्यांच्या आणि दिनामध्ये झाला. जसा कधीकाळी सर दिनशा पेटीट आणि रत्ती यांच्यात झाला होता. Roses in December या महमूद अली करीम छागला लिखित पुस्तकात या बाप लेकीमधील संवाद दिला आहे. जिना यांनी दिनाला विचारलं होत, “भारतामध्ये लाखो मुस्लिम मुलं आहेत, त्यांच्यात तुला तोच एकच सापडला का?” यावर दिनाने उत्तर दिलं, “भारतात लाखो मुस्लिम मुली होत्या, मग तुम्ही माझ्या आईशीच का लग्न केलं?” जिन्ना यांचं उत्तर होतं, “ती मुसलमान झाली होती.”