पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पर्यटक लवकरात लवकर हा प्रदेश सोडण्यासाठी धडपडत आहेत. त्याशिवाय येत्या काही दिवसांत ज्यांनी या भागात येण्यासाठी नियोजन केले होते, त्या बहुतांश पर्यटकांनी आपल्या ट्रिप रद्द करायला सुरुवात केली आहे. मंगळवारी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम इथे चार दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अनेक जण हे पर्यटक होते. त्यामध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश होता. या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली असून, जम्मू-काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

पर्यटकांनी रद्द केले बुकिंग
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरला जाण्याचा विचार करणारे लोक त्यांचं नियोजन रद्द करीत आहेत. केंद्रशासित प्रदेशात पर्यटनाचा जोर वाढत असताना असा भयानक नरसंहार झाला आहे. त्याचा विपरीत परिणाम इथल्या पर्यटनावर होताना दिसत आहे. लोक त्यांच्या ट्रॅव्हल एजंट्सना फोन करून हॉटेल, तसेच विमान प्रवासाचं बुकिंग रद्द करण्यासाठी सांगत आहेत. कॅनॉट प्लेसमधील स्कायलिंक प्रायव्हेट लिमिटेडचे ऑपरेटर आशीष वर्मा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “पुढच्या १० दिवसांतल्या सर्व बुकिंग रद्द झाल्या आहेत. वर्षातील एप्रिल, मे महिन्याच्या सुट्यांच्या काळात अनेक पर्यटक इथे फिरायला येण्याचा प्लॅन करतात. बहुतांश बुकिंग या उत्तरेकडेच्या राज्यातून, तसेच गुजरात आणि पश्चिम बंगालमधून होतात. मात्र, आता या हल्ल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पर्यटकांनी फोन करून हॉटेल्सचं बुकिंग, तसंच विमान प्रवासाचं बुकिंग रद्द केलं आहे”. रस्तेमार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनीही त्यांचे प्लॅन्स रद्द केले आहेत. काही लोकांनी ऑनलाइन आपले विमान प्रवासाचे बुकिंग रद्द केले आहे.

“हा असा काळ आहे की, जेव्हा काश्मीरमध्ये पर्यटकांची खूप गर्दी होत असते. लोक प्रवासासाठी खूप आधीच बुकिंग करून ठेवतात. काश्मीरमधील याआधीची तणावपूर्ण परिस्थिती विसरून लोक मोठ्या प्रमाणात इथल्या पर्यटनाला पसंती देत होते. गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमधील परिस्थिती खूप चांगली होती. पर्यटकांची इथे इतकी गर्दी होत की, हॉटेल्सचे रूम बुक करणे हे मोठे आव्हान असायचे. श्रीनगरमध्ये अनेक नवीन हॉटेल्स सुरू झाली. तिथे आणखी हॉटेल्स आणि पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा होत आहे. मात्र, अशा परिस्थितीनंतर काही जण त्यांचे प्लॅन्स कदाचित पुन्हा करतील, अशी आशा आहे”, असे ट्रॅव्हल एजंट संजय डांग यांनी सांगितले आहे. “पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जम्मू-काश्मीरमधील पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम होईल”, असे उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले आहे.

ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ काश्मीरचे अध्यक्ष रौफ त्रंबू यांनी या हल्ल्याला मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. “गेल्या काही वर्षांत शांतातपूर्ण परिस्थितीमुळे पर्यटन क्षेत्रात वाढ झाली आहे. आम्हाला व्यवसाय आणि ग्राहक भागीदारांकडून आधीच प्रवास रद्द करण्याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत”, असेही त्रंबू यांनी पुढे सांगितले. या हल्ल्याचे परिणाम संपूर्ण खोऱ्यात जाणवतील. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिकांवर याचा गंभीर परिणाम होणार आहे.

“या दहशतवादी हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या काळात बहुतेक परदेशी पर्यटकही इथे येतात. येत्या काळात अनेक प्लॅन्स रद्द होऊ शकतात. या हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य केल्यामुळे खूपच चुकीचे संकेत लोकांपर्यंत गेले आहेत”, असेही डांग यांनी सांगितले. येत्या वर्षभर याचा परिणाम पर्यटनावर होईल, असा अंदाज टूर ऑपरेटर्सनी वर्तवला आहे.

एका ट्रॅव्हल कंपनीने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “गुरुवारी सकाळी आमचा नऊ जणांच्या ग्रुपचा दौरा श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग व पहलगाम इथे निघणार होता. हल्ल्याची बातमी येताच त्यांनी फोन केला आणि त्यांची ट्रिप रद्द केली. जूनपर्यंत बुकिंग केलेल्या लोकांचे आम्हाला फोन येत आहेत.”
“आमच्यासाठी मे आणि जूनचा पहिला आठवडा हा सर्वांत व्यग्र काळ असतो. गेल्या चार वर्षांत काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे आणि मे च्या मध्यात आम्ही दररोज ४० पर्यटकांना फिरण्यासाठी नेत असतो. आता खूप भीती आहे. मला वाटत नाही की, या वर्षी मोजक्या पर्यटकांपेक्षा जास्त पर्यटक आमच्याकडे असतील,” असेही ते पुढे म्हणाले.
यापूर्वी एका विशिष्ट समुदायातील पर्यटकांवर उघडपणे हल्ला केला आहे, असं कधी झाल्याचं आठवत नाही, असे ट्रॅव्हल व्यवसायातील काहींचे म्हणणे आहे. “आम्हाला बुकिंग रद्द करण्याचे बरेच फोन येत आहेत,” असे इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे नासिर शाह यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे.

जम्मू-काश्मीर सोडण्यासाठी पर्यटकांची गर्दी
पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटक मोठ्या संख्येने जम्मू-काश्मीर सोडत आहेत. काही भारतीय विमान कंपन्यांनी लोकांना परत आणण्यासाठी अतिरिक्त विमान उड्डाणांची व्यवस्था केली आहे. एअर इंडियाने बुधवारी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईला दोन अतिरिक्त उड्डाणे चालवत असल्याचे सांगितले. “३० एप्रिलपर्यंत या भागातील पर्यटकांनी मोफत रिशेड्युलिंग आणि तिकिटं रद्द केल्यास पूर्ण परतफेडदेखील देण्यात येत आहे”, अशी माहिती त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये दिली आहे. एअर इंडिया इतर वेळी दिल्ली आणि मुंबईहून श्रीनगरला दररोज पाच उड्डाणे चालवते. तसंच इंडिगोदेखील श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईला दोन अतिरिक्त उड्डाणे चालवणार आहे, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. “आम्ही सुरक्षित आहोत, मात्र कोणालाही इथे एक दिवसही राहायचे नाही. मला माहीत नाही की, विमान कंपन्या परतीच्या उड्डाणांचे व्यवस्थापन कसे करेल”, असे पुण्यातील वकील विजयसिंह ठोंबरे यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी खोऱ्यातून पर्यटकांच्या परतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “लोकांना येथून का जायचं आहे हे आम्हाला कळत आहे. श्रीनगर आणि जम्मू दरम्यानचा एनएच-४४ एकाच दिशेने वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे.”

जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाला कशी मिळाली होती चालना
गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गेल्या महिन्यात विधानसभेत सांगितले होते की, २०२४ मध्ये २.३ कोटी पर्यटकांनी केंद्रशासित प्रदेशाला भेट दिली.
गेल्या वर्षी जुलैमध्ये गृह मंत्रालयाने राज्यसभेत सांगितले होते की, २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेशातील पर्यटनात अभूतपूर्व वाढ झाली.
भारताचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या मते, जानेवारी ते जून २०२४ दरम्यान १.०८ कोटी पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली. २०२३ मध्ये २.११ कोटी पर्यटकांनी भेट दिली. आतापर्यंतचे हे सर्वांत जास्त प्रमाण होते. २०२२ मध्ये केंद्रशासित प्रदेशात १.८ कोटी, २०२१ मध्ये १.१३ कोटी व २०२० मध्ये ३४ लाख ७० हजार ८३४ पर्यटक आले होते. “मागील तीन वर्षांत पर्यटन क्षेत्राने वार्षिक सरासरी १५.१३ टक्के वाढ नोंदवली आहे,” असे राय यांनी गेल्या वर्षी वरिष्ठ सभागृहात सांगितले होते.

२०१८ मध्ये कलम ३७० रद्द करण्यापूर्वी १.६ कोटी पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली होती. त्यापैकी ८.३ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती, अशी माहिती राज्य पर्यटन विभागाने दी इंडियन एक्स्प्रेसला दिली. केंद्र सरकारनेही जम्मू-काश्मीरमधील पर्यटनाला प्रोत्साहन दिले आहे. गेल्या वर्षी सरकारने केंद्रशासित प्रदेशातील पर्यटन सुधारण्यासाठी धोरणात्मक बदल केले आहेत. या बदलांतर्गत काश्मीरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन, तसेच चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रोत्साहन देणे या बाबींचा समावेश होता. “गेल्या तीन वर्षांचा काळ पर्यटन व्यवसायासाठी उत्तम ठरला होता. पर्यटनामुळे कमाईदेखील चांगली झाली आहे. तसेच याआधी कायाकिंग आणि कार रेसिंगसारख्या स्पर्धांच्या आयोजनामुळे पर्यटनाला चालना मिळाली, अशी माहिती शिकारा रोअर शबीर अहमद यांनी दिली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे स्थानिकांमध्येही भीती आहे, तसेच पर्यटनात घट झाल्याने त्यांच्या राहणीमानावरही याचा परिणाम होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.