Pahalgam terror attack: अलीकडेच पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे धर्म आणि दहशतवाद यावर पुन्हा चर्चा सुरू झाली. पहलगाम हे अमरनाथ यात्रेच्या वाटेवरील एक अतिशय महत्त्वाचं स्थळं आहे. यावर्षीच्या (२०२५) अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. अमरनाथ हे महादेव शिवाचं स्थान आहे, ते पवित्र हिंदू तीर्थक्षेत्र मानलं जात. असं असलं तरी कधी काळी या मंदिराच्या देखभालीत एका मुस्लीम कुटुंबाचा मोलाचा वाटा होता. या कुटुंबाचा आणि अमरनाथाचा नेमका संबंध काय याचाच घेतलेला हा आढावा.
दंतकथा आणि नवपुरातत्त्व
धार्मिक स्थळांभोवती गुंफल्या जाणाऱ्या अनेक कथा-दंतकथांमध्ये किती सत्यता असते हा मुद्दा वादाचा आहे. परंतु, या कथा खऱ्या-खोट्या कशाही असल्या तरी त्यातून अंशतः का होईना त्या ज्या परिसराविषयी आहेत त्या परिसराची माहिती देतात. म्हणूनच नवपुरातत्त्व या विषयात दुय्यम अभ्यासाच्या साधनांमध्ये या कथांच्या अभ्यासाचा समावेश केला जातो. अशाच काही कथा अमरनाथ यात्रेसंदर्भात देखील प्रचलित आहेत. अमरनाथ गुहेत प्रत्यक्ष शंकराने पार्वतीला अमर होण्याचे गुपित सांगितल्याची कथा प्रचलित आहे. तशीच एक कथा या यात्रेच्या आरंभाविषयीही आहे.
अमरनाथच्या दोन कथा
१८ व्या शतकात काश्मीरमध्ये डोग्रा या हिंदू राजवंशाचे अधिपत्य होते. अमरनाथाचे उल्लेख यापूर्वीच्या कालखंडातील वाङ्मयात आढळत असले तरी आधुनिक (१८५०) अमरनाथ यात्रेचा प्रारंभ याच कालखंडात झाला असे मानले जाते. प्रचलित लोककथेनुसार पहलगामजवळील बटकोट या गावातील बुटा मलिक नावाच्या एका मेंढपाळाने अमरनाथ गुहेचा शोध लावला. मेंढ्या चरायला घेऊन गेला असताना त्याने गुहेत प्रवेश केला आणि या गुहेचा शोध लागला. या गुहेत त्याला बर्फाचा शिवलिंगाच्या आकाराचा खडा दिसला. याविषयी त्याने आपल्या गावातील हिंदूंना माहिती दिली. तेंव्हापासून हिंदू या ठिकाणी शिवलिंगाची उपासना करतात अशी ही कथा आहे. तर दुसऱ्या कथेनुसार हाच मेंढपाळ बर्फाळ पर्वतांमध्ये मेंढ्या घेऊन चरायला गेला असताना त्याला गुहेजवळ एक माणूस भेटला. या माणसाने त्या मेंढपाळाला कोळशाने भरलेली पिशवी दिली. घरी येऊन बघितल्यावर त्या पिशवीत सोन्याची नाणी होती. म्हणून बुटा मलिक पुन्हा त्या माणसाला भेटायला गेला परंतु, तिथे त्या माणसाच्या जागी शिवलिंगाच्या आकाराचा बर्फाचा खडा होता.
काही संस्थांचा आक्षेप
प्रत्यक्षात ही गुहा झाडांच्या रांगा आणि कुरणांच्या वरच्या भागात आहे. शेषनाग आणि पंचतरणी दरम्यान काही कुरणे असली तरी संगम ते गुहा या भागात मात्र काहीही नाही. अशा परिस्थितीत एक मेंढपाळ तिथे आपल्या मेंढ्यांसह काय करत होता, हा प्रश्न निर्माण होतो. तरीही, या प्रचलित कथेत म्हटल्याप्रमाणे मलिक कुटुंबाची भूमिका मान्य करून त्यांना गुहेतील नैवेद्याचा एक हिस्सा देण्यात येत होता. तर, मंदिर व्यवस्थापनेतही त्यांचा सहभाग होता. यात्रेला पाठिंबा देणाऱ्या काही सामाजिक-धार्मिक संस्थांनी या गोष्टीला विरोध केला होता. या कथेच्या मार्फत उगाचच यात्रेला धर्मनिरपेक्षतेचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आक्षेप या संस्थांनी घेतला होता.
मुस्लीम कुटुंबाचा पैसे घेण्यास नकार
गुहा मुस्लिमबहुल परिसरात आहे. त्यामुळे या कथेच्या मार्फत आर्थिक दृष्टिकोनातून स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यात आल्याची शक्यता अधिक असल्याचे काही तज्ज्ञ मानतात. २००८ साली श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने मलिक कुटुंबाचा शंकराशी असलेला परंपरागत संबंध संपवला. मट्टन मंदिराचे पंडित, महंत आणि मलिक कुटुंब या तिन्ही पक्षांना एकदाच पैसे देऊन समझोता करण्याची ऑफर देण्यात आली होती. “आम्हाला वडिलोपार्जित हक्क सोडण्यासाठी १.५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. इतर दोन पक्षांनी ती स्वीकारली, पण आम्ही नकार दिला,” असे मोहम्मद अफझल मलिक याने (बुटा मालिकचे वारस) DNA शी बोलताना सांगितले होते. (When a Muslim family took care of holy Hindu shrine, २०१७)
अमरनाथ यात्रा आणि गदा
१८४६ साली ब्रिटिशांनी काश्मीर डोग्रा राजांना विकल्यानंतर आधुनिक अमरनाथ यात्रेला प्रथम राज्यसंरक्षण मिळालं, असं मानलं जातं. त्याच वर्षी डोग्रा राजांनी धार्मिक संस्थांचं व्यवस्थापन करण्यासाठी धर्मार्थ ट्रस्ट स्थापन केला. धर्मार्थ ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांतच बुटा मलिक कडून या गुहेचा ‘शोध’ लागला. त्यानंतर डोग्रा शासकांनी वाराणसीमधून दशनामी आखाड्याचे प्रतिनिधी काश्मीरमध्ये आमंत्रित केले आणि त्यांनी १८७० साली श्रीनगरमध्ये आपली संस्था (आखाडा) स्थापन केली. याच काळात गुहेपर्यंत गदा नेण्याची प्रथा सुरू झाली. काही स्थानिकांच्या मते, सुरुवातीला ही गदा अमृतसरमध्ये ठेवली जात होती आणि नंतर ती श्रीनगरमध्ये हलवली गेली.
१२ व्या शतकातील उल्लेख
आजच्या अमरनाथ यात्रेतील विधी आणि परंपरा या १५०-१६० वर्षे जुन्या आहेत. असे असले तरी काश्मीरच्या इतिहासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या बाराव्या शतकातील राजतरंगिणीमध्ये अमरनाथाचा उल्लेख आढळतो. प्रत्यक्ष अमरनाथाचा उल्लेख प्राचीन असला तरी, आधुनिक अमरनाथ यात्रा गेल्या १५० वर्षांच्या कालखंडात स्थिरावलेली दिसते.
स्थानिक लोकजीवनाची अनोखी गुंफण
अमरनाथ यात्रा ही केवळ श्रद्धेची किंवा धर्माची गोष्ट नाही, तर ती स्थानिक लोकजीवनाचा, आर्थिक परस्परसहकार्याचा आणि सांस्कृतिक गुंफणीचा एक आगळावेगळा नमुना आहे. बुटा मलिक याची कथा असो किंवा डोग्रा राजांचे संरक्षण, प्रत्येक टप्प्यावर या यात्रेने विविध समुदायांना एकत्र आणले आहे. अमरनाथ गुहेच्या प्राचीन महत्त्वामुळे आणि यात्रेच्या व्यापक सामाजिक प्रभावामुळे आजही ही यात्रा लाखो लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे. भविष्यातही या यात्रेचा गाभा असलेली ‘श्रद्धा, सहिष्णुता आणि परस्पर सहकार्य’ ‘अबाधित राहावं, हीच अपेक्षा जनमानसात व्यक्त होत आहे!