पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानवरील दबाव आता वाढतच आहे. गुरुवारी पाकिस्तानने भारतीय मालकीच्या सर्व विमानांसाठी, तसेच भारतीय विमान कंपन्यांकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या किंवा चालवल्या जाणाऱ्या विमानांसाठी पाकिस्तानातील हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्पाइसजेट, एअर इंडिया व इंडिगोसह अनेक भारतीय विमान कंपन्यांनी त्यांच्या प्रवाशांसाठी प्रवासी सूचना जारी केल्या आहेत.
पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्याचा भारतीय विमानांवर काय परिणाम होईल?
पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद केल्याने दिल्लीसह उत्तर भारतातील शहरांमधून पश्चिमेकडे जाणाऱ्या सर्व विमानांवर परिणाम होईल. वरिष्ठ विमान अधिकारी आणि वैमानिकांनी पीटीआयला सांगितले की, या विमानांना पर्यायी लांब मार्गाने म्हणजे अरबी समुद्रावरून जावे लागेल. त्यामुळे भारताकडून मध्य आशिया, काकेशस, पश्चिम आशिया, युरोप, यूके आणि उत्तर अमेरिकेतील गंतव्य स्थानांवर जाणाऱ्या विमानांमध्ये व्यत्यय येईल, असे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
लांब उड्डाण मार्गांमुळे विमान कंपन्यांना अधिक इंधनाची आवश्यकता भासेल. त्यामुळे खर्च वाढेल आणि पेलोड व्यवस्थापनात आव्हाने निर्माण होतील. विमान कंपन्यांना जास्तीच्या नियमित कामांच्या खर्चाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. परिणामी विमान भाडे वाढू शकते. त्याशिवाय इतर देशांच्या विमान कंपन्या, ज्या अजूनही पाकिस्तानवरून उड्डाण करू शकतात, त्यांना प्रभावित मार्गांवर भारतीय विमान कंपन्यांच्या तुलनेत कमी भुर्दंड सोसावा लागू शकतो.
“हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकिटांच्या किमती ८ ते १२ टक्क्यांनी वाढू शकतात”, असे एका ट्रॅव्हल उद्योगातील अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. जर परिस्थिती अशीच राहिली, तर भाडे आणखी वाढू शकते. प्रवासासाठी लांब मार्गांचा वापर केल्यास इंधन जास्त प्रमाणात लागेल आणि परिणामी खर्चही वाढेल. उड्डाणाचा कालावधी वाढत असताना विमान कंपन्यांना जास्तीचे इंधन वाहून न्यावे लागेल आणि त्यामुळे पेलोड समस्या निर्माण होऊ शकतात. त्यावर उपाय म्हणून विमान कंपन्यांना विमानाचे एकूण वजन कमी करावे लागू शकते. हे करण्याचा एक मार्ग म्हणजे प्रवाशांची आणि सामानाची संख्या कमी करणे. मात्र, असे केल्यास कमी प्रवासी संख्येमुळे महसूल कमी होईल आणि विमान कंपन्यांसाठी आर्थिक अडचणी निर्माण होतील.
कमी नफ्यावर काम करणाऱ्या विमान कंपन्यांसाठी जास्त विमानभाडे, वाढलेला नियमित कामांचा खर्च आणि पेलोड निर्बंध हे व्यवहार्य पर्याय नाहीत. बाह्य अडचणींमुळे विमान कंपन्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रवाशांची संख्या वाढवू शकत नसल्यामुळे विमानभाडे वाढण्याची शक्यता आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या मते, दिल्लीहून युरोप, अमेरिका व कॅनडाला थेट उड्डाणे चालवणाऱ्या एअर इंडियाला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने याआधी हवाई क्षेत्र कधी बंद केले होते?
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांचे हवाई क्षेत्र शेवटचे बंद केले. या हल्ल्यांनंतर पाकिस्तानने अनेक महिने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद ठेवले होते. या काळात इंधनाच्या वाढत्या किमती आणि लांब उड्डाण मार्गांशी संबंधित ऑपरेशनल आव्हानांमुळे भारतीय विमान कंपन्यांना अंदाजे ७०० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एअर इंडियाला याचा सर्वाधिक फटका बसला. कारण- या कंपनीने इतर विमान कंपन्यांपेक्षा पश्चिमेकडे जाणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे जास्त चालवली.
विमान कंपन्यांनी काय म्हटले?
एक्सवरील एका पोस्टमध्ये, एअर इंडियाने जाहीर केले की पाकिस्तानने सर्व भारतीय विमान कंपन्यांसाठी हवाई हद्द बंद केल्यामुळे उत्तर अमेरिका, यूके, युरोप व मध्य पूर्वेला जाणाऱ्या आणि येणाऱ्या त्यांच्या काही विमानांना पर्यायी विस्तारित मार्गांचा वापर करावा लागेल.
“आमच्या नियंत्रणाबाहेरील या अनपेक्षित हवाई बंदीमुळे आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोईबद्दल एअर इंडिया दिलगीर आहे. आम्ही पुन्हा सांगू इच्छितो की, एअर इंडियामध्ये आमच्या ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे”, असे कंपनीने पोस्टमध्ये म्हटले आहे. इंडिगोनेदेखील हवाई बंदीचा परिणाम मान्य करीत त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही परिणाम झाल्याचे सांगितले. “त्यामुळे होणारी गैरसोय आम्हाला समजते आणि आमचे पथक तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या गंतव्य स्थानावर पोहोचण्यास मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे,” असे एअरलाइनने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
स्पाइसजेटने श्रीनगरला जाण्यासाठी व तिथून परतीच्या प्रवासासाठी, वेळापत्रक बदलण्यासाठी आणि रद्द करण्यासाठीची सवलत ३० एप्रिलपर्यंत वाढवली आहे. २२ एप्रिलपूर्वी किंवा त्यापूर्वी बुक केलेल्या तिकिटांसाठी अर्ज केला आहे. “सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी, श्रीनगर ते दिल्लीसाठी एक अतिरिक्त विमान सेवा देखील चालवत आहोत. या कठीण काळात पीडित, त्यांच्या कुटुंबियांसह आणि या घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांसोबत आम्ही मनापासून सहानूभुती व्यक्त करतो,” असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.