पाकिस्तानने भारतावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. पाकिस्तानमधील दोन नागरिकांचा खून करण्यासाठी भारताने कट रचल्याच दावा पाकिस्तानने केला आहे. या आरोपामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले असून भारताने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने नेमका काय आरोप केला? या आरोपावर भारताने नेमकी काय भूमिका घेतली? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या….
पाकिस्तानने नेमका काय आरोप केला?
काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा या बंदी असलेल्या दहशतवादी गटांशी कथितपणे संबंधित असलेल्या दोन पाकिस्तानी नागरिकांचा खून करण्यात आला. याबाबत माहिती देण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव मुहम्मद सिरस सज्जाद काझी यांनी गुरुवारी (२५ जानेवारी) एक पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या दोन नागरिकांच्या हत्येत भारतीय एजंट्सचा संबंध असल्याचे विश्वसनीय पुरावे आढळले आहेत, असा दावा केला. भारतावर अशाच प्रकारचा आरोप याआधी अमेरिका आणि कॅनडानेही केलेला आहे. पाकिस्तानमधील दोन नागरिकांची हत्या सियालकोट आमि रावळकोट येथे करण्यात आली होती. या दोन्ही नागरिकांचा खून करण्यासाठी दोन भारतीय एजंट्सने मारेकऱ्यांना पैसे दिले होते, असेही काझी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. हा आरोप करताना मात्र त्यांनी पीडित व्यक्तींबद्दल सविस्तर माहिती दिलेली नाही. पाकिस्तानमध्ये झालेल्या दोन नागरिकांच्या हत्येची तुलना त्यांनी उत्तर अमेरिकेतील इतर हत्यांशी केली.
“अन्य देशांतही अशाच प्रकारच्या हत्येची प्रकरणे समोर आली आहेत. अमेरिका, कॅनडा आदी देशांत हत्येसाठी ज्या पद्धतीने सापळा रचलेला होता, त्याच पद्धतीने पाकिस्तानमधील या दोघांची हत्या करण्यात आली,” असे काझी म्हणाले.
‘पाकिस्तानकडून भारतावर खोटे आरोप’
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. पाकिस्तानकडून भारताविरोधात द्वेषपूर्ण प्रचार केला जात आहे. तसेच भारतावर खोटे आरोप केले जात आहेत, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.
‘संपूर्ण जगालाच माहिती आहे की…’
“संपूर्ण जगालाच माहिती आहे की पाकिस्तान हे दहशतवाद, संघटीत गुन्हे, बेकायदेशीर दहशतवादी कारवाया यांचे केंद्र राहिलेले आहे. भारतासह इतर अनेक देशांनी पाकिस्तानला याबाबत सावध राहण्याचा सल्ला दिलेला आहे. दहशतवादी संस्कृतीमुळे हा देश स्वत:चाच नाश करून घेईल हे भारतासह जगातील इतर देशांनीही पाकिस्तानला सांगितलेले आहे,” असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव मुहम्मद सिरस सज्जाद काझी यांना प्रत्युत्तर दिले. स्वत:च केलेल्या चुकांना दुसऱ्यांना जबाबदार धरणे हा समस्येवरचा उपाय असू शकत नाही, असेही जैस्वाल म्हणाले.
कोणत्या दोन लोकांची हत्या?
जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याचा साथीदार शाहीद लतीफ याची पंजाब प्रांतातील सियालकोट येथील एका मशिदीत ११ ऑक्टोबर २०२३ रोजी हत्या करण्यात आली. २०१६ साली पठाणकोट येथील भारतीय वायुदलाच्या तळावर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. शाहीद लतीफ या हल्याचा प्रमुख सूत्रधार होता. तसेच ८ सप्टेंबर २०२३ रोजी रियाझ अहमद उर्फ अबू कासीम याचीदेखील पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट या भागातील अल-कुदुस मशिदीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अबू कासीम हा लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. जम्मू काश्मीरमधील धांगरी येथे १ जानेवारी २०२३ रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. अबू कासीम या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार होता असे म्हटले जाते.
‘हत्येसाठी आर्थिक मदत’
“पाकिस्तानमध्ये हत्यासत्र राबवण्यासाठी भारतीय एजंट्सने परराष्ट्रांच्या भूमिका उपयोग केला. तसेच या हत्या घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला. या एजंटने गुन्हेगार, दहशतवादी यांची भरती केली. हत्यासत्र घडवून आणण्यासाठी त्यांनी या लोकांना आर्थिक मदत केली,” असा आरोप काझी यांनी केला.
‘हत्येचे समाजमाध्यमावर उदात्तीकरण’
हा आरोप करताना काझी यांनी भारतातील काही समाजमाध्यम खात्यांचा तसेच भारतीय माध्यमांचा दाखला दिला. भारतातील समाजमाध्यमांवर तसेच माध्यमांमध्ये या हत्यांचे गौरवीकरण करण्यात आले, असे काझी म्हणाले. पाकिस्तानात हत्या घडवून आणण्यासाठी समाजमाध्यमांचीही मदत घेण्यात आली, असेही काझी म्हणाले.
हत्येसाठी मुहम्मद उमैरची घेतली मदत
शाहीद लतीफच्या हत्येचा दाखला देताना काझी यांनी योगेश कुमार या व्यक्तीचे नाव घेतले. “आम्ही शाहीद लतीफच्या हत्येची सखोल चौकशी केली. भारतीय एजंट योगेश कुमार हा परदेशात राहतो. पाकिस्तामधील स्थानिक गुन्हेगारांशी संपर्क साधण्यासाठी कुमारने परदेशातच राहणाऱ्या मुहम्मद उमैर या व्यक्तीची मदत घेतली. मात्र यात त्याला अपयश आले,” असा दावा काझी यांनी केला.
‘पाच लोकांची एक टीम तयार तयार करण्यात आली’
“अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर लतीफ याची हत्या करण्यासाठी मुहम्मद यालाच पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आले. मुहम्मदने पाकिस्तानमध्ये पाच लोकांची एक टीम तयार केली आणि लतीफ याची हत्या केली,” असा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव काझी यांनी केला.
‘भारतीय एजंट योगेश कुमार याच्याशी व्यवहार’
लतीफ याच्या हत्येत कथितपणे सहभागी असणाऱ्यांना पाकिस्तानी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला चालू आहे. “या हत्याप्रकरणात भारतीय एजंट योगेश कुमार याच्याशी झालेल्या व्यवहाराचे पुरावे आहेत,” असा दावा काझी यांनी केला.
कॅनडाचा आरोप काय?
परदेशात असलेल्या खलिस्तानी फुटीरवाद्यांच्या हत्येची योजना आखण्यात भारताचा सहभाग आहे, असा आरोप याआधी कॅनडा आणि अमेरिकेने केलेला आहे. त्यानंतर आता पाकिस्ताननेदेखील भारतावर अशाच प्रकारचे आरोप केले आहेत. जून २००२३ मध्ये हरदीप सिंह निज्जर याची कॅनडात हत्या झाली होती. त्यानंतर या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. या आरोपाचे मात्र भारताने स्पष्ट शब्दांत खंडन केले होते.
अमेरिकेने काय आरोप केला होता?
खलिस्तानी फुटीरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याची अमेरिकेत हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. या हत्येसाठी भारतीय नागरिक निखिल गुप्ता भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार काम करत होता, असा आरोप अमेरिकेने केला होता. भारताने मात्र हा आरोपदेखील फेटाळला होता. अशा प्रकारच्या हत्या घडवून आणणे हे आमच्या सरकारचे धोरण नाही, असे भारताने अमेरिकेला सांगितले होते.