बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातून पलायन केल्यानंतर बांगलादेशमध्ये राजकीय गोंधळ उडाला आहे. नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. मात्र अद्याप राजकीय स्थैर्य आलेले नाही. बांगलादेशमध्ये अजूनही हिंसक निदर्शने कमी झालेली नाही. अल्पसंख्याक हिंदूदेखील बांगलादेशातील दंगलखोरांचे लक्ष्य झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. या हिंदुविरोधी हल्ल्यांमुळे भारतात चिंता वाढली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा आणि संरक्षणसुनिश्चित करण्याची विनंती केली आहे. आता, काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत असा दावा केला आहे की, आंदोलकांनी १९७१च्या बांगलादेश मुक्ती युद्धाच्या स्मरणार्थ मुजीबनगर येथे असणार्‍या एका पुतळ्याची तोडफोड केली. ही कृती ‘भारतविरोधी’ असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. परंतु, खरंच या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली का? या पुतळ्याचे महत्त्व काय? याविषयी जाणून घेऊ.

१९७१ च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्कारली. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

हेही वाचा : देशातील ‘या’ प्रमुख धरणाचा दरवाजा तुटला, पाण्याच्या मोठ्या विसर्गाने सतर्कतेचा इशारा; नक्की काय घडले? शेतकरी का घाबरले?

शशी थरूर काय म्हणाले?

१९७१ च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्कारली. याच आत्मसमर्पणाचे चित्रण करण्यात आलेल्या एका पुतळ्याचे छायाचित्र थरूर यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले. हा पुतळा उध्वस्त झाल्याचे या चित्रात दिसून आहे. शशी थरूर यांनी लिहिले, “१९७१ चे मुजीबनगर येथील शहीद स्मारक संकुल येथील पुतळ्यांची अशी अवस्था पाहून वाईट वाटले. भारतविरोधी दंगलखोरांनी ही तोडफोड केली. हे हल्लेखोर भारतीय सांस्कृतिक केंद्र, मंदिरे आणि हिंदूंच्या घरांवर अनेक ठिकाणी हल्ले करत आहे.” थरूर म्हणाले की, काही आंदोलकांचा अजेंडा अगदी स्पष्ट आहे. “बांगलादेशचे अंतरिम सरकार प्रत्येक धर्माच्या हितासाठी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी तातडीने आवश्यक पाऊले उचलतील अशी अपेक्षा आहे. या अशांततेच्या काळात भारत बांगलादेशच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे, परंतु अशा अराजकतेला कधीही माफ करता येणार नाही,” असेही ते म्हणाले.

पुतळ्याचे महत्त्व

बांगलादेश मुक्तीसंग्रामात भारतीय सैन्याने पाकिस्तानला जेरीस आणले होते; ज्यानंतर पाकिस्तानने शरणागती पत्करायचे मान्य केले. भारत-बांगलादेश संयुक्त फौजांचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग आणि पाकिस्तानी फौजांचे अधिकारी लेफ्टनंट जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाजी यांनी शरणागतीच्या त्या ऐतिहासिक दस्तऐवजावर स्वाक्षऱ्या केल्या. जगजीत सिंग अरोरा यांच्या उपस्थितीत नियाझीच्या आत्मसमर्पणाचा तो क्षण आहे, ज्याचा पुतळा उभारण्यात आला होता.

१६ डिसेंबर १९७१ रोजी नियाझीने ९३ हजारांवर पाकिस्तानी आणि सरकारी अधिकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर लष्कराने केलेले हे सर्वात मोठे आत्मसमर्पण होते. यासह भारताचे पाकिस्तानबरोबरचे युद्ध अवघ्या १३ दिवसांत संपले. त्यानंतर पाकिस्तानची फाळणी झाली आणि पूर्व पाकिस्तान बांगलादेश झाला. शशी थरूर यांनी पाकिस्तानच्या आत्मसमर्पणाची आठवण करून देणार्‍या त्याच पुतळ्याचे छायाचित्र पोस्ट केले.

खरंच पुतळ्याची तोडफोड झाली का?

थरूर यांच्या दाव्याला नीरज राजपूत नावाच्या एका ‘एक्स’ वापरकर्त्याने आव्हान दिले आणि तुटलेल्या पुतळ्याची माहिती खोटी आणि बनावट असल्याचे सांगितले. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, “बांग्लादेशातील खुलना जिल्ह्यातील मुजीबनगर येथील १९७१ च्या शहीद स्मारक संकुलात लोक/पुतळे जमिनीवर पडले असल्याचे माझ्या २०१८ साली शेअर केलेल्या छायाचित्रात पाहू शकता. हे उध्वस्त करण्यात आलेले पुतळे नाहीत. अनेक पत्रकार, दिग्गज आणि माजी मंत्री ही छायाचित्रे शेअर करत आहेत. हे पुतळे बांगलादेश लष्कराच्या ताब्यात असल्याने अजूनही सुरक्षित आहेत; त्यामुळे काहीही शेअर करताना सावध रहा.”

हेही वाचा : भारतातील कोचीन ज्यू समुदाय नामशेष होण्याच्या मार्गावर; कारण काय? जाणून घ्या या समुदायाचा इतिहास

राजपूत यांनी त्यांचे २०१८ चे ट्विट स्मारकातील चित्रांसह शेअर केले; ज्यात आत्मसमर्पण वाद्यांचा पुतळा आणि बांगलादेशींवर पाकिस्तानी सैन्याने मुक्तियुद्धात केलेल्या अत्याचारांचे चित्रण केलेले पुतळे आहेत. बांग्लादेश दैनिक ‘प्रथम आलोच्या २०१८ च्या मुजीबनगर मेमोरियल या शीर्षकाच्या लेखात या स्मारकातील अनेक चित्रे आहेत. मुजीबनगरमध्ये हे पुतळे आहेत. मुजीबनगर बांगलादेशच्या इतिहासातील महत्त्वाचे स्थान आहे. येथेच स्वतंत्र बांगलादेशच्या अंतरिम सरकारने एप्रिल १९७१ मध्ये शपथ घेतली होती. ‘डेली सन’च्या वृत्तानुसार, मुजीबनगरला पूर्वी ‘बोयद्यनाथटोला’ म्हणून ओळखले जात असे. बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या सन्मानार्थ त्याचे नाव बदलून मुजीबनगर करण्यात आले.

Story img Loader