पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (एलओसी) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा नियंत्रण रेषा ओलांडली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ भागातही पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली. शत्रूच्या तुकड्यांनी भारतीय चौक्यांवरही गोळीबार केला. गृहमंत्री अमित शाह यांच्या ७ आणि ८ एप्रिल रोजी होणाऱ्या जम्मू आणि काश्मीर दौऱ्यापूर्वी ही घटना घडली आहे. कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दल अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांवर कारवाई करत आहेत. नक्की काय घडले? गेल्या वेळी अशी घुसखोरी झाली तेव्हा काय घडले होते? दोन देशांतील शस्त्रसंधी करार काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

नक्की काय घडले?

मंगळवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी ही घटना घडली. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा घाटी सेक्टरमधील नांगी तिकटी भागात नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्यात आले. घुसखोरीमुळे स्फोट झाला, ज्यामध्ये पाच पाकिस्तानी सैनिक जखमी झाले. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या या कृत्याला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराच्या कृष्णा घाटी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली नांगी टेकरी बटालियनच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार चार ते पाच पाकिस्तानी सैनिक या चकमकीत मारले गेले आहेत. भारतीय लष्कराची कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाले नसल्याचे वृत्तदेखील समोर आले आहे.

जम्मूस्थित संरक्षण जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल सुनील बर्टवाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, १ एप्रिल २०२५ रोजी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली. या घुसखोरीमुळे कृष्णा घाटी सेक्टरमधील एका सुरुंगात स्फोट झाला. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने विनाकारण गोळीबार केला आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.” सुनील बर्टवाल म्हणाले, “भारतीय सैन्याने संतुलित पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर दिले. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे,” असेही ते म्हणाले.

शस्त्रसंधी करार काय?

“नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांमध्ये झालेल्या २०२१ च्या सामंजस्य कराराच्या तत्त्वांचे पालन करण्याचे महत्त्व भारतीय सैन्य पुन्हा अधोरेखित करते,” असे बर्टवाल यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. ‘एनडीटीव्ही’नुसार, २०२१ च्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिंसाचाराला कारणीभूत ठरू शकणाऱ्या चिंता दूर करण्यासाठी एक सामंजस्य करार केला होता. नियंत्रण रेषेवरील सर्व करारांवर आणि युद्धबंदी पाळली जाईल, यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली गेली होती.

‘इंडिया टुडे’ने वृत्त दिले आहे की, अलीकडच्या काही महिन्यांत नियंत्रण रेषेवर सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारात मोठी वाढ झाली आहे. भारतीय लष्करातील सूत्रांनी सांगितले की, त्यांना स्थानिक पातळीवर होत असलेल्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी वेळेचे भान ठेवून सामोरे जावे लागते. स्थानिकांची जीवितहानी होऊ नये, हे त्यामागील उद्दिष्ट असते. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी घुसखोरीचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले आहेत. या प्रक्रियेत त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि अलीकडील हल्ल्याच्या घटनेनंतरचा तणाव कमी करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानने फेब्रुवारीमध्ये पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर (एलओसी) ध्वज बैठक आयोजित केली होती. सूत्रांनी सांगितले की, ब्रिगेड-कमांडर स्तरावरील ध्वज बैठक ‘चक्कन-दा-बाग’क्रॉसिंग पॉइंट क्षेत्रात झाली. या बैठकीत दोन्ही बाजूंनी सीमेवर शांतता राखण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते. ही बैठक अतिशय शांततापूर्ण वातावरणात झाली आणि दोन्ही बाजूंनी सीमेवरील शांततेच्या हितासाठी युद्धबंदी कराराचे पालन करण्याचे मान्य केले, असे सूत्रांनी सांगितले.

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन्ही देशांनी कराराचे नूतनीकरण केल्यापासून जम्मू आणि काश्मीरच्या सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन पूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहे. परंतु, पाकिस्तानी लष्कराचे घुसखोरीचे प्रयत्न सातत्याने सुरूच असतात. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानकडून अनेकवेळा गोळीबार करण्यात आला आहे. जम्मूतील कानाचक सेक्टर येथे ११ सप्टेंबर २०२४ रोजी, आरएस पुरा येथे १४ फेब्रुवारी २०२४ रोजी, सांबा येथील रामगड सेक्टर येथे ९ नोव्हेंबर २०२३ रोजी हल्ले झाले आहेत.

पाकिस्तानी सैन्याने यापूर्वी नियंत्रण रेषा ओलांडली तेव्हा काय घडले होते?

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, जुलै २०२४ मध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बीएटी) ने कुपवाडाच्या उत्तरेकडील भारतीय चौकीवर विनाकारण हल्ला केला. सूत्रांनी वृत्तपत्राला सांगितले की, बॉर्डर अॅक्शन टीममध्ये पाकिस्तानी लष्करी कर्मचारी आणि दहशतवादी असतात. बॉर्डर अॅक्शन टीम सहसा नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या घुसखोरांना कव्हर फायर प्रदान करते. या घटनेत दोन ते तीन पाकिस्तानी जवानांनी खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेचा वापर करून नियंत्रण रेषा ओलांडली होती.

त्यानंतर त्यांनी भारतीय लष्कराच्या चौकीवर ग्रेनेड आणि गोळीबार करून हल्ला केला. ‘ईटीव्ही भारत’च्या वृत्तानुसार, या हल्ल्यात एक सैनिक ठार झाला आणि मेजर रँकच्या अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले. मृत भारतीय सैनिक जम्मू आणि काश्मीरचा रहिवासी होता. श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात त्याचे निधन झाले. “ही घटना अशाच प्रकारच्या घुसखोरीच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. अशा घुसखोरीसाठी पाकिस्तानी सैन्याने मदत केली आणि प्रोत्साहन दिले आहे, दाट झाडे आणि कमी दृश्यमानता परिस्थितीचा फायदा घेतला गेला आहे. सतर्क भारतीय सैन्याने हे प्रयत्न सातत्याने हाणून पाडले आहेत,” असे एका लष्करी प्रवक्त्याने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले. या घटनेत एक पाकिस्तानी घुसखोर, शत्रूसाठी मार्गदर्शक असणारा एक नागरिकदेखील मारला गेला, असे वृत्त ‘ईटीव्ही भारत’ने दिले.