अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतात एका कट्टरवादी इस्लामी राजकीय पक्षाच्या सभेत आत्मघातकी हल्लेखोराने रविवारी (३० जुलै) बॉम्बस्फोट घडवून आणला. या शक्तिशाली बॉम्बस्फोटात किमान ४५ जण ठार, तर दोनशेहून अधिक लोक जखमी झाले. या बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानधील अतिरेकी कारवाया आणि येथील दहशतवादी संघटनांचा पाकिस्तानलाच होत असलेला त्रास याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटना आणि पाकिस्तान सरकार यांच्या संघर्षाबद्दल जाणून घेऊ या…
अफगाणिस्तानच्या सीमा भागातून दहशतवादी कारवाया
पाकिस्तानच्या वायव्येकडे अफगाणिस्तानच्या सीमा भागातून दहशतवादी आपल्या कारवाया पार पाडतात. २०१८ साली हा प्रदेश खैबर पख्तुनख्वा प्रांतात विलीन करण्यात आला. त्याआधी या प्रदेशाला अर्धस्वायत्त आदिवासी क्षेत्र म्हटले जायचे. १९८० च्या दशकात या भागात ‘इस्लामिस्ट गुरिल्ला फायटर्स’चे प्रमाण वाढले होते. २००१ साली अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये आपली लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर या प्रदेशात तालिबान, अल कायदा या दहशतवादी संघटनांचा प्रचार, प्रसार वाढला होता.
पाकिस्तानमध्ये अनेक सुन्नी इस्लामिक दहशतवादी गट कार्यरत
मागील एका वर्षापासून पाकिस्तानमध्ये तहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या इस्लामिक संघटनेच्या कारवाया वाढल्या आहेत. या संघटनेने २००७ सालापासून पाकिस्तानमध्ये अनेक शक्तिशाली हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झालेला आहे. पाकिस्तानमध्ये अनेक सुन्नी इस्लामिक दहशतवादी गट कार्यरत आहेत. टीटीपी ही या गटांची सर्वोच्च संघटना म्हणून ओळखली जाते.
कोणाशी चर्चा करावी, पाकिस्तानसमोर प्रश्न?
टीटीपी या इस्लामिक संघटनेत अनेक छोट्या-मोठ्या इस्लामिक संघटनांचा समावेश आहे. यातील काही संघटना याआधीच वेगळ्या झालेल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकारला या संघटनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झालेले आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेमके कोणत्या गटाशी चर्चा करावी, असा प्रश्न पाकिस्तान सरकारसमोर आहे. दरम्यान, टीटीपीने खैबर पख्तुनख्वा येथे राजकीय सभेत झालेल्या स्फोटात आमचा सहभाग नसल्याचे सांगितले आहे. तसेच या हल्ल्याचा निषेधही केला आहे.
२०२२ साली पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बॉम्बहल्ला
टीटीपी ही संघटना आपले बहुतांश हल्ले पाकिस्तानमध्येच करते. ISIS या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या इस्लामिक स्टेट इन खोरसान (IS-K) ही संघटनादेखील पाकिस्तानमध्ये वेगवेगळे हल्ले करते. या संघटनेने २०२२ साली पाकिस्तानच्या पेशावर येथील एका मशिदीवर बॉम्बहल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक लोक मारले गेले होते.
IS-K अफगाणिस्तानमध्ये सक्रिय
IS-K ही संघटना पाकिस्तानपेक्षा अफगाणिस्तानमध्ये जास्त सक्रिय आहे. तेथे टीटीपी या संघनटेत फूट पडली आहे. या संघटनेतील काही दहशतवादी हे IS-K संघटनेत सहभागी झाले आहेत, तर अन्य काही छोटे गट सोबत येऊन काम करत आहेत.
पाकिस्तानमध्ये नव्या दहशतवादी गटाची स्थापना
पाकिस्तानमध्ये नुकतेच तहरिक ए जिहाद पाकिस्तान (टीजेपी) हा नवा दहशतवादी गट स्थापन झाला आहे. या गटानेदेखील पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. या गटाने अलीकडेच पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात एकूण १२ जवानांचा मृत्यू झाला होता. या अतिरेकी गटाबाबत कोणाकडेही अधिक माहिती उपलब्ध नाही. तसेच हा गट कोणत्या मोठ्या गटाच्या अंतर्गत काम करतो, हेदेखील अद्याप समजू शकलेले नाही.
रविवारी झालेला आत्मघाती बॉम्बहल्ला हा पूर्वीचा आदिवासी भाग म्हणून ओळख असलेल्या बाजौर या भागात झाला. या हल्ल्यात जमियत उलेमा-ए-इस्लाम-फझल (जेयूआय-एफ) या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. हा पक्ष कट्टर इस्लामचा सिद्धांत मानतो. तसेच हा पक्ष सध्या पाकिस्तान सरकारमध्ये सामील आहे.
पक्षाच्या अध्यक्षांवरही केला होता हल्ला
जेयूआय-एफ पक्षाने स्थानिक इस्लामिक दहशतवाद्यांना विरोध केला होता. याच कारणामुळे या पक्षाचे अध्यक्ष मौलाना फझल उर रेहमान यांच्यावर यापूर्वी हल्ला झालेला आहे. मात्र, हा पक्ष अफगाणिस्तानमधील तालिबान मोहिमेला पाठिंबा देतो.
इस्लामिक कायद्यानुसार सरकार चालवण्याचे लक्ष्य
पाकिस्तानमधील इस्लामिक दहशतवाद्यांना मुस्लिमबहुल राष्ट्रांमधील सत्ता उलथवून लावायच्या आहेत. अशा प्रकारच्या दहशतवादी संघटनांचा हाच मुख्य उद्देश असतो. सरकार उलथवून तेथे इस्लामिक कायद्यानुसार सरकार चालवायचे, अशी या दहशतवादी संघटनांची भूमिका असते.