अमोल परांजपे
पाकिस्तानच्या पेशावर शहरात मशिदीमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान १०० जणांचा मृत्यू झाला आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या कट्टरतावादी अतिरेकी संघटनेने याची जबाबदारी फेटाळली असली, तरी संशयाची सुई याच संघटनेकडे आहे. दुसरा अफगाणिस्तान होण्याच्या दिशेने पाकिस्तानची वाटचाल सुरू असल्याची भीती आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्याच वेळी आपला सर्वात जवळचा शेजारी या नात्याने भारतालाही सावध होणे गरजेचे आहे.
टीटीपी संघटनेचा इतिहास काय आहे?
टीटीपी ही अतिरेकी संघटना अफगाणी तालिबानचा पाकिस्तानी भाऊ आहे. बैतुल्ला मेहसूद याने २००७ साली टीटीपीची स्थापना केली. सध्या नूर वाली मेहसूद हा तिचा म्होरक्या आहे. त्याने अफगाणी तालिबानला जाहीरपणे आपली निष्ठा वाहिली आहे. ही अनेक छोटय़ा-छोटय़ा सशस्त्र दहशतवादी संघटनांची शिखर संघटना आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये या संघटनेचे प्राबल्य इतके आहे, की तिथल्या काही प्रदेशात पाकिस्तान सरकारऐवजी त्यांचीच ‘सत्ता’ चालते.
टीटीपी एवढी शक्तिशाली कशी झाली?
अर्थातच पाकिस्तानात अतिरेक्यांना असलेल्या राजाश्रयामुळे. यामध्ये पाकिस्तान लष्कर आणि त्यांची गुप्तहेर संघटना आयएसआयचा सर्वात मोठा हात आहे. टीटीपी शक्तिशाली होण्याचे दुसरे कारण म्हणजे खैबर पख्तुनख्वा प्रांतामधील सरकारची निष्क्रियता. अलीकडे टीटीपीला पुन्हा पंख फुटले, त्याचे कारण मात्र अफगाणिस्तानातील सत्तांतर हे आहे. तिथे आता टीटीपीचा मोठा भाऊ अफगाण तालिबान निरंकुश सत्तेत आहे. त्यांच्या मदतीने पाकिस्तानमध्ये तालिबानी राजवट प्रस्थापित करण्याचे टीटीपीचे मनसुबे आहेत. या संघटनेची भीड एवढी चेपली आहे, की त्यांनी जानेवारीमध्ये आपण किती हल्ले केले, त्यात किती माणसे मारली याची माहिती देणारे पत्रकच जारी केले आहे. एका महिन्यात ४६ (बहुतांश खैबर पख्तुनख्वा प्रांतात) कारवाया केल्या, ४९ जणांना मारले आणि ५८ जखमी केले, असा दावा या पत्रकात आहे.
राजकीय अस्थिरता आणि आर्थिक दुर्बलतेचा परिणाम किती?
पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता नवी नाही. इम्रान खान यांचे सरकार पडल्यानंतर शहाबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये अनेक पक्ष आहेत. तातडीने मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी खान यांचा शरीफ सरकारवर दबाव आहे. त्यातच पाकिस्तान प्रचंड आर्थिक गर्तेत अडकला आहे. पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेतील परकीय चलन गंगाजळी रसातळाला गेली आहे. शरीफ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, म्हणजेच आयएमएफसमोर पदर पसरला आहे आणि आता नाणेनिधी सांगेल त्या अटी मान्य करून कर्जाची फेररचना करणे आणि आणखी काही डॉलर पदरात पाडून घेणे हाच पर्याय त्यांच्यासमोर आहे. कोणत्याही क्षणी पाकिस्तान दिवाळखोरीत निघेल अशी शक्यता असताना या अराजकाचा फायदा उचलण्यासाठी तालिबान सरसावली आहे. अफगाणिस्तानातील खेळ पुन्हा खेळण्याची तयारी सुरू असली, तरी या दोन शेजारी देशांच्या परिस्थितीत जमीन-आसमानाचा फरक आहे.
पाकिस्तानात तालिबान वाढणे अधिक धोकादायक का?
अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हस्तगत केली, त्याचा जगावर फारसा परिणाम झालेला नाही. पाकिस्तानमध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश आहे. तेथे तालिबानसारखे अतिरेकी विचारसरणीचे लोक सत्तेत आले आणि त्यांच्या हाती ही अण्वस्त्रे पडली तर अनर्थ ओढवेल. एखादी दहशतवादी संघटना अण्वस्त्रसज्ज होणे, हे केवळ भारतासाठी नव्हे, तर सगळय़ा जगासाठी दु:स्वप्न आहे. कारण या अण्वस्त्रांचा वापर केवळ भारतावरच होणार नाही, तर काळय़ा बाजारात जगभरातील अन्य अतिरेकी संघटनांना ही अण्वस्त्रे विकली जाण्याची शक्यता आहे. एकीकडे पाकिस्तानच्या आयएमएफसोबत वाटाघाटी सुरू असतानाच पेशावर येथे स्फोट होणे, हा योगायोग आहे की आणखी काही, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
टीटीपीची भारताला चिंता का?
सध्या या अतिरेकी संघटनेचे प्रभावक्षेत्र हे प्रामुख्याने अफगाण सीमेवर आहे. भारताच्या सीमावर्ती भागात या संघटनेचे तितकेसे अस्तित्व नाही. मात्र लष्कर-ए-तोयबा, जामात-उद-दवा या बंदी घातलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचे नेते आणि अतिरेकी पाकिस्तानच्या प्रत्येक प्रांतात आहेत. त्यांच्यातील काही जण हे छुपे समर्थक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालिबानची वाढती ताकद लक्षात घेता यातील अनेक अतिरेकी त्यांच्याकडे जाण्याची भीती आहे. असे झाल्यास तालिबान थेट भारताच्या सीमेवर येऊ शकेल. या संघटनेच्या हाती पाकिस्तानची अण्वस्त्रे पडली, तर त्याचा सर्वात मोठा धोका हा अर्थातच भारताला असेल. त्यामुळेच पाकिस्तानात घडणाऱ्या राजकीय, आर्थिक आणि सुरक्षाविषयक घडामोडींकडे सातत्याने बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे.