पाकिस्तानच्या तेहरीक ए इन्साफच्या शंदाना गुलजार खान यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशाच्या संवैधानिक संस्थांच्या विरोधात वक्तव्यं केल्या प्रकरणी आणि चिथावणी दिल्याच्या आरोपांप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या मीडिया संघटनेने ही माहिती दिली आहे.
शंदाना गुलजार यांनी खैबर पख्तूनख्वामध्ये झालेल्या स्फोटप्रकरणात पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यांनी हे म्हटलं होतं की पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या सांगण्यावरून तहरीक ए तालिबानच्या मशिदीत स्फोट घडवण्यात आळा. या स्फोटात ४० पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. शंदाना गुलजार यांच्या विरोधात दोन समुहात तेढ निर्माण करणं, चिथावणीखोर वक्तव्यं करणं आणि देशद्रोह असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाकिस्तानमध्ये अशा नेत्यांची लांबलचक यादी आहे, ज्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यात आता शंदाना गुलजार यांचंही नाव जोडलं गेलं आहे. जानेवारी महिन्यात फवाद चौधरी यांना पाकिस्तान निवडणूक आयोगाविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याआधी केंद्रीय मंत्री अली अमीन आणि पीटीआयचे शाहबाज गिल यांच्यावर असेच आरोप झाले आहेत. द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने या संदर्भातले वृत्त दिलं आहे.
कोण आहेत शंदाना गुलजार?
शंदाना गुलजार खैबर पख्तुनख्वामधल्या राखीव महिलेच्या जागेवरून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. २०१८ मध्ये त्यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये शपथ घेतली होती. याआधी त्यांनी पाकिस्तान सरकारमध्ये संसदीय सचिव म्हणूनही काम केलं आहे. शंदाना गुलजार यांनी केंब्रिज विद्यापीठातून एलएलएमची पदवी घेतली आहे. इम्रान खान यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर शाहबाज शरीफ यांची पंतप्रधान म्हणून निवड होण्यापूर्वी शंदाना गुलजार यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यांसह राजीनामा दिला होता. नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी सामूहिक राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला आणि सांगितलं होतं की त्यांची वैयक्तिकरित्या पडताळणी केली जाईल. १३० पैकी ११ खासदारांचे राजीनामे स्वीकारण्यात आले त्यात शंदाना गुलजार यांचा समावेश होता.