पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था आणि त्यासाठी पाकिस्तानने विकसित देशांकडे निधीची मागणी करणे ही आता नित्याचीच बाब आहे. दोन वर्षांपूर्वी, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेचे चित्र मांडले होते. त्यात त्यांनी खेद व्यक्त केला होता की, मित्र देशांनीही पाकिस्तानकडे नेहमी भीक मागणारा देश म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. आता तर पाकिस्तान खरोखरच त्या देशातील भीक मागणाऱ्यांमुळे त्रस्त झाला आहे. त्यामुळे जवळपास २००० भिकाऱ्यांचे पासपोर्ट रोखून धरण्याची वेळ त्या देशावर आली.
भीक मागणे हा मोठा व्यवसाय?
पाकिस्तान सरकार हातात भिकेचे भांडे घेऊन फिरत असताना, देशात भीक मागणे हा एक प्रकारचा एक मोठा, संघटित व्यवसाय बनला आहे. नोकऱ्यांचा अभाव आणि महागाईमुळे मोठ्या संख्येने देशातील गरीब भीक मागण्यासाठी प्रवृत्त होतात. २३ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशात, ३.८ कोटी भिकारी असल्याची नोंद करण्यात आली आहे. कराचीमध्ये एक लाख ३० हजारांहून अधिक भिकारी आहेत. तर तीन लाख भिकारी दरवर्षी रमजानपूर्वी इतर शहरांतून येथे येतात, असे वृत्त होते. कराचीमध्ये सरासरी २००० रुपये, लाहोरमध्ये १४०० रुपये आणि इस्लामाबादमध्ये ९५० रुपये एक भिकारी दररोज गोळा करतो, असेही वृत्त प्रसिद्ध झाले होते. म्हणजेच प्रति भिकारी मिळणारी सरासरी रक्कम ८५० रुपये आहे. तेथील एकूण भिकाऱ्यांची वार्षिक कमाई ४२ अब्ज डॉलर आहे. ही रक्कम जे पाकिस्तानच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
हे ही वाचा… भारतीय पोस्ट खात्याच्या नावे लोकांची आर्थिक फसवणूक; काय आहे हा घोटाळा? कशी टाळता येईल फसवणूक?
भिकाऱ्यांच्या पासपोर्टवर निर्बंध का?
पाकिस्तानच्या मोठ्या शहरांमध्ये तसेच लहान शहरांमध्ये भीक मागणे हा संघटित व्यवसायच आहेच. शिवाय इतर देशांमध्येदेखील भिकारी ‘निर्यात’ केले जातात. तोदेखील एक मोठा व्यवसाय आहे. सरकारने अलीकडेच दोन हजारांहून अधिक भिकाऱ्यांचे पासपोर्ट सात वर्षांसाठी ‘ब्लॉक’ करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. परदेशात भिकारी पाठवणाऱ्या एजंटांचे पासपोर्टही सरकार जप्त करणार आहे. पाकिस्तानी सरकारचे म्हणणे आहे की, याद्वारे ते परदेशात भीक मागण्याच्या व्यवसायावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण यामुळे इतर देशांमध्ये पाकिस्तानची बदनामी झाली आहे. पाकिस्तानी भिकारी प्रामुख्याने सौदी अरेबिया, इराण आणि इराकमध्ये जातात.
भिकाऱ्यांच्या चौकशीत काय उघड?
पाकिस्तानातील भिकारी मोठ्या प्रमाणात परदेशात जात आहे, ज्यामुळे ‘मानवी तस्करी’ वाढली आहे, असे वृत्त एका पाकिस्तानी वृत्तपत्राने पाकिस्तानच्या परराष्ट्र विषयक समितीने दिलेल्या माहितीच्या आधारे प्रसिद्ध केले होते. अनेक भिकारी सौदी अरेबिया, इराण आणि इराकमध्ये प्रवास करण्यासाठी यात्रेकरू व्हिसाचा गैरवापर करतात. परदेशात अटक करण्यात आलेले ९० टक्के भिकारी पाकिस्तानी वंशाचे होते. पाकिटमारीमध्येही पाकिस्तानी नागरिक होते. सध्या जपान अशा भिकाऱ्यांसाठी एक नवीन गंतव्यस्थान म्हणून उदयास येत आहे, असे विदेश मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर यांनी सांगितले. देश सोडून गेलेल्या कुशल आणि अकुशल कामगारांच्या प्रश्नावर समितीमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हा खुलासा केला.
हे ही वाचवा… शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह चर्चेत कशा आल्या? त्यांच्यावरील अश्लील शेरेबाजीचा वाद काय?
पाकिस्तानमध्ये स्थिती कशी आहे?
भीक मागण्याचा व्यवसाय पाकिस्तानच्या आर्थिक अडचणीइतकाच जुना आहे. पाकिस्तानमध्ये हा व्यवसाय इतका स्पर्धात्मक पातळीवर पोहोचला आहे की किफायतशीर जागेसाठी अनेकदा भिकाऱ्यांची भांडणे विकोपाली गेली आहेत. एप्रिलमध्ये, कराचीच्या न्यायालयाने एका भिकाऱ्याने दाखल केलेला अर्ज फेटाळला. यात त्याने चार अन्य भिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती. बस स्टॉपजवळील भीक मागण्याची जागा रिकामी करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश द्यावेत अशासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. दोन्ही पक्षांनी किफायतशीर जागेसाठी दीर्घकाळापासून एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. यावरून तेथील या व्यवसायाची स्थिती लक्षात येते.
भिकाऱ्याची संख्या का वाढत आहे?
नॅशनल कौन्सिल फॉर सोशल वेलफेअरसाठी २०१० मध्ये कराचीमधील भिकाऱ्यांवर केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की मुलाखती घेतलेल्या ५८ टक्के भिकाऱ्यांनी पर्यायी नोकऱ्या स्वीकारण्यास नकार दिला. त्यातील चोवीस टक्के भिकारी सुतारकाम, चपला तयार करणे, टेलरिंग इत्यादी कामात आधीच निपुण होते. भिकाऱ्यांमध्ये २० ते ४० वर्षे वयोगटातील पुरुषांची संख्या तुलनेने जास्त होती. भिकारी निर्मूलनासाठी सरकारने दीर्घकाळ संघर्ष केला आहे. भिकाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचे आवाहनही करण्यात आले होते. २०११ मध्ये, शेकडो भिकाऱ्यांनी फैसलाबादमध्ये पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. त्यावेळी एका भिकाऱ्याने सांगितले की, “ते आम्हाला गुन्हेगार असल्यासारखी वागणूक देऊ शकत नाहीत. पाकिस्तानमध्ये भीक मागणे हा गुन्हा कधीपासून बनला आहे?” भिकाऱ्यांवर पोलिसांच्या कारवाईने अपेक्षित परिणाम होत नाही त्यामुळे भिकाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण नाही.
pradnya.talegaonkar@expressindia.com