बांगलादेश आणि पाकिस्तानमधील वाढती जवळीक भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अनेक वर्षांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय)चे प्रमुख बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक हे लेफ्टनंट जनरल मुहम्मद यांच्याबरोबर या आठवड्याच्या सुरुवातीला दुबईमार्गे बांगलादेशात आले. बांगलादेश लष्कराचे क्वार्टर मास्टर जनरल (क्यूएमजी) फैजुर रहमान यांनी त्यांचे स्वागत केले, असे वृत्त ‘द इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले. या दौऱ्यामुळे सर्वांच्या भुवया का उंचावल्या आहेत? पाकिस्तान आणि बांगलादेशमधील वाढत्या संबंधांचा भारतावर काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.
दौऱ्यामुळे भारताच्या चिंतेत वाढ
वृत्तानुसार, रहमानचे इस्लामवादी आणि पाकिस्तान यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे मानले जाते; ज्यामुळे या नवीन प्रतिबद्धतेच्या परिणामांबद्दल भुवया उंचावल्या आहेत. ही हाय-प्रोफाइल भेट दोन्ही देशांदरम्यान गुप्तचर-सामायीकरण नेटवर्क तयार करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. निरीक्षकांना भीती आहे की, यामुळे भारताला लक्ष्य करणाऱ्या विशेषत: सीमापार अशांतता निर्माण केल्या जाण्यासारख्या विध्वंसक कारवाया होऊ शकतात. हा दौरा बांगलादेशी आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या परस्परसंवादाच्या मालिकेला अनुसरून आहे. हा दौरा अनेक वर्षांच्या शत्रुत्वानंतर वाढती जवळीकता सूचित करतो. मलिक यांचा दौरा दक्षिण आशियातील व्यापक भू-राजकीय बदलांशी सुसंगत आहे. बदलत्या प्रादेशिक गतिशीलतेला प्रतिसाद म्हणून देश त्यांच्या परराष्ट्र धोरणांमध्ये बदल करत आहे.
बांगलादेश आणि इस्लामाबादमधील संबंध कसे बिघडले?
१९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धापासून ऐतिहासिकदृष्ट्या विभक्त झालेल्या बांगलादेश आणि पाकिस्तानने अलीकडेच त्यांचे संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. बांगलादेशात गेल्या वर्षी नाट्यमयरीत्या गोष्टी बदलल्या. भारताच्या दीर्घकाळ सहयोगी असलेल्या शेख हसीना यांना मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विरोधांदरम्यान त्यांची सत्ताधीश स्थानावरून उचलबांगडी करण्यात आली. तेव्हापासून अंतरिम सरकारचे नेतृत्व करणाऱ्या मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. युनूस आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्यातील संबंध आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत झालेल्या बैठकीनंतर सुधारत असल्याचे लक्षात आले. या घडामोडींमुळे या दोन देशांमधील महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदलांचा मार्ग मोकळा झाला आहे. उदाहरणार्थ- बांगलादेशच्या अंतरिम सरकारने कार्गोच्या भौतिक तपासणीची आवश्यकता काढून टाकण्यासह पाकिस्तानबरोबरच्या व्यापारावरील निर्बंध कमी केले आहेत.
१९७१ पासून तोडलेले दोन राष्ट्रांमधील थेट सागरी दुवे प्रस्थापित होणे हे संबंध सुधारण्यासाठी उचलण्यात आलेले ऐतिहासिक पाऊल आहे. त्याबरोबरच बांगलादेश पाकिस्तानबरोबरचे लष्करी सहकार्य आणखी वाढविण्याच्या तयारीत आहे. फेब्रुवारी २०२५ पासून पाकिस्तानी लष्करी अधिकारी बांगलादेश लष्कराला प्रशिक्षण देतील आणि पाकिस्तान-बांगलादेशमधील ‘अमन २०२५’ संयुक्त नौदल सरावात सहभागी होतील. या वाढत्या लष्करी सहकार्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.
भारतासाठी हा चिंतेचा विषय का?
भारत या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कारण- याचा प्रादेशिक सुरक्षेवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. नव्याने सुधारलेल्या बांगलादेश-पाकिस्तान संबंधांकडे भारताच्या ईशान्येकडील राज्यांसाठी संभाव्य धोका म्हणून पाहिले जाते. विशेषत: यामुळे सीमापार घुसखोरी आणि अतिरेकी कारवायांबाबतची चिंता वाढते. सिलिगुडी कॉरिडॉर हा भारताच्या ईशान्येकडील राज्यांना देशाच्या इतर भागांशी जोडणारा एक अरुंद पट्टा आहे आणि तो विशेषतः असुरक्षित आहे. तज्ज्ञ इशारा देतात की, हे विकसित होण्याच्या मार्गावर असलेले संबंध भारताला अस्थिर करण्याच्या मोठ्या रणनीतीचा भाग असू शकतात.
“बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संबंध एकूणच सुधारले आहेत यात शंका नाही. या बदलाचा भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो,” असे इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या संस्थापक शांती मेरीट डिसोझा यांनी डिसेंबरमध्ये ‘डीडब्ल्यू’ला सांगितले. भारताने बांगलादेशच्या सीमेवर सुरक्षा वाढवली आहे, पाळत ठेवण्याचे प्रगत तंत्रज्ञान तेथे तैनात करण्यात आले आहे आणि घुसखोरी व तस्करीच्या क्रियाकलापांना आळा घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडून (बीएसएफ) उच्चस्तरीय तपासणी केली जात आहे.
याव्यतिरिक्त ही भीती कायम आहे की, चीन या घडामोडींचा फायदा घेऊन या प्रदेशात, विशेषतः सिलिगुडी कॉरिडॉरजवळ आपला प्रभाव वाढवू शकतो. आसाम, मेघालय व त्रिपुरासह भारतातील ईशान्येकडील राज्ये ऐतिहासिकदृष्ट्या अशांतता आणि बंडखोरींना बळी पडत आहेत; ज्यामुळे हे क्षेत्र भारतीय अधिकाऱ्यांसाठी चिंतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. विकसित होत असलेली ही परिस्थिती बांगलादेशच्या व्यापक धोरणात्मक उद्दिष्टांबाबतही प्रश्न निर्माण करते. पाकिस्तानशी सुधारलेले संबंध भारताच्या वाढत्या प्रादेशिक वर्चस्वाला प्रतिसाद म्हणून पाहिले जाऊ शकतात. काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, बांगलादेश अधिक संतुलित परराष्ट्र धोरण तयार करण्यासाठी या सामंजस्याचा फायदा घेत असेल. परंतु, तसे पाहिले तर बांगलादेशसाठीही ही जोखीम आहे. कारण- यामुळे बांगलादेशचे भारताशी पारंपरिकपणे मजबूत असलेले संबंध ताणले जाऊ शकतात.
पाकिस्तान-भारत-बांगलादेश त्रिकोणाचे पुढे काय होणार?
पाकिस्तानच्या आयएसआय प्रमुखांची बांगलादेश भेट दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण भू-राजकीय बदल अधोरेखित करते. मलिक यांच्या भेटीचा संपूर्ण अजेंडा अजून समजलेला नाही. मात्र, तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, त्यांची चर्चा कदाचित गुप्तचर सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षा यावर केंद्रित असेल. ऐतिहासिक वैमनस्य आणि सध्याचे राजकीय बदल लक्षात घेता, आपल्या शेजारच्या विकसित शक्ती समीकरणांमध्ये भारतासमोर आपल्या धोरणात्मक हितसंबंधांचे रक्षण करण्याचे एक मोठे आव्हान आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अशा वेळी वाढत आहेत, जेव्हा भारताची ईशान्येकडील राज्ये मानवी तस्करी, बंडखोरी यांसारख्या समस्यांशी झुंजत आहेत. चीनसह बाह्य शक्ती या प्रदेशात पाय रोवण्यासाठी परिस्थितीचा गैरफायदा घेऊ शकतात या भीतीमुळे भारताची चिंता आणखी वाढली आहे.
हेही वाचा : गोमूत्राने आजार बरे होतात? वैद्यकीय तज्ज्ञ काय सांगतात?
“हे महत्त्वाचे प्रश्न विचारात घेण्यासारखे आहेत की, दोन देशांचे मजबूत होणारे संबंध भारताला अस्थिर करण्याच्या मोठ्या रचनेचा भाग आहेत. हे खरे आहे, असे गृहीत धरले, तर बांगलादेशातील सध्याच्या राजवटीला असे धोरण अवलंबणे परवडेल का, असा प्रश्न आल्यास उत्तर नाही असेच आहे,” असे डिसोझा म्हणाले. बांगलादेश-पाकिस्तान संबंधांची वाटचाल आणि त्यांचा भारतावर होणारा परिणाम ठरवण्यासाठी येणारे काही महिने महत्त्वाचे ठरतील, असे निरीक्षकांचे मत आहे.