-अन्वय सावंत
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदासाठी पाकिस्तानला प्रबळ दावेदार मानले जात होते. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या संघाने गेल्या काही वर्षांत ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली होती. यंदा मात्र त्यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. सलामीच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडून हार पत्करल्यानंतर पाकिस्तानला दुसऱ्या सामन्यात तुलनेने दुबळ्या झिम्बाब्वेकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे अवघड जाणार आहे. पाकिस्तानच्या अनेक नामांकित माजी क्रिकेटपटूंनी या संघावर टीकाही केली आहे. मात्र, पाकिस्तानच्या संघावर ही वेळ का ओढवली आहे, याचा आढावा.
बाबर-रिझवानच्या अपयशाचा फटका बसला का?
कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान ही सलामीची जोडी पाकिस्तानच्या फलंदाजीची आधारस्तंभ मानली जाते. या दोघांनीही गेल्या दोन-तीन वर्षांत उत्कृष्ट कामगिरी करताना जागतिक क्रिकेटमध्ये दरारा निर्माण केला आहे. ट्वेन्टी-२० क्रमवारीत रिझवान अव्वल, तर बाबर चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकातही त्यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा केली जात होती. मात्र, दोघांनाही या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. भारताविरुद्धच्या सामन्यात बाबर खातेही न उघडता माघारी परतला, तर रिझवानला केवळ चार धावा करता आल्या. या दोघांनाही डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने बाद केले. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध आपली कामगिरी उंचावण्याची या दोघांकडे संधी होती. मात्र, बाबरला केवळ चार, तर रिझवानला केवळ १४ धावाच करता आल्या. या सामन्यांत अधिक उसळी असणाऱ्या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजीविरुद्ध खेळताना बाबर आणि रिझवानच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.
मधल्या फळीबाबतची चिंता खरी ठरते आहे का?
दोन्ही सामन्यांत बाबर-रिझवान हे प्रमुख फलंदाज पॉवर-प्लेमध्येच माघारी परतल्याने पाकिस्तानच्या मधल्या फळीवर दडपण आले. ट्वेन्टी-२० विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानला मधल्या फळीची चिंता होती. त्यामुळे त्यांनी संघात काही बदलही केले. गेल्या काही काळात तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फखर झमानला संघाबाहेर करण्यात आले. त्याच्या जागी डावखुऱ्या शान मसूदला संधी देण्यात आली. मसूदने या संधीचा उत्तम वापर करताना भारताविरुद्ध नाबाद ५२, तर झिम्बाब्वेविरुद्ध ४४ धावांची खेळी केली. भारताविरुद्ध मसूदला इफ्तिकार अहमदची (५१ धावा) चांगली साथ लाभली होती. मात्र, झिम्बाब्वेविरुद्ध इफ्तिकार (५ धावा) अपयशी ठरला. तसेच शादाब खानला (५ आणि १७ धावा) बढती देण्याचा पाकिस्तानचा डाव दोन्ही सामन्यांत फसला. युवा हैदर अलीने दोन सामन्यांत मिळून दोन धावा केल्या. झिम्बाब्वेविरुद्ध मोहम्मद नवाजने (२२ धावा) पाकिस्तानला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरच्या षटकात दडपण हाताळण्यात त्याला अपयश आले.
गोलंदाजांच्या वापरात चुका?
बाबर आझमला फलंदाजीत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही, शिवाय कर्णधार म्हणूनही त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बाबरने दोन्ही सामन्यांत आक्रमक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख फलंदाजांना लवकर बाद करण्याच्या हेतूने बाबरने आपल्या प्रमुख गोलंदाजांना सुरुवातीलाच बरीच षटके दिली. त्यामुळे अखेरच्या षटकांत शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ आणि नसीम शाह या प्रमुख गोलंदाजांची एकेकच षटके शिल्लक होती. भारताविरुद्ध शाहीन आणि हारिस यांनी टाकलेले अनुक्रमे १८वे आणि १९वे षटक महागडे ठरले. त्यातच त्यांची चार-चार षटके टाकून झाल्याने अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजवर आली. नवाजला दडपण हाताळता आले नाही. त्याने एक नो-बॉल आणि दोन वाइड चेंडू टाकत भारताच्या विजयाला हातभार लावला.
शाहीन आफ्रिदीच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह?
गेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सलामीच्या लढतीत पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने भारताच्या केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली या प्रमुख फलंदाजांना माघारी धाडले होते. त्यामुळे आफ्रिदी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. पुढेही त्याने दर्जेदार कामगिरी सुरू ठेवली. मात्र, या वर्षी जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आफ्रिदीच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला आशिया चषक स्पर्धेला मुकावे लागले. परंतु ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी त्याचे पाकिस्तान संघात पुनरागमन झाले. मात्र, पहिल्या दोन्ही सामन्यांत आफ्रिदीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारताविरुद्ध त्याने चार षटकांत ३४ धावा दिल्या आणि त्याला एकही गडी बाद करता आला नाही. मग झिम्बाब्वेविरुद्धही त्याची बळींची पाटी कोरीच राहिली. त्यामुळे तो खरेच पूर्णपणे तंदुरुस्त आहे का, की त्याला खेळवण्याची पाकिस्तानने घाई केली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.