चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद गेल्यापासून अनेक गोष्टींचा सामना त्यांना करावा लागत आहे. आयोजन स्थळांना तयार करण्यास लागलेला उशीर चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर भारताचे सामने दुबई येथे हस्तांतरित करण्यात आले. गेल्या दोन दिवसांत नवा वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघाने स्पर्धेच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिण्यास नकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजीत सैकिया यांनी भारतीय संघ सर्व नियमांचे पालन करेल असे स्पष्ट केले. ‘आयसीसी’चा जर्सी परिधान करण्याचा नियम काय सांगतो, भारताने आपली भूमिका का बदलली याचा हा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर्सीवर पाकिस्तानच्या नावास विरोध का?

भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स करंडकाचा सामना २३ फेब्रुवारीला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळेल. या स्पर्धेसाठी सर्व संघांच्या जर्सीवर यजमानांचे नाव असणार आहे. सुरुवातीला पाकिस्तानचे नाव असलेला लोगो भारतीय संघाच्या जर्सीवर लावण्यास ‘बीसीसीआय’ने नकार दिल्याची माहिती होती. मुंबईत २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले होते. २०१२-१३ मध्ये दोन्ही देशांमध्ये अखेरची द्विपक्षीय मालिका झाली होती. त्यानंतर दोन्ही संघ केवळ ‘आयसीसी’ स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. यंदाची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पाकिस्तानात होत असल्याने भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. त्यांचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) होणार आहे.

‘आयसीसी’चा नियम काय?

भारताने स्पर्धेची जर्सी परिधान न केल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमाचा उल्लंघन समजला जाईल. ‘आयसीसी’ स्पर्धांचा इतिहास पाहिल्यास सहभागी होणाऱ्या संघांना यजमान देशाचा उल्लेख असणारी जर्सी परिधान करावी लागते. मग, स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी झाली तरीही हा नियम कायम असतो. उदाहरण द्यायचे झाल्यास २०२१ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या जर्सीवर भारताचे नाव होते आणि पाकिस्तानच्या संघाने ही जर्सी परिधान केली होती. मात्र, ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे पार पडली होती. तसेच भारतात २०१६ मध्ये झालेला ट्वेन्टी-२० विश्वचषक व २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान पाकिस्तानच्या जर्सीवरही भारताचे नाव नमूद केले होते. यापूर्वीच ‘बीसीसीआय’ने सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघास पाकिस्तानात न पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे स्पर्धेचे सामने आता दुबई, कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होणार आहेत.

‘बीसीसीआय’ सचिव सैकिया काय म्हणाले?

भारतीय क्रिकेट संघ आगामी चॅम्पियन्स करंडकासाठी ‘आयसीसी’च्या जर्सीसंबंधी असलेल्या नियमांचे पालन करेल, असे ‘बीसीसीआय’ सचिव सैकिया यांनी सांगितले. ‘‘चॅम्पियन्स करंडकादरम्यान जर्सी संबंधित नियमांबाबत अन्य संघ जे काही करतील, त्यांचे पालन आम्ही करू,’’ असे सैकिया म्हणाले. स्पर्धेपूर्वी रोहित शर्माचा इतर कर्णधारांसह कार्यक्रमाच्या सहभागाबाबत मात्र सैकिया यांनी काहीच स्पष्ट सांगितले नाही.‘‘रोहित ‘आयसीसी’च्या कार्यक्रमाकरिता पाकिस्तानला जाणार की नाही, हे अजूनही निश्चित झालेले नाही,’’ असे सैकिया यांनी नमूद केले.

छायाचित्रासाठी रोहित पाकिस्तानात?

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला १९ फेब्रुबारीपासून सुरुवात होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात सर्व संघांचे कर्णधार सहभागी होणार आहेत. यावेळी कर्णधार एकत्रित पत्रकार परिषद घेतील. तसेच त्यांचे छायाचित्रही काढण्यात येईल. हे सर्व ‘आयसीसी’ स्पर्धांपूर्वी होत असते. भारतीय संघ आपले सामने दुबईत खेळणार असल्याने कर्णधार रोहित पाकिस्तानात जाण्याबाबत साशंकता आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) रोहित कार्यक्रमात सहभागी व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.रोहितला पाकिस्तानला जाण्यासाठी भारत सरकारकडून परवानगी मिळवावी लागेल. मुळात संघच पाकिस्तानचा दौरा करत नसल्याने त्यालाही परवनागी मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. ‘आयसीसी’ला हा कार्यक्रम दुसरीकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली असल्याचे ‘बीसीसीआय’ सूत्रांनी सांगितले. ‘‘यापूर्वी ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडकाचे सामने पाकिस्तानात सामने न खेळण्याची भारताची विनंती मान्य केली आहे. त्यामुळे हे प्रकरण त्या तुलनेने मोठे नाही,’’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘पीसीबी’ची भूमिका काय होती?

‘बीसीसीआय’च्या भूमिकेमुळे ‘पीसीबी’ची चिंता आणखी वाढली होती. ‘आयसीसी’ यामधून काही मार्ग काढेल असे ‘पीसीबी’ला वाटते. ‘‘बीसीसीआय क्रिकेटमध्ये आता राजकारण आणत आहे. ही खेळासाठी चांगली गोष्ट नाही. त्यांनी पाकिस्तानात संघ पाठविण्यास नकार दिला. आता ते आपल्या कर्णधारालाही पाठविण्यास इच्छुक नाहीत. तसेच, त्यांना जर्सीवर आता यजमान देश म्हणजेच पाकिस्तानचे नाव नको आहे. त्यामुळे या प्रकरणात ‘आयसीसी’ लक्ष देऊन पाकिस्तानला पाठिंबा देईल अशी अपेक्षा आहे,’’ असे ‘पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले होते. सध्या तरी जर्सीबाबत तोडगा निघाल्याचे ‘पीसीबी’ला समाधान मिळाले असेल. मात्र, रोहितच्या कार्यक्रमातील सहभागाबाबतच्या निर्णयावर त्यांचे विशेष लक्ष राहील.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan name on team india jersey india refuses first then agree to wear pakistan name jersey in champions trophy print exp zws