पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. येथे नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाने ही निवडणूक जिंकल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे तुरुंगात असलेल्य इम्रान खान यांनीही एक्सच्या माध्यमातून ही निवडणूक जिंकल्याचा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा निकाल काय लागला? सत्तास्थापनेचं गणित काय आहे? येथे सामान्य नागरिकांत असंतोष का आहे? हे जाणून घेऊ या…
दोन्ही नेत्यांकडून निवडणूक जिंकल्याची घोषणा
सध्या इम्रान खान आणि नवाझ शरीफ या दोन्ही प्रमुख नेत्यांनी निवडणुकीत विजय झाल्याची घोषणा केलेली आहे. तर दुसरीकडे सध्या पाकिस्तानमध्ये नागरिकांत अस्वस्थता आहे. अनेक ठिकाणी निवडणूक निकालात फेरफार केल्याचा आरोप केला जातोय. खरं पाहता या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्टपणे बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे येथे आघाडीचे सरकार स्थापन करण्याच प्रयत्न नवाझ शरीफ यांच्याकडून केला जातोय.
नवाझ शरीफ यांच्यासाठी अनपेक्षित निर्णय
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत तेथील लष्कराचा मोठा हस्तक्षेप असतो. तेथे लष्कराच्या पाठिंब्याशिवाय पंतप्रधान होता येत नाही, असे म्हटले जाते. यावेळी नवाझ शरीफ यांच्या पाठीशी लष्कराने आपली ताकद उभी केली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नवाझ शरीफ बहुमतात निवडून येणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र शरीफ यांच्यासाठी निकाल काहीसा निराशाजनक ठरला आहे.
इम्रान खान तुरुंगात, उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली
पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे नेते इम्रान खान हे वेगवेगळ्या आरोपांखाली तुरुंगात आहेत. या निवडणुकीत पीटीआय पक्षाचे निवडणूक चिन्ह वापरण्यास मानाई करण्यात आली होती. त्यामुळे पीटीआय पक्षातील काही नेत्यांनी लष्कराच्या आशीर्वादाने स्वत:चे पक्ष काढले होते. तर काही पक्षांनी इम्रान खान यांच्याशी प्रामाणिक असल्याचे सांगत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यामुळे या निवडणुकीत इम्रान यांचे समर्थक फार काही करू शकणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
म्हणजेच ८ फेब्रुवारीच्या निवडणुकीत नवाझ शरीफ कसे विजयी होतील, यासाठी पूर्ण नियोजन करण्यात आले होते. गुरुवारच्या रात्री या निवडणुकीचा निकाल येण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्ष निकाल मात्र काहीसा वेगळाच होता. इम्रान खान यांच्या समर्थक उमेदवारांना लोकांनी भरभरून मते दिली. या निकालातून इम्रान खान यांची लोकप्रियता अद्याप कायम आहे, असेच एकाअर्थी स्पष्ट झाले.
निकाल जाहीर करण्यास विलंब
प्रतिकूल निकाल आढळून आल्याने त्यात लष्कराच्या मदतीने फेरफार केली जात असल्याचा आरोप पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) हा पक्ष सोडून इतर बहुतेक पक्षांकडून केला जातोय. याच कारणामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यास उशीर करण्यात आला. हा दावा खरा असल्याचे सांगण्यासाठी पाकिस्तानच्या समाजमाध्यमांवर मतमोजणीदरम्यान फेरफार होत आहे हे सांगणारे अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले.
निवडणूक अधिकारी आणि नागरिकांत वाद
सुरुवातीच्या काळात पीटीआय समर्थित उमेदवार आघाडीवर होते. मात्र त्यातील काही उमेदवार अचानकपणे पिछाडीवर गेले. तर त्याच वेळी पीएएल-एन पक्षाच्या उमेदवारांनी मुसंडी मारली. याच कारणामुळे मतमोजणी चालू असताना पाकिस्तानमध्ये काही ठिकाणी निवडणूक अधिकारी आणि नागरिकांत वाद निर्माण झाल्याच्याही घटना समोर आल्या. आमच्या मतांची चोरी होत आहे, असा आरोप या नागरिकांकडून करण्यात आला.
अमेरिकेने व्यक्त केली चिंता
पाकिस्तानच्या निवडणुकीत होणाऱ्या या धांदलीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. अमेरिकेने निकालात फेरफार होत असल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. “निवडणुकीदरम्यान चालू असलेली हिंसा, मानवाधिकारांचे होत असलेले उल्लंघन, मूलभूत स्वातंत्र्याचा होत असलेला संकोच, माध्यम प्रतिनिधींवर होत असलेले हल्ले, इंटरनेट आणि दूरसंचार सेवांवर घालण्यात आलेले निर्बंध याचा आम्ही निषेध करतो. तसेच पाकिस्तानमध्ये निवडणुकीत होत असलेला हस्तक्षेप ही चिंतेची बाब आहे. अशा प्रकारच्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे,” असे मत अमेरिकेने व्यक्त केले.
आता पुढे काय?
२६६ निर्वाचित जागांच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये सरकार स्थापनेसाठी १३४ जागांची गरज आहे. सध्या एका जागेवरची निवडणूक स्थगित झाल्यामुळे २६५ पैकी १३३ जागा सरकार स्थापनेसाठी पुरेशा ठरतील. तर निवडणूक आयोगाच्या ताज्या निकालानुसार पीटीआय पक्षाचे उमेदवार हे ९१ जागांवर विजयी होत आहेत. तर पीएमएल-एन या पक्षाचे ७१ उमेदवार विजयी होतील अशी अपेक्षा आहे. बिलावर भुत्तो आणि असिफ अली झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ५४ उमेदवार विजयी झाले आहेत.
“मित्रपक्षांना आमंत्रित करत आहोत”
सध्यातरी येथे कोणत्याही एका पक्षाची सत्ता येण्याची शक्यता नाही. म्हणजेच सत्तेत यायचे असेल तर नवाझ सरीफ यांना अन्य पक्षांशी आघाडी करावी लागेल. शुक्रवारी नवाझ शरीफ यांनी निवडणुकीत विजय झाल्याची घोषणा केली. तसेच आम्ही अन्य पक्षांना सोबत घेऊन सरकारची स्थापना करू, असेही शरीफ यांनी त्यावेळी संकेत दिले. “सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे आम्ही अन्य पक्षांच्या सहकार्याने सरकारची स्थापना करणार आहोत. आम्ही आघाडी करण्यासाठी आमच्या मित्रपक्षांना आमंत्रित करत आहोत,” असे शरीफ म्हणाले.
नवाझ शरीफ पंतप्रधान तर बिलावल भुत्तो यांना मोठं पद
नवाझ शरीफ आणि भुत्तो-झरदारी यांच्यातील युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले जात आहे. शरीफ यांचे बंधू तथा माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि झरदारी यांची या आघाडीबाबत एक बैठक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवाझ शरीफ हे पंतप्रधान होतील तर बिलावल भुत्तो यांना उच्च पद दिले जाईल.
इम्रान खान यांच्या समर्थकांना फोडण्याचा प्रयत्न
दरम्यान, तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांनी हा निकाल नाकारल्यास त्यांच्या समर्थकांमध्ये तसेच पाकिस्तानी नागरिकांमध्ये काय प्रतिक्रिया उमटणा, हे अद्याप अस्पष्ट आहे. तर दुसरीकडे इम्रान खान यांच्या समर्थक खासदारांना फोडण्याचा प्रयत्न शरीफ यांच्या पक्षाकडून केला जाईल. विशेष म्हणजे इम्रान यांचे समर्थक अपक्ष म्हणून उभे राहिल्यामुळे त्यांना फोडणे हे तुलनेने सोपे असेल. त्यामुळे अशा परिस्थितीत इम्रान खान यांच्यामागे किती लोकप्रतिनिधी आहेत, यानिमित्ताने स्पष्ट होईल.