अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी युद्धविमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे प्रदेशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली असून प्रदेशातील तणाव वाढला आहे. पाकिस्तान आणि अफगाण तालिबान यांच्यातील एकेकाळी जवळचे असणारे संबंध बिघडले आहेत आणि सीमापार हिंसेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पाकिस्तान सरकारने अफगाणिस्तानात केलेल्या हल्ल्यांबद्दल अधिकृतपणे विधान केले नाही. परंतु, सुरक्षा अधिकाऱ्यांनी खाजगीरित्या सांगितले की, पाकिस्तानी लष्कराने तेहरीक-ए-तालिबानच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले होते, ज्याला टीटीपी म्हणून ओळखले जाते. या संघटनेने पाकिस्तानात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत.
अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीने सांगितले की, हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी निर्वासित कुटुंबांसह डझनभर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाण सार्वभौमत्वाचे उघड उल्लंघन म्हणून या गटाने हल्ल्यांचा निषेध केला आणि पाकिस्तानच्या आतल्या अनेक ठिकाणांवर हल्ले करून त्याला प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता अनेक वृत्त असे सूचित करतात की, पाकिस्तानची संरक्षण मंडळे वाखान कॉरिडॉरवर ताबा मिळवण्याच्या तयारीत आहेत. वाखान कॉरिडॉरला सामरिकदृष्ट्या महत्त्व आहे. काय आहे वाखान कॉरिडॉर? त्यावर पाकिस्तानला ताबा का मिळवायचा आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
हेही वाचा : चीनच्या कुरापती सुरूच; लडाखमधील भाग गिळंकृत करण्याचा प्रयत्न, नेमके प्रकरण काय?
वाखान कॉरिडॉरवर पाकिस्तानचा ताबा?
वाखान कॉरिडॉरला अफगाणिस्तानचा ‘चिकन नेक’ म्हटले जाते. पाकिस्तानी संरक्षण विश्लेषक कमर चीमा यांनी पाकिस्तान अफगाणिस्तानच्या वाखान कॉरिडॉरवर ताबा मिळवणार असल्याची माहिती दिली आहे. वाखान कॉरिडॉर ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानने आधीच कारवाई सुरू केल्याचा दावाही काही सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पाकिस्तानने वाखान कॉरिडॉरवर ताबा मिळवल्याच्या वृत्तादरम्यान, दुसरीकडे अफगाणिस्तानमधील बदख्शान पोलिस कमांडने वाखानमध्ये पाकिस्तानच्या उपस्थितीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. खोरासान डायरीने दिलेल्या अहवालात, बदख्शान पोलिस कमांडच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, “आमच्याकडे पाकिस्तानच्या उपस्थितीचा किंवा वाखान कॉरिडॉरवर कब्जा केल्याचा कोणताही दावा नाही.” वाखानवर पाकिस्तानी लष्करी हल्ल्याबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेले दावे बिनबुडाचे असल्याचे सांगत त्यांनी फेटाळून लावले.
वाखान कॉरिडॉर महत्त्वाचा का?
कमर चीमा यांनी शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारच्या वाखान कॉरिडॉरचा ताबा घेण्याच्या प्रयत्नांना आव्हानात्मक म्हटले आहे. त्याचे महत्त्व स्पष्ट करताना चीमा यांनी सांगितले की, या अरुंद प्रदेशामुळे अफगाणिस्तानला थेट चीनमध्ये प्रवेश मिळतो. मात्र, जर पाकिस्तानने कॉरिडॉरवर ताबा मिळवला तर त्याला थेट ताजिकिस्तानमध्ये प्रवेश मिळेल. सध्या अफगाणिस्तान त्यामध्ये एक अडथळा आहे, ज्यामुळे पाकिस्तानचा मध्य आशियाशी संपर्क तुटतो. पाकिस्तानला ही अरुंद पट्टी हस्तगत करायची आहे आणि चीनसाठी पूर्वीप्रमाणेच तो आपली गरज दाखवून आणखी संघर्ष निर्माण करू शकतो. वाखान कॉरिडॉर हा अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात स्थित जमिनीचा पट्टा किंवा कॉरिडॉर आहे. त्याची तुलना भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉरशी केली जाते, ज्याला बोलचालीत ‘चिकन नेक’देखील म्हणतात.
पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर हल्ले
पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांनी या हल्ल्यांवर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. परंतु त्यांनी नोंदवले की, त्यांनी अतिरेक्यांच्या सीमेपलीकडून होणारी घुसखोरी अयशस्वी केली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानच्या सत्तेत परत आल्यापासून पाकिस्तानी सैन्याची अफगाण भूमिवरील ही तिसरी मोठी कारवाई आणि २०२४ मधील दुसरी हवाई हल्ल्यांची कारवाई होती. पाकिस्तानी अधिकारी तालिबानवर टीटीपीला शस्त्र पुरवल्याचा आरोप करतात, हा आरोप तालिबानी नेते नाकारतात. पाकिस्तानी नागरिक आणि सैनिकांवर तसेच बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, बीजिंगच्या पायाभूत सुविधा गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या चिनी नागरिकांवरील होणाऱ्या टीटीपी हल्ल्यांना रोखण्यासाठी अफगाणिस्तानमधील ही घुसखोरी आवश्यक असल्याचे सांगतात.
“ही आमच्यासाठी लाल रेषा आहे : जर टीटीपी तिथून कार्यरत असेल तर ते आम्हाला मान्य नाही,” असे पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शुक्रवारी अफगाणिस्तानचा संदर्भ देत सरकारी मंत्र्यांच्या भेटीदरम्यान सांगितले. “आम्ही प्रत्येक परिस्थितीत पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करू,” असेही ते म्हणाले. पाकिस्तान आणि अफगाण सरकार, देशांतर्गत आव्हानांचा सामना करत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी तालिबानने पाकिस्तानी राज्यांविरुद्ध रक्तरंजित मोहीम चालवल्यामुळे झालेल्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांतील नेत्यांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे, असे माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी सय्यद अख्तर अली शाह म्हणाले. कमकुवत प्रशासन आणि आर्थिक अडथळ्यांसह दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात अडथळा आणणाऱ्या अनेक संकटांचा सामना करत असतानाही पाकिस्तान सरकारने आपल्या लोकांना दाखवून दिले पाहिजे की ते हल्ल्यांना उत्तर देईल, असेही ते पुढे म्हणाले.
हेही वाचा : तुमच्याकडे ‘हे’ जीपीएस आढळल्यास होऊ शकते अटक; यावर भारतात बंदी का? स्कॉटिश महिलेला का झाली अटक?
सप्टेंबर २०२३ मध्ये सीमा चौकीवर पाकिस्तानी तालिबानच्या हल्ल्यानंतर, पाकिस्तानने देशात बेकायदा राहणाऱ्या अफगाण लोकांवर कारवाई सुरू केली आणि आठ लाखांहून अधिक लोकांना अफगाणिस्तानात पाठवले. तालिबानवर दबाव आणण्यासाठी पाकिस्तानने लँडलॉक अफगाणिस्तानवरील व्यापार निर्बंधही कडक केले. तालिबानशी पाकिस्तानची निराशा ही एक तीव्र बदल दर्शवते. तीन वर्षांपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला तेव्हा पाकिस्तानने सुरुवातीला त्याला सामरिक विजय मानले होते. याशिवाय, नवीन तालिबान राजवट टीटीपीला लगाम घालेल, असा आशावाद पाकिस्तान करत होता.