Pakistan Man Without Visa Mumbai : भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तणावाचं वातावरण आहे, त्यामुळे दोन्ही देशांनी आपापल्या व्हिसाचे नियम कठोर केले आहेत. पाकिस्तानचा व्हिसा मिळविण्यासाठी भारतीयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तशीच गत पाकिस्तानातील लोकांचीही आहे. त्यांनाही भारतात पर्यटनासाठी यायचं असल्यास अटीशर्तींसह व्हिसा मिळवावा लागतो. मात्र, एका पाकिस्तानी तरुणाने अधिकृतरित्या व्हिसा न मिळवता भारतात पाऊल ठेवलं. मुंबईत आल्यानंतर त्याने तेथील वडापाववरही ताव मारला. तरीही या तरुणावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. हे नेमकं कसं घडलं? याबाबत सविस्तर जाणून घेऊ…. व्हिसाशिवाय आला भारतात : सध्या पाकिस्तानी तरुणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. वकार हसन असं या तरुणाचं नाव असून तो एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. अलीकडेच वकारने असा दावा केला आहे की, तो व्हिसाशिवाय भारतात आला होता. त्याने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊन वडापावही खाल्ला. विशेष म्हणजे, यावेळी सुरक्षारक्षकांनी त्याच्याकडे पासपोर्टची विचारणाही केली. त्यावेळी वकारने अधिकाऱ्यांना त्याचा पाकिस्तानी पासपोर्ट दाखवला. हा पासपोर्ट पाहून अधिकारीही चकित झाले, परंतु त्यांनी या तरुणावर कुठलीही कारवाई केली नाही.

आणखी वाचा : IT Act : एलॉन मस्क यांनी केंद्र सरकारला कोर्टात का खेचलं?

मुंबईच्या वडापावचा घेतला आस्वाद

खरंतर वकार हा सिंगापूरहून सौदी अरेबियाला जाण्यासाठी निघाला होता. यासाठी त्याने इंडिगोच्या कनेक्टिंग विमानाचे तिकीट बुक केले. या विमानाचा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहा तास थांबा होता. या सहा तासांत वकार हा विमानतळावर फिरत होता. त्याने तेथील एका दुकानातून मुंबईच्या वडापावचा आस्वादही घेतला. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओत वकार म्हणतो, “मी सिंगापूर येथून सौदी अरबला जाण्यासाठी निघालो आहे, सध्या मी मुंबईत असून येथे सहा तासांपासून थांबलो आहे. फक्त मुंबईचा वडापाव खाण्यासाठी मी इथे आलो आहे.”

व्हिसाशिवाय भारतात प्रवेश कसा?

वकारचा हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पाकिस्तानातून एखादा व्यक्ती व्हिसाशिवाय भारतात कसा येऊ शकतो? पोलिसांनी त्याच्यावर कारवाई का केली नाही? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. तसं पाहता पाकिस्तानातून भारतात येण्यासाठी कायदेशीररित्या व्हिसा काढावा लागतो. परंतु, पाकिस्तानी प्रवासी विमानतळाच्या आत राहून व्हिसाशिवाय भारतातून कायदेशीररित्या दुसऱ्या देशात प्रवास करू शकतात. मात्र, त्यांच्यासाठी सेल्फ-चेक-इन हा पर्याय नसल्यानं या प्रवाशांना सिंगल-तिकीट प्रवास कार्यक्रम बुक करावा लागतो. या काळात त्यांना विमानतळाबाहेर पडण्यास मनाई केली जाते.

पासपोर्ट पाहून अधिकारीही चकित

वकारलाही सुरक्षा रक्षकांनी विमानतळाबाहेर पडण्यास मनाई केली होती, त्यामुळे तो विमानतळावर वास्तव्यास होता. यादरम्यान, वकारने त्याच्या वेळेचा पुरेपूर उपयोग केला. विमानतळावरील लॉजवर आराम केला आणि तेथील मुंबईच्या वडापावचाही आस्वाद घेतला. वकार त्याच्या इन्स्टाग्राम व्हिडीओत म्हणतो, “बऱ्याच लोकांना माहीत नाही की, पाकिस्तानी लोक कनेक्टिंग फ्लाइटद्वारे व्हिसाशिवाय भारतात प्रवास करू शकतात. तो म्हणाला, मुंबई विमानतळावर माझा पाकिस्तानी पासपोर्ट पाहून अधिकारी आश्चर्यचकित झालेत, कारण त्यांच्यासाठीही ही एक असामान्य घटना होती.”

‘भारतातील प्रवासाबाबत मनात भीती होती’

हसनने कबूल केले की, हा प्रवास कायदेशीर असला तरी सुरुवातीला तो तिकीट बुक करण्यास कचरत होता. “मी १५ वर्षांपासून सिंगापूर ते दुबई असा प्रवास करत आहे. याकाळात कोणीही मला सांगितले नाही की आम्ही [पाकिस्तानी] भारतातून प्रवास करू शकतो, म्हणून जेव्हा मी कनेक्टिव्ह प्लाईटचे तिकीट बुक केले, तेव्हा मला यामध्ये थोडासा धोका वाटत होता. परंतु, विमानातील कर्मचाऱ्यांनी नियम समजावून सांगितल्यानंतर माझ्या मनातील भीती दूर झाली”, असंही सिंगापूरस्थित पाकिस्तानी तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम व्हिडीओत सांगितलं.

‘…अन्यथा तुला अटक होईल’

हसन म्हणाला, “जेव्हा मी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो, तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी मला माझा पासपोर्ट विचारला. मी पाकिस्तानी पासपोर्ट दाखवल्यानंतर त्यांनीही माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. फारसे पाकिस्तानी अशा कनेक्टिव्ह प्लाईटने प्रवास करीत नाहीत, त्यामुळे आमच्यासाठीही हा एक नवीन अनुभव आहे. काहीही झालं तरी विमानतळाच्या बाहेर पडायचं नाही, अन्यथा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तुला अटक केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, त्यामुळे बराच वेळ मी विमानतळावरच घालवला.”

मुंबईकरांकडून हसनचं स्वागत

दरम्यान, हसनने आपल्या अनुभवाचा व्हिडीओ इन्स्टाग्रावर शेअर केल्यानंतर काही तासांतच त्याला लाखो व्ह्युज मिळाले. हसनचा व्हिसाशिवाय भारताचा प्रवास हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला. एका वापरकर्त्याने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “हसन तुझा अनुभव खूपच छान होता, तुला भारतीय भूमिवर पाय ठेवण्याची संधी मिळाली याचा आम्हाला आनंद आहे. माणुसकी हा मोठा धर्म असूनही दहशतवाद आणि गलिच्छ राजकारणामुळे तो हरवून चालला आहे, आशा आहे की तुला वडापाव आवडला असेल.”

हेही वाचा : Doll controversy : चीनमधली लोकप्रिय बाहुली ‘या’ देशात ठरली देशद्रोही; काय आहे नेमकं प्रकरण?

दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, “अरे देवा, व्हिसाशिवाय आपण एखाद्या देशातून प्रवास करू शकतो, याची मला अजिबात कल्पना नव्हती. भविष्यात संधी मिळाल्यास मलाही असा प्रवास करायला आवडेल.” हसनच्या व्हिडीओवर काहींनी नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या. “तू ज्या देशाचे आणि त्यांच्या संस्कृतीचे कौतुक करतोय, तेथील अधिकाऱ्यांनी तुला विमानतळावरून बाहेरही पडू दिले नाही, अशा देशात राहण्याचा काय आनंद आहे”, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला.

भारतात व्हिसा-पासपोर्टशिवाय एंट्रीवर कठोर नियम

गेल्या काही वर्षभरापासून भारतात अवैधरित्या घुसखोरींचं प्रमाण वाढलं आहे. हीच बाब लक्षात घेता, केंद्र सरकार व्हिसा-पासपोर्टशिवाय भारतात प्रवेश करण्याबाबत कडक कायदा आणणार आहे. जर एखाद्या परदेशी नागरिकाने वैध पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय भारतात प्रवेश केला, तर त्याला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जर कोणताही परदेशी व्यक्ती बनावट कागदपत्रांसह भारतात प्रवेश करत असेल तर त्याला येथून हद्दपार केले जाऊ शकते. याशिवाय दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, जो कायदेशीर बाबीनंतर पुढे सात वर्षांपर्यंत वाढवता येतो. त्याच वेळी एक लाख ते १० लाख रुपयांपर्यंत दंडही आकारला जाऊ शकतो.

Story img Loader